समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७२ वा

पांडवांचे राजसूय यज्ञाचे आयोजन, जरासंधाचा उद्धार -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
एकदा त्या सभेमध्ये बैसता मुनि नी द्विज ।
क्षत्रीय वैश्य नी भीम चारी बंधुहि ते तसे ॥ १ ॥
भावकी गुरु नी वृद्ध संबंधी सोयरे तसे ।
सर्वां समक्ष कृष्णाला धर्मे संवाद साधिला ॥ २ ॥
धर्मराज युधिष्ठिर म्हणाले -
गोविंदा राजसूयाने तुम्हा नी विभुती रुपा ।
यजन करु मी इच्छी संकल्प पूर्ण तो करा ॥ ३ ॥
( वसंततिलका )
ध्याती पदास तुझिया जन तेचि धन्य
     ते जन्म मृत्यु मधुनी सुटतात देवा ।
जे इच्छितात विषया मिळती तया ते
     त्यांना न मुक्ति मिळते नच मोक्ष लाभे ॥ ४ ॥
देवाधि देव जन सर्व बघोत तू ते
     नी तो प्रभाव भरतो हृदयात त्यांच्या ।
भक्ती न जे करिति नी भजती तयांचा
     तू भेद दाव सकला कुरु सृंजयाला ॥ ५ ॥
तू ब्रह्ममोद सम नी सकलास आत्मा
     ना भेद तो मुळि तुला परका अपूला ।
भक्तास कल्पतरुच्या परि पावतोस
     सेवेत न्यून पडते नच न्यून तू तो ॥ ६ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
( अनुष्टुप् )
विजयी नृपती राजा निश्चय उत्तमो असे ।
राजसूय अशा यज्ञे होय विस्तार कीर्तिचा ॥ ७ ॥
ऋषिंना पितरां देवां आम्हा नी काय ते वदो ।
सर्वची प्राणि मात्राला अभीष्ट यज्ञ तो असे ॥ ८ ॥
पृथ्वीचे नृपती सर्व सर्व ते वश ठेवुनी ।
सामग्री मेळुनी सर्व महायज्ञास बैसणे ॥ ९ ॥
नृपती तुमचे बंधू अंश ते लोकपालचे ।
संयमी सद्‌गुणी वीर अशांना वश नित्य मी ॥ १० ॥
विश्वात कोणि ना द्वेषी माझ्या भक्तास षड्गुणी ।
तर ती शक्यता नाही तिरस्कारील कोण तो ॥ ११ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
ऐकता भगवत् शब्द आनंदे भरता नृप ।
दिग्विजय तसा सांगे बंधुंना शक्तिसंचरे ॥ १२ ॥
सृंजयो सहदेवाला दक्षिणीं धाडिले असे ।
मत्स्यदेशास नकुला पश्चिमीं धाडिले असे ।
केकयी अर्जुना लागी दिधली उत्तरो दिशा ।
मद्रास भीमसेनाला पूर्वदेशास धाडिले ॥ १३ ॥
भीमसेनादि वीरांनी बल पौरुष योजुनी ।
नृपती जिंकले थोर रायां धन समर्पिले ॥ १४ ॥
न जिंके तो जरापुत्र चिंतेत धर्म तेधवा ।
कृष्ण ती बोलले युक्ती वदले उद्धवो जसे ॥ १५ ॥
अर्जून भीम नी कृष्ण द्विजवेष करोनिया ।
पातले ते गिरिव्रजी जरासंधपुरास त्या ॥ १६ ॥
द्विजभक्त असा दैत्य गृहस्थाश्रम पाळि तो ।
अतिथी पूजना वेळी बोलले वेषधारि हे ॥ १७ ॥
तिघे आले दुरोनिया प्रयोजन विशेष ते ।
इच्छितो आम्हि ते कांही अवश्य देइजे अम्हा ॥ १८ ॥
क्षमावान् काय ना साही दुष्ट तो काय ना करी ।
उदार काय ना देई परका कोण त्या समा ॥ १९ ॥
समर्थ असुनी कोण नाशवंतास बाळगी ।
गाती संत जरी कोणा निंदा दुःखचि ते असे ॥ २० ॥
हरिश्चंद्रो रंतिदेव दाणे खावोनि राहिले ।
बळी मुद्‌गल नी व्याध अतिथ्या देह देउनी ।
अविनाशी असे झाले आम्हा विन्मुख ना करी ॥ २१ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
आवाज चेहरे तैसे घट खांद्यासि पाहुनी ।
द्विज ना जाणिले दैत्य ओळखी आठवी मनी ॥ २२ ॥
भयाने पातले कोणी द्विजवेष करोनिया ।
जर हे मागती भिक्षा तर मी देइही तशी ।
याचना करिता यांनी देहही अर्पितो ययां ॥ २३ ॥
विष्णुने द्विजवेषाने लुटिला बळि सर्व तो ।
पवित्र बळिची कीर्ति आजही श्रेष्ठ गात ती ॥ ३४ ॥
बळीचे लुटुनी द्रव्य देवेंद्रा विष्णुने दिले ।
गुरुने रोधिले त्याला तरी दान दिले तये ॥ २५ ॥
नाशवंत असा देह येणेचि यश साधिणे ।
न जो जगे द्विजासाठी तयाचे व्यर्थ ते जिणे ॥ २६ ॥
खरा उदार तो होता वेषधारी द्विजां म्हणे ।
इच्छा असेल ते मागा मागता शिर देइ हे ॥ २७ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
भोजनेच्छू न ते आम्ही युद्धार्थी क्षत्रियो असू ।
द्वंद्वयुद्ध अशी भिक्षा इच्छिशी तर दे अम्हा ॥ २८ ॥
पहा हे पंडुचे पुत्र भीम अर्जुन मी असे ।
जुना तुझा असा शत्रू कृष्ण आहे उभा पहा ॥ २९ ॥
हासे परिचये दैत्य चिडोनी वदला असे ।
मूर्खांनो इच्छिता युद्ध तरी मी ते स्विकारितो ॥ ३० ॥
भित्रा युद्धात तू कृष्णा मथुरा सोडिली भये ।
समुद्री राहसी तेंव्हा तुमसी मच मी लढे ॥ ३१ ॥
अर्जुनही नसे योद्धा बालची दुर्बला असा ।
न लढे म्हणूनी त्याशी बलवान् भीम जोड हा ॥ ३२ ॥
बोलोनी हे जरासंधे भीमाला दिधली गदा ।
स्वयही घेतली एक पुरा बाहेर पातला ॥ ३३ ॥
भिडले मत्त ते वीर वज्रासम कठीण त्या ।
गदेने मारती तेंव्हा एकमेकास शक्तिने ॥ ३४ ॥
पवित्रा घेत ते डावा उजवा बदलोनिया ।
मंचकी नट ते जैसे शोभेने लढती जसे ॥ ३५ ॥
गदा त्या भिडती तेंव्हा हत्ती ते लढती जसे ।
दातास दात मारोनी कडाडे वीज ती जशी ॥ ३६ ॥
( वसंततिलका )
खंडोनि वृक्ष करिती जधि हत्ति मार
     जोती कितेक तुकडे मग फांदियांचे ।
तैशा गदाहि तुटती करिता प्रहार
     खांदा भुजांस करिता बहु तो प्रहार ॥ ३७ ॥
जाती गदा तुटुनि तै मग वीर दोघे
     मुष्टी करोनि करिती अति मार तैसा ।
हत्तीपरीच लढती अन शब्द जैसे ।
     गर्जोनि वीज चमके नभ मंडळात ॥ ३८ ॥
( अनुष्टुप् )
समान बल उत्साह युद्ध कौशल्यही तसे ।
न कोणी थकला तैसा न हारे जिंकिही कुणी ॥ ३९ ॥
रात्री थांबोनि ते दोघे मित्राच्या परि राहती ।
दिवसा लढती ऐसे सत्ताविस दिनी पहा ॥ ४० ॥
दुसर्‍या दिनि तो भीम कृष्णाला वदला असे ।
जरासंधास या युद्धी मी ना जिंकू शके कधी ॥ ४१ ॥
रहस्य जन्म मृत्यूचे कृष्णा माहीत ते असे ।
भीमा दिधली शक्ती उपाय दिधला तसा ॥ ४२ ॥
अगाध ज्ञान कृष्णाचे उपाय मारण्या तसा ।
कळता फाडिली फांदी भीमा संकेत तो दिला ॥ ४३ ॥
शक्तिमंत अशा भीमे संकेत दिधला असे ।
पाय त्याचे धरोनीया पाडिला धरणीस तो ॥ ४४ ॥
पायाने एक पायाते दाबोनी धरिला पुन्हा ।
दुसरा ओढुनी हाते भीमे दैत्यास फाडिले ॥ ४५ ॥
एक पाय तसे अंड कमर पाथ नी स्तन ।
भुजा नेत्र तसे डोके भीमे अर्धाचि फाडिला ॥ ४६ ॥
हाहाःकार तदा झाला मरता मगधेश्वरो ।
कृष्णार्जुनेहि भीमाला भेटता अभिनंदिले ॥ ४७ ॥
कृष्णाचे रूप नी हेतू कोणासी न कळे कधी ।
जीवांचा जीवनो दाता तयाने सहदेव जो ।
जरासंध सुतो त्याला राज्यासी अभिषेकिले ।
बंदिवान् सर्व ते राजे कृष्णाने सोडिले तदा ॥ ४८ ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बाहत्तरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP