श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
हात तोंड धुवोनीया कवचो धारिले असे ।
प्रद्युम्न वदला आता द्युमान् वीराशि ने पुन्हा ॥ १ ॥
त्यावेळी यादवी सेना द्यूमान् उद्द्वस्त तो करी ।
प्रद्युम्ने रोधिता हास्ये सोडिले आठ बाण ते ॥ २ ॥
अश्वां ध्वजां धनुष्याते एकेक बाण सोडुनी ।
छेदिले शिर ते त्याचे प्रद्युम्ने एकची सवे ॥ ३ ॥
गदा सात्यकि नी सांब संहारी शाल्वसैनिका ।
विमानीं तुटती डोकी समुद्रीं पडती पहा ॥ ४ ॥
या परी यदु शाल्वाचे मारिती तै परस्परा ।
धुमश्चक्री अशी झाली सत्तावीस दिनी पहा ॥ ५ ॥
त्या वेळी धर्मराजाच्या इंद्रप्रस्थास कृष्ण ते ।
मुक्कामा असुनी यज्ञ पूर्ण तो जाहला असे ॥ ६ ॥
दुश्चिन्हे पाहिले कृष्णे वृद्धांना पुसले तसे ।
निघाले द्वारकेशी ते बोलता पांडवादिका ॥ ७ ॥
रामाच्या सह मी आलो तिथे त्या शिशुपालचे ।
पक्षीय सूड घेण्याते अवश्य पातले, स्मरे ॥ ८ ॥
पातले द्वारकेशी तो खरेचि युद्ध चालले ।
द्वारका रक्षिण्या रामां ठेवोनी सारथ्यां वदे ॥ ९ ॥
शीघ्र काढ रथा या त्या शाल्वाच्या पाशि ने मला ।
मोठा मायवितो आहे न भ्यावे तू मुळीच की ॥ १० ॥
दारूक वंदुनी आज्ञा निघे शाल्वाकडे तदा ।
ध्वजचिन्ह गरूडाचे पाहता शाल्व ओळखी ॥ ११ ॥
आता पर्यंत शाल्वाची सेना सर्वचि नष्टली ।
कृष्णाने पाहली शक्ती रथाशी येइ ती तशी ॥ १२ ॥
कडाडे वीजची जैशी दिशाही दीपल्या तदा ।
कृष्णाने मारिता बाण शतखंडचि जाहली ॥ १३ ॥
सोळा ते बाण त्या शाल्वा विमाना मारिले तसे ।
असंख्य बाण सोडी जै सूर्याची किरणेचि ती ॥ १४ ॥
शाल्वाने मारिला बाण डाव्या बाजूस कृष्णच्या ।
अद्भूत घडले तेंव्हा ते शार्ङ्गधनुही सुटे ॥ १५ ॥
आकाशी पृथिवीशी ती हाय हायचि जाहली ।
गर्जोनी शाल्व तो बोले भगवान् कृष्ण यास की ॥ १६ ॥
समक्ष आमुच्या तू तो हरिली रुक्मिणी तशी ।
वधिले शिशुपालाला असावधचि पाहुनी ॥ १७ ॥
अजेय मानिशी तू तो जर तू थांबलास तो ।
तीक्ष्ण बाणे तुला आज सदाचा झोपवीतसे ॥ १८ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
नकोस बरळू मूर्खा पहा डोक्याशि मृत्यु तो ।
वीरतो वीरता दावी न करी व्यर्थ बोलणे ॥ १९ ॥
कृष्णाने क्रोधता वेगे खांद्याशी मारिली गदा ।
रक्त खांद्यातुनी वाहे शाल्व तो कांपु लागला ॥ २० ॥
परतोनि गदा आली शाल्व गुप्तचि जाहला ।
दो घडींनी वदे दूत देवकीचा निरोप की ॥ २१ ॥
पितृप्रेमी हरी कृष्णा शाल्वाने पितयास त्या ।
नेलेसे बांध बांधोनी कसई ने पशुस जै ॥ २२ ॥
निरोप ऐकता ऐसा उदास कृष्ण जाहले ।
कारुण्यपूर्ण वाणीने प्रेमाने बोलु लागले ॥ २३ ॥
अहो माझ्या बळीरामा देवता दैत्य ना कुणी ।
जिंकिती शाल्व तो अल्प तरी हे घडले कसे ॥ २४ ॥
शाल्व तै रचुनी माया वसुदेवापरी कुणा ।
माणसा आणुनी तेथे कृष्णाला बोलु लागला ॥ २५ ॥
पहा बाप तुझा मूर्खा जगसी तू जयास्तव ।
पहा मी संपवी कार्य वाचवी तू बळे यया ॥ २६ ॥
मायावी शाल्वने खोट्या वसुदेवास कापिले ।
विमानी बैसला जाता आकाशस्थ अशाच त्या ॥ २७ ॥
( इंद्रवज्रा )
ज्ञानस्वरूपी असुनीहि कृष्ण
सामान्यसा तो द्वय त्या घडीला ।
शोकात गेला बुडुनी तदा की
माया पुन्हा तो मनि आठवी ती ॥ २८ ॥
सचेत होता बघताच कृष्ण
न तेथ दूतो नच प्रेत कांही ।
ते स्वप्न जैसे जिरले मनीचे
नी सिद्धला शत्रुला मारण्याला ॥ २९ ॥
( अनुष्टुप् )
पुरोगामी असे कोणी वदती ऋषि की तया ।
विषयी सांगणे ऐसे वचना विपरीत ते ॥ ३० ॥
कुठे शोक भयो मोह अज्ञान्या ठायि ते असे ।
ज्ञान विज्ञान ऐश्वर्य-पूर्ण श्रीकृष्ण तो कुठे ॥ ३१ ॥
( इंद्रवज्रा )
ते श्रेष्ठ ऐसे मुनि ज्यासि ध्याती
विद्या तपाते मिळवोनि घेती ।
आणीक सारा तम जाळिती, तो
मोहात कैसा मुळि कृष्ण गुंते ॥ ३२ ॥
उत्साहुनी शाल्व तिरांस सोडी
घायाळ त्यास करि कृष्ण तैसा ।
नी तोडिले ते धनु रत्न त्याचे
विमान तोडी मग त्या गदेने ॥ ३३ ॥
गदा प्रहारे हरिच्या तदा ते
विमान गेले तुटुनी समुद्रीं ।
नी शाल्व आला सगदा तदा नी
कृष्णावरी तो मग झेप घेई ॥ ३४ ॥
कृष्णे तयाचा सगदेचि हात
तोडीयला नी मग चक्र घेई ।
सूर्यापरी जे तळपे कराशी
नभात जैसा रवि तो उदेला ॥ ३५ ॥
कृष्णे तयाचे शिर तोडिले जे
किरीटयुक्तो तइ शाल्व याचे ।
इंद्रे जसा वृत्रहि मारिला तै
नी दैत्य सारे वदलेचि हाय ॥ ३६ ॥
( अनुष्टुप् )
मेला पापी असा शाल्व विमान तुटले तसे ।
दंतवक्त्र तदा आला क्रोधोनी सूड घ्यावया ॥ ३७ ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सत्त्याहत्तरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥