श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
अजातशत्रु धर्माच्या यज्ञा पाहोनि देवता ।
माणसे नृपती संत सर्व हर्षित् जाहले ॥ १ ॥
दुर्योधना परी दुःख जाहले वदले तुम्ही ।
भगवन् ! सांगणे त्याचे काय कारण जाहले ॥ २ ॥
परीक्षिता ! तुझा आजा महात्मा धर्म तो असे ।
प्रेमात राहुनी त्याच्या बंधू सर्वचि वागले ॥ ३ ॥
भोजनालयि तो भीम कोषाध्यक्ष सुयोधन ।
स्वागता सहदेवो नी सामग्रीसी नकूल तो ॥ ४ ॥
गुरु सेवेत तो पार्थ कृष्ण तो पाय ते धुण्या ।
द्रौपदी वाढपाला नी कर्ण दानास बैसला ॥ ५ ॥
या परी सात्यकी आणि हार्दिक्य नि विकर्ण तो ।
भूरिश्रवा नि विदुरो संतर्दन विभिन्न त्या ॥ ६ ॥
कार्यासी नेमिले सर्व आपुले कार्य ते असे ।
करिती प्रियभावाने राजाचे हित ज्यात हो ॥ ७ ॥
( वसंततिलका )
ऋत्विज् सदस्य बहुज्ञानि पुरूष तैसे
ते इष्ट मित्र सगळे मधु बोलती नी ।
सत्कार सर्व, शिशुपालहि कृष्ण झाला ।
यज्ञांत स्नान करण्या नृप पातला तो ॥ ८ ॥
( अनुष्टुप् )
अवभृत् स्नान ते चाले मृदंग ढोल शंख ते ।
वाजती कैक वाद्ये ती दुंदुभी नरसिंगि ही ॥ ९ ॥
थैय्थया नाचती नाच्या मेळ्याने गात गायक ।
वीणा बासुरि नी झांज तुमुले गर्जले नभ ॥ १० ॥
सोन्याचे हार लेवोनी यदु सृंजय केकय ।
कोसली करु कंबोज सवे रंगीत त्या ध्वजा ॥ ११ ॥
सजले रथ नी हत्ती अश्व नी वीर ही तसे ।
मागे युधिष्ठिराच्या ते धमाम चालले असे ॥ १२ ॥
मोठ्याने वेदमंत्राते गावोनी विप्र चालले ।
आकाशा मधुनी देवे फुले वर्षिलि ती पहा ॥ १३ ॥
सजले नर नारी ते गंध वस्त्रांदिके तदा ।
लोणी दूध तसे पाणी अन्यांच्या वरि शिंपिती ॥ १४ ॥
सुगंधी जल नी तैल हळ्दि केशर गोरस ।
पुरुषा नर्तकी लावी नर्तिक्यांशी पुरूष ते ॥ १५ ॥
( वसंततिलका )
देव्या विमानि बसुनी बघतात शोभा
नी पालख्यात बसल्या किति एक राण्या ।
श्रीरंग रंग उधळी ललनात तेंव्हा
लाजोनी हासति तदा ललना तशा त्या ॥ १६ ॥
रंगे भिजोनि वसने रमण्या शरीरी
वक्षस्थलादि दिसता कटिभाग कांही ।
त्याही तशाच भरुनी पिचकारि रंगी
दीरांवरी नि पतिच्या भिजवीति वस्त्रा ।
ओत्सुक्य प्रेम भरुनी सुटले हि केस
तो खेळ शुद्ध असुनी मनि काम दाटे ॥ १७ ॥
( अनुष्टुप् )
द्रौपदी आदि राण्यांच्या युक्त त्या रथि धर्म तो ।
राजसूय स्वये याग मूर्तिमान् भासला असे ॥ १८ ॥
ऋत्विजे पत्निसंजाय यज्ञांत स्नान घातले ।
नृपे आचम्य ते केले गंगास्नान पुन्हा तसे ॥ १९ ॥
दुंदुभी वाजल्या तेंव्हा आकाशी धरणीशि ही ।
श्रेष्ठदेव ऋषी पित्रे फुले अर्पिति ते तदा ॥ २० ॥
नृपाचे स्नान हे होता चारी वर्णाश्रमी तदा ।
करिती स्नान गंगेचे जेणे पापचि नष्टते ॥ २१ ॥
रेशमी धोति नी पंचा ल्याले आभूषणे नृप ।
सदस्या ऋत्विजा विप्रा दिधले वस्त्र भूषणे ॥ २२ ॥
हरिभक्त असे राजे सर्वांत कृष्ण पाहती ।
म्हणोनी भावकी मित्रां सर्वांना नित्य पूजिती ॥ २३ ॥
( वसंततिलका )
माला सपुष्प पगड्या अन कुंडले ती
प्रावर्ण रत्न मणिहार जनां गळ्यात ।
कानी सुवर्ण फुल कर्धनि त्या स्त्रियांच्या
देवी नि देव जमले जणु उत्सवात ॥ २४ ॥
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! यज्ञि जे आले ऋषी द्विज नि क्षत्रिय ।
मुनी नी पितरे देव वैश्य शूद्र नि भूपती ॥ २५ ॥
अनुयायी असे सारे पूजिता धर्मराजने ।
स्वस्थाना सर्व ते गेले घेवोनी परवानगी ॥ २६ ॥
प्रशंसा करिती लोक न तृप्त पावती पहा ।
प्राशिता अमृता जैशी न तृप्ति कधि होतसे ॥ २७ ॥
सुहृद् हितैषि संबंधी कृष्णदेव ययास ते ।
धर्माने रोधिले जाण्या वियोगा नच इच्छि तो ॥ २८ ॥
सांबादी यदुवीरांना कृष्णाने धाडिले असे ।
आनंद धर्मराजाला देण्याते स्वय थांबला ॥ २९ ॥
मनोरथसमुद्रात कृपेने हरिच्या असा ।
धर्म-युधिष्ठिरो राजा सहजी पार जाहला ॥ ३० ॥
संपत्ती सर्व ती ऐशी यज्ञाची कीर्तिही तशी ।
पाहोनी जळतो चित्ती तो दुर्योधन एकदा ॥ ३१ ॥
( वसंततिलका )
जेंव्हा सभेत बसले नृपती विभूती
धर्मास सेवि द्रुपदी सभि त्या विशेष ।
मोठे नितंब म्हणुनी हळु पाय टाकी
झंकारतात नुपुरे पसरे रवो तो ॥ ३२ ॥
तो मोहवी कटिस्तरो अन वक्षभागी
मौक्तीकमाळ भरली उटिं केशराच्या ।
काळा तसाच कुरुळा बहु केशभार
पाहोनि सुंदरि अशी सुधनो जळे तो ॥ ३३ ॥
( अनुष्टुप् )
एकदा त्या सभे माजी सुवर्णासनि धर्म नी ।
हितैषी भगवान् कृष्ण देवेंद्रापरि बैसले ॥ ३४ ॥
ब्रह्माजी परि ते तेथे संपन्न भोग सर्व ची ।
राजलक्ष्मी तशी शोभे स्तविती वंदिलोकही ॥ ३५ ॥
तेंव्हा सुयोधनो मानी किरीट माळ लेवुनी ।
हातात खड्ग घेवोनी द्वारपालसा तुच्छितो ॥ ३६ ॥
भूमीसी जळ ते भासे जळासी भूमि त्या सभी ।
सुयोधन पडे त्यात भिजले वस्त्रही तसे ॥ ३७ ॥
पडता हासला भीम राण्या नी नृपती पहा ।
धर्म रोधी परी कृष्णे हासण्या अनुमोदिले ॥ ३८ ॥
( इंद्रवज्रा )
सुयोधनो लज्जित तेथ झाला
नी क्रोधलासे बहुही मनात ।
नी चूप आला स्वपुरात तेंव्हा
तै सज्जानांना बहु दुःख झाले ।
तो धर्मराजा बहु खिन्न झाला
श्रीकृष्ण होते चुपचाप तैसे ।
मनात इच्छी हरण्यास भार
तेणे तसा तो भ्रम त्यास झाला ॥ ३९ ॥
( अनुष्टुप् )
राजसूय महायज्ञीं क्रोधला कां सुयोधन ।
नृपा तू पुसले, सारी कथा मी वदलो तुला ॥ ४० ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंचाहत्तरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥