समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६८ वा

कौरवांवर बळिरामजींचा कोप आणि सांबचा विवाह -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
दुर्योधनसुता राजा ! लक्ष्मणा ती स्वयंवरी ।
जिंकोनी आणिली वीरे सांबे जांबवतीसुते ॥ १ ॥
कौरवो बोलले क्रोधे उद्धटे बलपूर्वक ।
कन्या ती ओढुनी नेली इच्छा ती नसता तिची ॥ २ ॥
उद्धटा बांधुनी आणा यदुवंशास क्रोध तो ।
येता ना बिघडे कांही जगती आमुच्या कृपे ॥ ३ ॥
बंदिस्त पुत्र पाहोनी येता ते लढुही तया ।
घमेंड जिरवु सारे योगी इंद्रिय जिंकी जै ॥ ४ ॥
असे कर्ण शलो भूरी यज्ञकेतू सुयोधन ।
कुरुवृद्धां पुसोनीया कृतीला सिद्ध जाहले ॥ ५ ॥
पाहिले पाठिसी सांबे धृष्टराष्ट्र दळास त्या ।
धनुष्य घेउनी आला सिंहाच्या परि एकटा ॥ ६ ॥
तिकडे कर्ण तो मुख्य सेना घेवोनि पातला ।
क्रोधाने ओरडे थांब बाणांची वृष्टि ही करी ॥ ७ ॥
परीक्षित् ! सांब तो होता प्रत्यक्ष कृष्णनंदन ।
मृगा मृगेंद्र पाही तै तुच्छये क्रोधोनि पाहि तो ॥ ८ ॥
सांबे धनुष्य ताणोनी कर्णासह सहा विरां ।
सोडिले षट् षट् बाण प्रत्येका वेगळे तसे ॥ ९ ॥
चौ चौ बाणहि अश्वांसी एकेक सारथी विरां ।
हस्तलाघव देखोनी शत्रुंनी त्या प्रशंसिले ॥ १० ॥
सर्वांनी त्या मिळोनीया सांबाचा रथ तोडिला ।
अश्व चौ मारिले चौघे एके सारथि मारिला ।
सांबचे धनु ते एके तोडिता सांब बांधिला ॥ ११ ॥
लक्ष्मणापुत्रि घेवोनी जयची मानुनी तसा ।
हस्तिनापुरि ते आले आनंदे सर्व वीर की ॥ १२ ॥
नारदे कथिता सारे क्रोधले यदुवंशिही ।
उग्रसेननृपाज्ञेने युद्धार्थ सर्व पातले ॥ १३ ॥
कलीच्या पापतापाला शमिण्या बळि जन्मले ।
कुशुशी लढणे योग्य तयांना वाटले नसे ॥ १४ ॥
सर्वांना करुनी शांत तेजस्वी रथि बैसले ।
द्विज नी वृद्ध घेवोनी निघाले रथि चंद्र जै ॥ १५ ॥
थांबले वनि ते एका समीप हस्तिनापुरा ।
जाणण्या कुरुहेतू तो उद्धवा धाडिले असे ॥ १६ ॥
उद्धवे सभि जावोनी धृतराष्ट्रास नी तसे ।
आचार्या वंदिले, बोले येतात बलरामजी ॥ १७ ॥
हितैषी राम येता तो ऐकता कुरु हर्षले ।
सत्कारा पातले सर्व मांगल्यस्तुति गाउनी ॥ १८ ॥
सत्कारा दिधल्या गाई अर्घ्यही अर्पिले कुणी ।
प्रभाव जाणिती त्यांनी वंदिले शिर टेकुनी ॥ १९ ॥
पुसले कुशलो क्षेम एकमेका परस्परे ।
धीर गंभीर वाणीने बोलले बलराम तै ॥ २० ॥
उग्रसेन महाराजे तुम्हा आज्ञा दिली असे ।
एकाग्रे सर्वची ऐका शीघ्रची पाळणे तुम्ही ॥ २१ ॥
वदले सांब धर्मात्मा अधर्मे बांधिले तया ।
न व्हावे आपुले तेढ सोडणे वधुनी वरा ॥ २२ ॥
शूरता - वीरतापूर्ण युक्त ते बळि बोलले ।
कौरवा पातला क्रोध क्रोधाने बोलु लागले ॥ २३ ॥
आश्चर्य केवढे आही काळाची चाल वगळी ।
जोड्यांना वाटते जावे सारोनी मुकुटा शिरीं ॥ २४ ॥
सोयरे यदुही झाले पंक्तीस जेवु लागले ।
सिंहासन दिले त्यांना प्रतिष्ठा दिधली तशी ॥ २५ ॥
चामरे शंख छत्रे नी मुकूट राज‍आसने ।
शय्याही भोगिती तैसी आम्ही दुर्लक्षिले तयां ॥ २६ ॥
( इंद्रवज्रा )
हे फार झाले नृपचिन्ह यांचे
     घ्यावे बळे हे शिरजोर होती ।
कृपाप्रसादे जगती कुरुच्या
     निर्लज्ज आज्ञा करिती पुन्हा हे ॥ २७ ॥
( अनुष्टुप् )
सिंहाचा भाग ना घेई लांडगा त्याच त्या परी ।
अर्जून द्रोण भीष्मांची इंद्रही वस्तु भोगिना ॥ २८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् कुरुवंशींना संपत्ती कुळगर्व तो ।
साधा आचार सोडोनी हस्तिनापुरि पातले ॥ २९ ॥
दुष्टता पाहिली रामे बोलणे ऐकिले तसे ।
संतापे लाल होवोनी मोठ्याने हासती तदा ॥ ३० ॥
खरेचि दुष्ट जे त्यांना संपत्ती कुळ-गर्व हो ।
नेच्छिती शांति हे दुष्ट पशुंना लाठिचे हवी ॥ ३१ ॥
आमुचे सैन्य नी कृष्ण लढाया सिद्धले परी ।
राखिली शांति मी तेथे नी आलो समजावया ॥ ३२ ॥
परी सारे इथे दुष्ट ह्यांना भांडण आवडे ।
तिरस्कार करोनीया बकती वाटले तसे ॥ ३३ ॥
ठीक, ठीक असो बंधू इंद्रादी देव पाळिती ।
आज्ञा ती उग्रसेनाची पहा ते नृप ना कसे ! ॥ ३४ ॥
सुधर्मा सभि जो राजे पारिजातास मेळि जो ।
राज सिंहासना युक्त नव्हे कास कास कृष्ण पात्र तो ॥ ३५ ॥
स्वयं भगवती देवी सेविते नित्य ज्या पदा ।
तो का ना राजचिन्हाते ठेविण्या पात्रही तसा ॥ ३६ ॥
( वसंततिलका )
ज्याच्या पदीचि धुळ घेवुनि संत नेती
     तीर्था पवित्र करिती अन शंकरादी ।
ती पायधूळ धरिती हरिची सदा त्या
     ते राज‍आसन कुठे मिळते बसाया! ॥ ३७ ॥
बिचारे यदुवंशी ते कुरूचे अन्न भक्षिती ।
आ हो आम्ही असू जोडे कुरू ते मुकुटोच की ! ॥ ३८ ॥
गर्वे वेडेचि झाले हे बोलती कटु भाष्य ते ।
दंड देण्या समर्थो मी मजला साहवे कसे ? ॥ ३९ ॥
निष्कौरव ही पृथ्वी करितो राम बोलले ।
त्रिलोका जाळिती वाटे हाती नांगर घेतला ॥ ४० ॥
उप्‌टोनी काढिले त्यांनी फाळाने हस्तिनापुरा ।
क्रोधाने बुडवायाते गंगापात्रासि ओढिती ॥ ४१ ॥
डौले नाव तसे झाले कंपीत हस्तिनापुर ।
पांडवे पाहिला गाव पडे गंगेत सर्वची ॥ ४२ ॥
लक्ष्मणा सह तो सांब तयांनी आणिला पुढे ।
सकुटुंब पुढे येता प्रार्थिती हात जोडुनी ॥ ४३ ॥
लोकाभिराम रामा हो तुम्ही तो पृथ्वि धारिली ।
अज्ञानें मूर्ख हो आम्ही अपराधा क्षमा करा ॥ ४४ ॥
जगाचे हेरु ही तुम्ही निराधार स्वयं असा ।
वदती ऋषि हे विश्व खेळणे खेळता तुम्ही ॥ ४५ ॥
( इंद्रवज्रा )
तुम्ही धरेला धरिला लिलेने
     सहस्र डोके प्रभुजी तुम्हाला ।
तुम्हीच अंती लिन सर्व घेता
     नी राहता एकटेची निजोनी ॥ ४६ ॥
( अनुष्टुप् )
सत्वमयी अशा रूपा धारिता स्थिति पालनी ।
न द्वेषे कोपले तुम्ही जीवांना बोधिता तुम्ही ॥ ४७ ॥
नमस्ते सर्वभूतात्मा सर्वशक्तिधरा तुम्हा ।
नमस्ते विश्वकर्माते तुम्हा शरणि पातलो ॥ ४८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
डळ्‌मळे नगरी तेंव्हा सर्वची भयभीत ते ।
येवोनी प्रार्थिता ऐसे न भ्यावे राम बोलले ॥ ४९ ॥
दुर्योधनास ती पुत्री अत्यंत लाडकी अशी ।
आंदना साठवर्षाचे बाराशे हत्ति ते दिले ॥ ५० ॥
दहा हजार ते घोडे षट्सहस्र रथो तसे ।
सालंकृत अशा दास्या सहस्र दिधल्या पहा ॥ ५१ ॥
स्वीकारिता असे सर्व पुत्र सूनहि घेउनी ।
कौरवा अभिनंदोनी निघाले द्वारकापुरा ॥ ५२ ॥
( इंद्रवज्रा )
उत्सुक सार्‍या स्वजना मिळाले
     द्वारावतीसी बळिराम ऐसे ।
चरित्र सारे वदले सभेत
     जे जाहले त्या कुच्या पुरात ॥ ५३ ॥
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! आज ही तैसे कलते हस्तिनापुर ।
गंगाजीची दिशा दावी प्रतीक रामकीर्तिचे ॥ ५४ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अडुसष्टावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP