समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७६ वा

शाल्वा बरोबर यादवांचे युद्ध -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
अद्‌भूत एक लीला ती कृष्णाची ऐकणे नृपा ।
सौभनाम विमानाचा स्वामी तो मारिला कसा ॥ १ ॥
मित्र हा शिशुपालाचा रुक्मिणीहरणातही ।
जरासंधादिच्या मध्ये यदुंनी हरिले यया ॥ २ ॥
त्या वेळी वदला शाल्व नष्टील यदुवंश तो ।
पाहतील तदा सारे माझे ते बल पौरुष ॥ ३ ॥
प्रतिज्ञा करुनी ऐशी शिवाच्या ध्यानि लागला ।
मूठभर तदा भक्षी राखची रोज फक्त ती ॥ ४ ॥
शाल्वसंकल्प जाणोनी वर्षाने शिव पावले ।
शरणागत त्या शाल्वा वदले वर माग तू ॥ ५ ॥
ऐकता वदला द्यावे विमान घोर ते असे ।
अभेद्य देव गंधर्वा यदुंना जे भयंकर ॥ ६ ॥
तथास्तु बोलले शंभू मयाच्या कडुनी तया ।
विमान करुनी तैसे शाल्वाला दिधले असे ॥ ७ ॥
विमान न पुरोची जै अंधारमय पाहण्या ।
इच्छिल्या स्थळि ते जाय यादवा लक्ष्यजे करी ॥ ८ ॥
द्वारका घेरिली तेणे उद्याने नाशिली तशी ।
नष्टिली तट वेशी नी शस्त्रांची झड लाविली ॥ ९ ॥
नष्टिली कुंजस्थाने ती महाल फाटके तशी ।
जिनेही नष्टिले सर्व विमानाच्या मधोनिया ॥ १० ॥
शिळावृक्ष तसे सर्प ययांची वृष्टि तो करी ।
वादळे उठली तैशी धूळची धूळ जाहली ॥ ११ ॥
त्रिपुरापरि हा शाल्व उच्छेद करु लागला ।
क्षणीची भंगली शांती नर नारी भिले तदा ॥ १२ ॥
यशस्वी वीर प्रद्युम्ने पाहिले त्रासिली प्रजा ।
बैसला रथि तो धैर्ये न भ्यावे वदला असे ॥ १३ ॥
पाठीसी सात्यकी सांब चारुदेष्णादि बंधु नी ।
अक्रूर कृतवर्मा नी भानुविंद गदो शुक ॥ १४ ॥
सारणादि असे वीर सशस्र पातले तदा ।
रथाश्व हत्ति नी सैन्य सवेचि चालले पहा ॥ १५ ॥
देवतासुर जै युद्ध धडाडें पूर्वि जाहले ।
तैचि शाल्व यदुंचे हे जाहले रोमहर्षक ॥ १६ ॥
प्रद्युम्ने दिव्य शस्त्रांनी शाल्वमायेस नष्टिले ।
सूर्याच्या उदयाने जै रात्रीचा तम नष्टतो ॥ १७ ॥
सुवर्णपंख ते बाणा न कळे कधि वेध घे ।
पंचेविस अशा बाणे शाल्व सेनापतीस त्या ।
प्रद्युम्ने तीव्र बाणांनी केले घायाळ ते तसे ॥ १८ ॥
शाल्वाला शत ते बाण एक प्रत्येक सैनिका ।
सारथ्यासी दहा तैसे वाहना तीन तीन ते ॥ १९ ॥
प्रद्युम्नाचे असे कर्म अद्‌भूत पाहता तदा ।
सैन्य ते सर्वच्या सर्व वाहवा करु लागले ॥ २० ॥
मायामय विमानो ते दिसे नी नच ही दिसे ।
अनेक रूप वा एक यदुंना नच ते कळे ॥ २१ ॥
कधी येई धरेशी नी आकाशी उडते कधी ।
पर्वतांशिखरी भासे कधी पाण्यावरी तसे ।
जाळीत चालले सारे न थांबे क्षण एक ते ॥ २२ ॥
विमानासह तो शाल्व कुठेही दिसला तदा ।
जेथ तेथ दिसोनीया बाणांची वृष्टिची करी ॥ २३ ॥
सूर्याग्निसम ते बाण विषारी सापची जसे ।
प्रद्युम्ने सोडिले तेंव्हा शाल्व मूर्च्छित जाहला ॥ २४ ॥
शाल्व सेनापतीनेही तसेच बाण सोडिले ।
यदुही लढती तैसे जिंकू वा मरु या मने ॥ २५ ॥
द्युमान शाल्वचा मंत्री पंचेवीस तिरा तसे ।
गदा पोलादि मारोनी मेला प्रद्युम्न तो म्हणे ॥ २६ ॥
प्रद्युम्ना वक्षस्थानासी गदा ती लागली तदा ।
दारुक् पुत्रे रणातून रथ तो काढिला असे ॥ २७ ॥
प्रद्युम्न संपता मूर्च्छा सारथ्या वदला अरे ।
हटवोनी रणातून न केले युक्त तू असे ॥ २८ ॥
न कोणी वंशिचा वीर हटला त्या रणातुनी ।
कलंक मजला लागे वाटते तू नपूंसक ॥ २९ ॥
सांग मी पितरां काय बोलू ते राम केशवा ।
पुसतील मला तेंव्हा काय उत्तर ते असे ॥ ३० ॥
हासतील मला सार्‍या भ्रातृजाया नि त्या पुन्हा ।
नपुंसक कसे झाले वदतील मला पहा ।
अक्षम्य सारथ्या तू हा केलास अपराध की ॥ ३१ ॥
सारथी म्हणाला -
आयुष्मन् ! सारथी धर्मे केले मी जाणुनी तसे ।
संकटी रथिला आम्ही आम्हाला रथि रक्षितो ॥ ३२ ॥
धर्म हा पाळिला मी तो शत्रूने मारिता गदा ।
मूर्च्छीत जाहले तुम्ही संकटी वागलो तसे ॥ ३३ ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर शहाहत्तरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP