समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७४ वा

भगवंताची अग्रपूजा, शिशुपालाचा वध -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
जरासंध वधाचीही अशी अद्‌भुत ती लिला ।
कृष्णाची ऐकता धर्म प्रसन्न वदले असे ॥ १ ॥
राजा युधिष्ठिर म्हणाला -
सच्चिदानंद कृष्णारे ब्रह्मादि देवही तुझी ।
आज्ञेची पाहती वाट मिळता धारिती शिरी ॥ २ ॥
अनंता आम्हि तो दीन परी मानोत भूपती ।
दंडपात्र असे आम्ही तरी तू ऐकशी अम्हा ॥ ३ ॥
उदयास्ती जसा भानू तेजें ना होय तो कमी ।
उल्हास तवही तैसा न होय कधिही कमी ।
तुला ना अपुले कोणी परके ही तसे नसे ॥ ४ ॥
माझे तुझे असा भाव पशूच्या चित्ति तो वसे ।
भक्तांना नच ती बुद्धी तुजला ती मुळी नसे ॥ ५ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
या परी वदता धर्मे यज्ञाची वेळ पातता ।
वेदवादी द्विज तज्ञ आचार्या वर्णिले असे ॥ ६ ॥
द्वैपायनो भरद्वाज सुमंत गौतमो असित् ।
वसिष्ठ च्यवनो कण्व मैत्रेय कवषो त्रित ॥ ७ ॥
विश्वामित्र वामदेव सुमती जैमिनी क्रतु ।
पैल पराशरो गर्ग वैशंपायनही तसे ॥ ८ ॥
अथर्वा कश्यपो धौम्य राम भार्गव आसुरी ।
वीतहोत्र मधुच्छंदा वीरसेनोऽकृतव्रण ॥ ९ ॥
उपस्थित असे अन्य द्रोण भीष्म कृपा तसे ।
सपुत्र धृतराष्ट्रो नी विदुर ते महामती ॥ १० ॥
यज्ञ पहावया विप्र क्षत्रियो वैश्य शूद्र ही ।
पातले सर्वची राजे मंत्री त्याचे नि सेवक ॥ ११ ॥
सुवर्णनांगरे विप्रे भूमि नांगरुनी पुन्हा ।
यज्ञदीक्षा दिली धर्मा शास्त्रानुसार ती तशी ॥ १२ ॥
सोन्याची सर्व ती पात्रे वरुणापरि आणिली ।
प्राचीन काळि जै त्यान यज्ञात मेळिशी तशी ॥ १३ ॥
आवाहिताचि ते ब्रह्मा इंद्रादी लोकपाल ते ।
सिद्ध विद्याधरो यक्ष तसे गंधर्व नाग नी ॥ १४ ॥
राक्षसो मुनि नी तैसे खग किन्नर चारण ।
सपत्‍न सर्व ते आले पहाया यज्ञ तो असा ॥ १५ ॥
राजसूय असा यज्ञ करण्या पात्र हा नृप ।
मानिले सर्व त्या लोके भक्ताला काय ते उणे ।
वरुणा परि तो केला धर्मे यज्ञ विधि जसा ॥ १६ ॥
सोमरसदिनी धर्मे पुजिले तज्ञ लोक ते ।
निरीक्षिती चुका जे की कोठेही तृटि ना असो ॥ १७ ॥
सदस्य करिती चर्चा अग्रपूजार्थ कोण हो ।
न होय मत ते एक वदला सहदेव तो ॥ १८ ॥
अग्रपूजार्थ तो पात्र भक्तवत्सल कृष्णची ।
सर्वरूपी असा तोचि देवतारूप तोच की ॥ १९ ॥
कृष्णरूप असे विश्व यज्ञही कृष्णरूपची ।
आहुती अग्नि नी मंत्र कृष्णरूपचि सर्व ते ।
ज्ञान कर्म द्वया हेतू मेळिणे कृष्ण एक तो ॥ २० ॥
अद्वितीय असे ब्रह्म न विकार न भेद त्यां ।
संकल्पे निर्मि तो सृष्टी पोषितो मारितो तसा ॥ २१ ॥
अनुग्रहे तयाच्याची जग हे कर्म ते करी ।
धर्मार्थ काम मोक्षाते मेळिण्या झटती पहा ॥ २२ ॥
म्हणोनी भगवान् कृष्ण अग्रपूजार्थ पात्र तो ।
त्याच्या पूजेत सर्वांची आपुली घडते पुजा ॥ २३ ॥
अनंत भाव ठेवोनी दान धर्मास इच्छि जो ।
शांत पूर्ण असा कृष्ण भगवान् पूजिणे तये ॥ २४ ॥
कृष्णाचा महिमा पूर्ण जाणी तो सहदेव नी ।
बोलणे थांबता सर्वे केले त्याचे समर्थन ॥ २५ ॥
अभिप्राय द्विजांचाही जाणिला श्री युधिष्ठिरे ।
प्रेमाने पूजिले त्याने श्रीकृष्णां पुरुषोत्तमा ॥ २६ ॥
पत्‍नी बंधू नि मंत्र्यांच्या सह श्रीधर्मराजने ।
कृष्णाचे धुतले पाय तीर्थ ते घेतले शिरीं ॥ २७ ॥
पिवळी रेशमी वस्त्रे अलंकारहि अर्पिले ।
आनंदे पातले अश्रू न पाहू शकती तया ॥ २८ ॥
पाहता कृष्णपूजाही सर्वांनी हात जोडिले ।
वंदिता जय् जयकारे फुलांची वृष्टी जाहली ॥ २९ ॥
( वसंततिलका )
बैसोनि पाहि शिशुपाल गुणास ऐके
     क्रोधे भरोनि मग तो उठला सभेत ।
निष्ठूर शब्द वदला करि हातवारे
     नी हीन शब्द हरिशी करिही तसेची ॥ ३० ॥
( अनुष्टुप् )
कालची ईश तो सत्य श्रुतिवाक्य असे तसे ।
तेणेचि मूर्खवाक्याने वृद्धांची बुद्धि ती भ्रमे ॥ ३१ ॥
सदस्यांनो तुम्ही श्रेष्ठ न माना सहदेवचे ।
योग्य व्यक्ती दुजा कोणी निवडा अग्रपूजनी ॥ ३२ ॥
तपस्वी ज्ञानिही तुम्ही ताप शांत करीतसा ।
ब्रह्मनिष्ठ असे तुम्ही पूजिती लोकपालही ॥ ३३ ॥
निरीक्षक असा तुम्ही गवळी पूजिता कसा ।
कावळा अधिकारी हा यज्ञभागास होतसे ॥ ३४ ॥
धर्मबाह्य असा हा तो वर्ण आश्रम ना कुल ।
उल्लंघी धर्ममर्यादा पूजा ही करिता कशी ॥ ३५ ॥
ययातीने यया वंशा शापिले संत मानिती ।
आसक्त मधुपानाचा पूजा मान्य कशी असे ॥ ३६ ॥
मथुरा संतभूमी ही निषिद्ध द्वारकीं वसे ।
येता बाहेर तेथोनी डाकूच्या परि त्रासि हा ॥ ३७ ॥
परीक्षित् ! शिशुपालाचे संपले पुण्य सर्व ते ।
कृष्ण ध्यान ना देई सिंह कोल्ह्यास लक्षि जै ॥ ३८ ॥
कान बंद करोनीया शिव्या देवोनिया तसे ।
सदस्य उठुनी गेले निंदा ती न सहे तदा ॥ ३९ ॥
संपते पुण्य ते सारे ऐकता हीन वाक्य ते ।
संतांची ऐकता निंदा मिळते ती अधोगती ॥ ४० ॥
माराया शिशुपालाते मत्स्य कैकय पांडव ।
सृंजयी वंशिचे राजे उठले शस्त्र घेउनी ॥ ४१ ॥
न घाबरे तदा शत्रू हाती घेवोनि खड्ग तो ।
कृष्णपक्षाचिया लोका ओरडे ललकारुनी ॥ ४२ ॥
भांडणे पाहता कृष्णे स्वपक्षी नृप शांत ते ।
करोनी क्रोधता चक्रे पाप्याचे शिर कापिले ॥ ४३ ॥
वधता शिशुपालाला कोलाहलचि जाहला ।
तयाचे पक्षपाती ते पळाले भय घेउनी ॥ ४४ ॥
उल्का जै पडते खाली आकाशा मधुनी तशी ।
प्रेताच्या मधली प्राण ज्योत कृष्णास ती मिळे ॥ ४५ ॥
परीक्षित् ! शिशुपालाने जन्मता वैर बांधुनी ।
कृष्णासी लाविले चित्त तेणे पार्षद जाहला ॥ ४६ ॥
मिळता सद्‌गती त्याला धर्मराये तदा द्विजा ।
दिधली दक्षिणा खूप अवभृत् स्नान घेतले ॥ ४७ ॥
साधिला या परी यज्ञ कृष्ण योगेश्वरे तदा ।
प्रार्थिता आप्त ते सारे कितेक दिन राहिले ॥ ४८ ॥
धर्माची नसुनी इच्छा घेवोनी संमती पुन्हा ।
मंत्री राण्यां सवे कृष्ण पातले द्वारकापुरीं ॥ ४९ ॥
परीक्षित् ! सातव्या स्कंधी विस्तारे बोललोच की ।
जय नी विजया शाप संताचा मिळला असे ॥ ५० ॥
यज्ञांतस्नान घेवोनी महाराज युधिष्ठिर ।
सभेत बसले तेंव्हा इंद्राच्या परि शोभले ॥ ५१ ॥
राजा युधिष्ठिरे तेंव्हा देवता नृप सर्व ते ।
सत्कारिले तदा मोदे स्वस्थाना पर्व पातले ॥ ५२ ॥
जाहले सर्व ते सौख्य परी उत्कर्ष हा असा ।
दुर्योधन न साही तो पापी नी कुलनाशक ॥ ५३ ॥
परीक्षित् ! विष्णुकीर्ती ही शिशुपाल वधाचिया ।
कीर्तनी वदता नित्य न राही पाप ते मुळी ॥ ५४ ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौर्‍याहत्तरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP