समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७० वा

कृष्णाची नित्यचर्या, त्याच्याकडे जरासंधाच्या कैदी राजांचे दूत येतात -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
कोंबडा आरवे तेंव्हा शिव्या घालिती त्या स्त्रिया ।
कृष्णपत्‍न्या जयांच्या त्या मिठ्या कृष्णगळ्यात की ॥ १ ॥
दर्वळे पारिजातो तो भृंग ते तान छेडिती ।
भूपाळी पक्षि ते गाती कृष्ण जागे करावया ॥ २ ॥
रुक्मिणी कृष्णबाहूत आशंके सोडितो मिठी ।
ब्रह्ममुहूर्त असुनी असह्य वाटए तिला ॥ ३ ॥
मुहूर्ती उय्ठतो कृष्ण मुख हात धुवोनिया ।
आत्मचिंतनि तो बैसे आनंदे रोम ठाकती ॥ ४ ॥
( इंद्रवज्रा )
एको स्वयं तेज अनन्य आत्मा
     अस्तित्वहीनो अविनाशि सत्य ।
स्वयंप्रकाशो अन हेतु काल
     आनंद ब्रह्मा स्वय ध्यायि कृष्ण ॥ ५ ॥
घेई पुन्हा स्नान पवित्र ऐसे
     संध्या करी वंदन तेहि तैसे ।
गायत्रि जापी हरि मंत्र तो की
     आदर्श संता निजबोध दावी ॥ ६ ॥
( अनुष्टुप् )
सूर्यपस्थान उदयी तर्पणे तद नंतर ।
द्वैअज वृद्धां पुन्हा वंदी तयांना पूजिही तसे ॥ ७ ॥
वस्त्रांनी सजवी गाई दुधाळ शांत ज्या तशा ।
व्यालेल्या नव नी शिंगां सुवर्ण मढवीयल्या ॥ ८ ॥
चांदीचे क्षीरही तैसे मोतीमाळ गळां बहू ।
गाई बावन्न त्या दान द्विजांना रोज देई तो ॥ ९ ॥
गो विप्र देवता वृद्ध गुरू या विभुती स्वयी ।
नमी समस्त त्या जीवां मांगल्या स्पर्शि तो पुन्हा ॥ १० ॥
स्वयं सुंदर आसोनी नरलोकविभूषण ।
वस्त्रालंकार लेई नी विलेपी चंदनादिक ॥ ११ ॥
तुपात आरशामध्ये पाही नी गो वृष द्विजा ।
देवमूर्तीस वंदी तो पुन्हा अंतःपुरातल्या ।
चौवर्णा तुष्टवी तुष्टे आनंदे स्वय श्रीहरी ॥ १२ ॥
तांबूल पुष्पमाला नी अंगराग नि चंदन ।
द्विज स्वजन मंत्र्यांना राण्यांना वाटुनी पुन्हा ।
उरले आपुल्या कामी आणी तो मधुसूदन ॥ १३ ॥
आटोपिता असे कर्म दारूक रथ घेउनी ।
येता प्रणामितो कृष्णा उभा सामोरि तो असे ॥ १४ ॥
सात्यकी उद्धवा घेता सारथ्या हात देउनी ।
बसे रथात तो जैसा शोभे भास्कर-सूर्यची ॥ १५ ॥
लाजती पाहुनी स्त्रीया कष्टाने त्यां निरोपिती ।
हासरा चोरिता चित्ता निघे कृष्ण पुढे तसा ॥ १६ ॥
सुधर्मा या सभेमध्ये येई श्रीकृष्ण तेधवा ।
जेथे ऊर्मी शरीराच्या न होती क्षण एकही ॥ १७ ॥
( इंद्रवज्रा )
अनेकरूपी मग कृष्ण एक
     सिंहासनी तो बसता विराजे ।
फाके दिशांना बहु तेज त्याचे
     जै तारकांमाजि शशि प्रकाशे ॥ १८ ॥
( अनुष्टुप् )
अभिनये नटाचार्य नाचोनी नर्तिका तसे ।
विदूषक विनोदाने कृष्णा रंजविती सभीं ॥ १९ ॥
वीणा मृदंग नी वंशी झांज शंखहि त्या ध्वने ।
सूत मागध नी वंदी स्तुती गाती नि नाचती ॥ २० ॥
व्याख्याते द्विज ते कोणी मंत्र व्याख्याहि बोलती ।
पवित्र नृपती यांचे चरित्र सांगतो कुणी ॥ २१ ॥
एकदा द्वारकाद्वारीं नवखा कोणि पातला ।
कितेक सूचना देता सभेत भृत्य नेइ त्यां ॥ २२ ॥
कृष्णाला वंदिले त्याने नवख्या सेवके तदा ।
जिंकिता तो जरासंध ज्याने ना नमिले तया ॥ २३ ॥
राजे वीससहस्रो ते ठेवी कैदेत दानव ।
तयांचे दुःख तो सारे कृष्णाला वदला असे ॥ २४॥
सच्चिदानंद कृष्णा रे तुम्हा अंत न लागतो ।
मोडिशी भय ते सर्व म्हणोनी पयि पातलो ॥ २५ ॥
( वसंततिलका )
ते जीव सर्व फसलेचि सकाम कर्मी
     ना पूजिता हरि तुला भ्रमती भवात ।
आशालतेस समुळे उपटोनि नेशी
     कालस्वरूप तुजला नमितो हरी मी ॥ २६ ॥
भक्तास रक्षिसि नि दंडिसि त्या खळांना
     आश्चर्य हेचि गमते खळ कष्ट देतो ।
दुष्कर्म दैत्यरुप घेउनि त्रासितो हे
     तो ते कसेचि घडते करि मुक्ति क्लेशीं ॥ २७ ॥
जाणोत राजसुख हे मिळते नशीबे
     नी ते असत्य सगळे अति तुच्छ तैसे ।
प्रेतापरीच तनु ही भय कैक पाठी
     ओढोनि क्लेश, त्यजितो निज सौख्य आम्ही ॥ २८ ॥
शोको नि मोह करिसी चरणासि नष्ट
     बंधास सोडवि हरी मगधाचिया त्या ।
हत्ती परी दशहजार हि शक्ती त्याची
     मेंढ्यापरी पकडुनी निज कैद ठेवी ॥ २९ ॥
हे चक्रपाणि सतरा समयास तू तो
     त्याला हरीसि हरसी समयास एक ।
शक्ती असोनि करिशी हरि ऐशि लीला
     भक्तासि हा त्रसितसे बघ युक्त तैसे ॥ ३० ॥
दूत म्हणाला -
( अनुष्टुप् )
दैत्याचे बंदि ते राजे या परी प्रार्थिती तुला ।
दर्शना इच्छिती पाया भद्र त्यांचे करा हरी ॥ ३१ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात -
दूत तो सांगता ऐसे देवर्षी पातले तिथे ।
जटा तेजाळती छान उगवे सूर्य तो जसा ॥ ३२ ॥
देवाधि देव तो कृष्ण मंत्र्यांच्या सह तो उभा ।
राहिला पाहता त्यांना माथा टेकोनि वंदितो ॥ ३३ ॥
आसनी बैसले तेंव्हा पूजिले विधिपूर्वक ।
संतुष्ट करिता त्यांना बोलले गोड त्यां असे ॥ ३४ ॥
देवर्षी ठीक ना सारे त्रिलोकी भ्रमता तुम्ही ।
लाभ आम्हा असा त्याचा समाचार मिळे घरी ॥ ३५ ॥
त्रिलोकी कोणती गोष्ट तुम्हा ज्ञात नसे अशी ।
युधिष्ठिरादिते बंधू इच्छिती काय ते वदा ॥ ३६ ॥
देवर्षि नारद म्हणाले -
( इंद्रवज्रा )
माया तुझी नी नच जाणि ब्रह्मा
     अनंत तू नी तव ऐशि माया ।
काष्ठात अग्नी त‍इ तूहि जीवां
     नी ती अम्हाला पुसतोस वार्ता ॥ ३७ ॥
मायें हरी तू जग निर्मिसी हे
     असत्य सत्यो त‍इ भास होतो ।
अचिंत्य सारे तव रूप ऐसे
     मी तो तुला केवलची नमीतो ॥ ३८ ॥
त्या वासनांनी फसते शरीर
     वाटे मुळी ना कधि मुक्त होतो ।
तुझ्या यशाने जळतात दुःखे
     म्हणोनि आलो शरणी तुझ्या मी ॥ ३९ ॥
( अनुष्टुप् )
स्वयंब्रह्म असा तू नी भोळ्यासा पुसशी मला ।
तरीही सांगतो सर्व आतेबंधू कसेत ते ॥ ४० ॥
भोग ते सत्य लोकीचे लाभले त्या युधिष्ठिरा ।
राजसूय असा यज्ञ योजी तो तव प्राप्तिसी ॥ ४१ ॥
भगवान् यज्ञि त्या थोर देवता नृपती तसे ।
येतील दर्शना सारे तुझ्या पायासि श्रीहरी ॥ ४२ ॥
श्रवणे कीर्तने ध्याने पापी पावन होतिही ।
प्रत्यक्ष स्पर्शिता तैसे दर्शने नच सांगणे ॥ ४३ ॥
( वसंततिलका )
व्यापी तुझे यश असे जगतास सार्‍या
     पाताळ स्वर्गि पृथिवी, घनब्रह्म ऐसा ।
मंदाकिनी करितसे जगता पवित्र
     पाताळ स्वर्ग पृथिवी तव कीर्ति ऐशी ॥ ४४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! सभिचे सर्व मागधा जिंकण्यास त्या ।
उत्सूक असता त्यांना नारदी शब्द ना रुचे ।
विश्वशास्ता तदा बोले हासोनी उद्धवास त्या ॥ ४५ ॥
श्रीभगवान् म्हणाले -
हितैषी सुहृदो चक्षू उद्धवा काय इच्छिशी ।
तुझ्या शब्दास श्रद्धा ती बोल तू, वागतो तसे ॥ ४६ ॥
उद्धवे पाहिले ऐसे सर्वज्ञ कृष्ण हा असा ।
विचार पुसतो तेंव्हा आज्ञा मानितो बोलले ॥ ४७ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सत्तरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP