समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७३ वा

मुक्त केलेल्या राजांना निरोप व भगवंत इंद्रप्रस्थात जातात -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
सहजी जिंकिता दैत्य सहस्र वीर आठशे ।
नृप बद्ध करोनीया किल्ल्यात ठेविले तसे ।
कृष्णाने सोडिले तेंव्हा मळक्या तनु वस्त्रही ॥ १ ॥
भुकेने थकले सारे बद्धी ढिल्लेचि जाहले ।
निघती तेथुनी त्यांनी पाहिला कृष्ण तो उभा ॥ २ ॥
शंख चक्र गदा पद्म चारी हातात शोभले ।
श्रीवत्स चिन्ह वक्षासी प्रसन्न वदनो असा ॥ ३ ॥
कुंडले मकराकार मुकूट तळपे तसा ।
मोत्यांचे ते गळा हार कर्धनी विलसे तशी ॥ ४ ॥
कौस्तुभो शोभला कंठी वनमाला तशाच त्या ।
पाहता भगवंताला नेत्रेचि पीति ते जणू ।
जिभेने चाखिती आणि नाकाने सुंगिती जसे ॥ ५ ॥
आलिंगितीहि बाहुंनी दर्शने पाप नष्टले ।
ठेवोनी शिर ते पायी वंदिती सर्व ते नृप ॥ ६ ॥
दर्शने हर्षले सारे क्लेशही मिटले तदा ।
विनये हात जोडोनी कृष्णाला नृप प्रार्थिता ॥ ७ ॥
राजेलोक म्हणाले -
नमस्ते देवदेवेशा सच्चिदानंदरूप तू ।
आम्हास मुक्त तू केले आता रक्षी तसाच की ॥ ८ ॥
मागाध दोष ना देतो श्रीकृष्णा मधुसूदना ।
अनुग्रह अम्हा झाला गर्व संपत्ति संपली ॥ ९ ॥
धनाने मद तो होता तेणे भद्र न साधले ।
मोहात गुंतती तेची धना सर्वस्व मानिती ॥ १० ॥
मृगजळा जसे मूर्ख तळेचि मानिती तसे ।
अज्ञानी भ्रम होवोनी माया सत्यचि मानिती ॥ ११ ॥
( इंद्रवज्रा )
आधी आम्ही सर्व धनांध होतो
     स्पर्धे प्रजेचा बहुनाश झाला ।
क्रोधी तसे मत्तचि आम्हि होतो
     मृत्यू उभा हा नच ते कळे की ॥ १२ ॥
हा काळ त्याची गहना गती ती
     ते रूप आहे तुमचेच कृष्णा ।
ते वित्त गेले अन गर्व गेला
     तेंव्हाचि आले स्मरणी पदो हे ॥ १३ ॥
शरीर रोगासचि जन्म देते
     न राज्य आता मन इच्छिते ते ।
निस्सार सारे कळले मनाला
     ऐकोनि वाटे बहु सुंदरो ते ॥ १४ ॥
( अनुष्टुप् )
कृपया सांगणे कांही तुझ्या या चरणास ती ।
विस्मृती न घडे केंव्हा मिळो जन्म कुठेहि तो ॥ १५ ॥
श्रीकृष्णा वासुदेवा रे श्रीहरी परमात्मने ।
दुःखाते नष्टिसी देवा गोविंदा नमितो तुला ॥ १६ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
कैदेची सुटका होता स्तविता नृप सर्व ते ।
करुणाकर तो बोले मधूर शब्द तो असे ॥ १७ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
नृपांनो इच्छिता तैशी लाभेल भक्ति ती तुम्हा ।
सर्वात्मा मीच तो आहे सर्वांचा स्वामिही तसा ॥ १८ ॥
भाग्ये संकल्पिले तुम्ही आनंद वाटला मला ।
तुम्ही ते वदला सत्य धनाने लोक माजती ॥ १९ ॥
हैहयो नहुषो वेण रावणो नरकासुर ।
देवता नृपती कैक मदाने भ्रष्ट जाहले ॥ २० ॥
उपजे मरते ते ते आसक्ती त्याजची नको ।
संयमे मजला ध्यावे धर्माने रक्षिणे प्रजा ॥ २१ ॥
रक्षा परंपरा सर्व भोग सर्वस्वि त्यागिणे ।
संतान वाढवा थोर सुख दुःखादि ती कृपा ।
माझीच मानणे, चित्ती आठवा मजला तुम्ही ॥ २२ ॥
उदास राहणे चित्ती आत्मरंगात रंगणे ।
आश्रमीव्रत ते पाळा ब्रह्मरूपात याल तै ॥ २३ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
भुवनेश्वर कृष्णाने आज्ञा देवोनिया अशी ।
स्नानादी घालण्या त्यांना दास दास्यासि बोलले ॥ २४ ॥
परीक्षित् ! सहदेवाने उचीत वस्त्र देउनी ।
माला गंधादिके त्यांना सर्वां सन्मानिले असे ॥ २५ ॥
स्नान स्वच्छ करोनीया सजले नृपती तदा ।
कृष्णे जेवविले त्यांना युक्त भोगहि ते दिले ॥ २६ ॥
सन्मानिता असे कृष्णे दुःख ते सर्व संपले ।
कुंडले शोभती कर्णी आकाशी चांदण्या जशा ॥ २७ ॥
सुवर्ण रत्‍न देवोनी श्रेष्ठ ऐशा रथां मधे ।
सर्वांना बैसवी कृष्ण त्यांच्या देशास पाठवी ॥ २८ ॥
कष्टमुक्त असे राजे केले श्रीहरिने तदा ।
कृष्णाचे गुण नी रूपा चिंतनी नृप चालले ॥ २९ ॥
तेथ जाता हरीची ती लीला लोकास सांगती ।
जागते राहिले चित्ती बोधाच्या परि वागती ॥ ३० ॥
जरासंधास हे ऐसे भीमाच्या करवी हरी ।
वधिता निघला तेंव्हा पूजिले सहदेवने ॥ ३१ ॥
तिघेही पातले वीर इंद्रप्रस्थात तेधवा ।
फुंकिले आपुले शंख शत्रुंना दुःख जाहले ॥ ३२ ॥
ऐकता ध्वनि तो लोक आनंदे उठले पहा ।
जाणिले मारिले दैत्या यज्ञहि पूर्ण होतसे ॥ ३३ ॥
भीम अर्जुन कृष्णाने वंदिला धर्मराज तो ।
जरासंध वधाची ती वदले सर्वची कथा ॥ ३४ ॥
ऐकता धर्मराजे ते प्रेमाने भरले पहा ।
नेत्रात दाटले अश्रू न कांही बोलले तदा ॥ ३५ ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर त्र्याहत्तरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP