समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७१ वा

भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थास येतात -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
कृष्णाचे ऐकता शब्द उद्धवो तो महामती ।
सर्वांचे जाणुनी चित्त विचारे बोलला असे ॥ १ ॥
उद्धव म्हणाला -
देवर्षी बोलले तैसे यज्ञी जाणेच युक्त ते ।
शरणागत जे त्यांची रक्षा तो करणे असे ॥ २ ॥
राजसूय असा यज्ञ विजयी श्रेष्ठ तो करी ।
जरासंधास जिंकावे आता आवश्यको असे ॥ ३ ॥
मारता त्या जरासंधा हेतू सफल होतसे ।
बंदिवान् सुटता सर्व यशप्राप्तीहि होय ती ॥ ४ ॥
दहाहजार हत्तींच्या बळाने त्रासितो नृपां ।
भीमसेन असा एक तयाला हरवू शके ॥ ५ ॥
एकटा गाठणे त्याला ससैन्य नच तो हरे ।
द्विजभक्त असाची तो विन्मूख नच पाठवी ॥ ६ ॥
द्विजवेषात जावोनी युद्ध भिक्षाचि मागणे ।
द्वंदयुद्धातची भीम मारील दैत्य तो पहा ॥ ७ ॥
शक्तिमान् तुम्हि तो काल हेतू सृष्टिसही तुम्ही ।
ब्रह्मा शंकर हे दोघे निमित्तमात्रची तसे ॥ ८ ॥
( वसंततिलका )
राण्याहि गातिल हरी तव कीर्ति तेंव्हा
     शत्रूस मारुन जधी नृप मुक्त होती ।
शंखाचुडास वधिता गज मुक्ति होता
     कंसा वधीसि, अम्हि ती जशि नित्य गातो ॥ ९ ॥
( अनुष्टुप् )
म्हणोनि वधिणे दैत्या नृपपुण्य स्मरोनिया ।
तुम्हा तो आवडे आता जाणे यज्ञास त्या त्वरे ॥ १० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् ! उद्धवाचे हे हितैषी शुद्ध बोलणे ।
सर्वांना एकवेळेची वाटले ते समर्पक ॥ ११ ॥
गुरु नी वसुदेवांची कृष्णे आज्ञाहि घेतली ।
आज्ञापी जैत्र दारूका निघण्या हस्तिनापुरा ॥ १२ ॥
आज्ञा ती घेतली तैशी राम नी उग्रसेनची ।
धाडिल्या पुढती पत्‍न्या मुले बाळे नि अन्य ते ।
रथात बैसले कृष्ण पुन्हा या गरुडध्वजी ॥ १३ ॥
( गति )
निघे पुन्हाहि दळ अश्व हत्तिचे
     रथामधेहि अन तसे पदीहि जे ।
मृदंग भेरि अनक शंख वाजती
     सघोष नास पसरला दिशात त्या ॥ १४ ॥
सजोनि त्या नववसने विभूषिता
     गळा मणी दरवळ तो विलेप तो ।
नि स्वर्गपालखि मधुनी स्त्रिया तशा
     सभोवती परिचर रक्षिती तया ॥ १५ ॥
महीष उंटि सजित नर्तिका तशा
     छतादि घेउनि कुटि गाडिशी कुणी ।
स्त्रिया येति अनुचर पालखीत ही
     नि कुंजरा वरति बसोनि या कुणी ॥ १६ ॥
जसा दिसे उदधि तो उफाळता
     तशीच चवरि पताक छत्र ते ।
किरीट नी कवचधारी दळात त्या
     उफाळता रविपरि सैन्य भासले ॥ १७ ॥
तदा मुनी मनि बहु हर्षले पहा
     हरीस पाहुनि अति तृप्त जाहले ।
निघावया हरिपुजिता तयास तै
     मनात श्रीकृष्ण धरूनी चलोनि गेले ॥ १८ ॥
( अनुष्टुप् )
पुन्हा श्री वदले कृष्ण बंदिदूतास सौम्य की ।
न भ्यावे भद्र ते होई मारितो मी जरासुता ॥ १९ ॥
गेला भृत्य गिरिव्रजी बोलला जसच्या तसे ।
राजेही पाहती वाट सुटण्या दर्शना तसे ॥ २० ॥
आनर्त मरु सौवीर कुरुक्षेत्र नि पर्वत ।
ओलांडुनि नद्या गावे चालले हरि ते पुढे ॥ २१ ॥
वृषद्वती नदी तैशी केली पार सरस्वती ।
पांचाल मत्स्य देशाने इंद्रप्रस्थास पातले ॥ २२ ॥
श्रीकृष्ण येतसे ऐसे कळता श्रीयुधिष्ठिरा ।
आनंदे उठले रोम स्वागता पातले तदा ॥ २३ ॥
गीत मंगल ते झाले द्विजांनी वेद गायिले ।
स्वागता त्या हृषीकेशा प्राण इंद्रियि जै मिळे ॥ ३४ ॥
पाहता भगवंताला तृप्तले धर्मराज ते ।
पाहिले खूप वर्षांनी प्रेमाने धरिले तया ॥ २५ ॥
( इंद्रवज्रा )
पायी तयाच्या नित लक्षुमी ती
     भेटोनि त्याला बहु ताप नष्टे ।
आनंदडोही बुडले तदाते
     संसार त्यांना मुळि आठवेना ॥ २६ ॥
भेटे पुन्हा भीम हरीस प्रेमे
     आनंद झाला उभयास तैसा ।
नकूल पार्थो सहदेव तैसे
     त्यां भेटता अश्रुहि पातले की ॥ २७ ॥
( अनुष्टुप् )
अर्जून नकुलो तैसे भेटे तो सहदेवही ।
कृष्णाने द्विज वृद्धांना युक्त तैसे प्रणामिले ॥ २८ ॥
सन्मानिती नृपो थोर कुरु सृंजय केकयो ।
सूते नी मागधे वंदे द्विजांनी स्तुति गायिली ॥ २९ ॥
गंधर्व नट आदी ते वीणा ढोल नि शंख ते ।
मृदंग भेरिनादाने प्रसन्ने गात नाचले ॥ ३० ॥
सुहृदा घेउनी कृष्ण इंद्रप्रस्थास पातले ।
त्या वेळी सर्व लोकांनी श्रीकृष्णाला प्रशंसिले ॥ ३१ ॥
( वसंततिलका )
संमार्जनो नि तिथले मदगंध रस्ते
     झेंडे घरास मणि तोरण ठाइ ठाई ।
न्हावून सर्व सजले नर नारि तेथे
     पुष्पादि लेवुनि तसे फिरती सजोनी ॥ ३२ ॥
दीपावलीच सजली जणु गेही गेही
     बाहेर धूप पसरे झरती झरोके ।
गेहास स्वर्णशिखरे अन त्या पताका
     ती राजधानि बघता हरि चालला तो ॥ ३३ ॥
विश्वात सुंदर हरी चलतो पथाने
     ऐकोनि वेणि वसने सुटली स्त्रियांची ।
सोडोनि सेज पतिची बघती पथासी
     श्रीकृष्ण दर्शन तदा करण्या स्त्रिया त्या ॥ ३४ ॥
गर्दी तशीच जमली रथ हत्ति यांची
     पायी कितेक चलती अन सैन्य तैसे ।
सज्जात राजललना बघती हरीला
     वृष्टी करीति वरुनी सुमनांचि तेंव्हा ॥ ३५ ॥
पत्‍न्यां सवे बघुनि श्रीहरि जै शशी तो
     तारांगणात विलासे गमला स्त्रियांना ।
नी बोलती सखि पहा फळले कसे ते
     पुण्यो तदाच मिळते नित दर्शनो त्यां ॥ ३६ ॥
( अनुष्टुप् )
राजमार्गी असा कृष्ण चालता नागरीक ते ।
भेटवस्तूस अर्पोनी करिती स्वागतो तया ॥ ३७ ॥
अंतःपुरात कृष्णाला पाहता ललना तिथे ।
आनंदे भरले नेत्र कृष्ण ये राजमंदिरी ॥ ३८ ॥
भाच्याला पाहते कुंती श्रीकृष्णा भुवनेश्वरा ।
द्रौपदी सह ती आली कृष्णा वक्षास घेतले ॥ ३९ ॥
गोविंद गेहि तो येता विसरे धर्मभान ते ।
पूजेचा क्रमही त्यांनी नाठवे काय नी कसे ॥ ४० ॥
कृष्णाने वंदिली आत्त्या गुरुपत्‍न्याहि वंदिल्या ।
सुभद्रा द्रौपदी यांनी कृष्णाला वंदिले पुन्हा ॥ ४१ ॥
सासूचे द्रौपदी मानी वस्त्रालंकार देउनी ।
रुक्मिणी सत्यभामा नी भद्रा जांबवती तसे ॥ ४२ ॥
कालिंदी मित्रविंदानी सत्यासाध्वी नि लक्ष्मणा ।
अन्य राण्यासही तैसे युक्त सत्कारिले असे ॥ ४३ ॥
धर्माने भगवान् कृष्णा सेवार्थ मंत्रि नी स्त्रिया ।
सेवको सैन्य ठेवोनी सुखाने ठेविले असे ॥ ४४ ॥
खांडवा जाळुनी कृष्णे केले अग्नीस तृप्त तै ।
मयाला सोडिता तेणे रचिली दिव्य ती सभा ॥ ४५ ॥
धर्म इच्छेस जाणोनी राहिले कैक मास तै ।
हरि अर्जुन हे दोघे विहार करिती वनीं ॥ ४६ ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकाहत्तरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP