राजा परिक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
अनंत अपरा राम लीला अद्भुत त्याचिया ।
तयाचे आणखी काही कार्य ते ऐकु इच्छितो ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
भौमाचा मित्र तो एक द्विविदो नाम वानर ।
सुग्रीवसचितो तोची बलवान् मैंद बंधु तो ॥ २ ॥
मारिला भौम कृष्णाने मित्रप्रेमार्थ तेधवा ।
गावे वने तशा वस्त्या जाळुनी भस्म हा करी ॥ ३ ॥
गिरी फोडोनि विध्वंसी प्रांतच्या प्रांत नाशि हा ।
काठेवाडास नष्टी हा कृष्ण ज्या देशी राहिला ॥ ४ ॥
दहाहजार हत्तींचे बळ त्या द्विविदा असे ।
समुद्री पोहता प्रांत तिरीचे जळि डुंबती ॥ ५ ॥
आश्रमी वृक्ष वेलिंची नासधूसहि तो करी ।
अग्निकुंडी मल मुत्रे अग्नि दूषितही करी ॥ ६ ॥
भृंगि जै अळि नेवोनी बिळात बंद तो करी ।
त्या परी पुरुषां स्त्रीया गुफेत बंद हा करी ॥ ७ ॥
त्रासवी नागरीकांना सतिंना भ्रष्ट तो करी ।
सुललीत पडे कानी रैवतक् पर्वताहुनी ।
म्हणोनी गीत ऐकाया गेला दुष्ट तिथे पहा ॥ ८ ॥
तै पाही यदुरामाला अंग प्रत्यंग सुंदरा ।
कंजमाला असे कंठी स्त्रियात शोभला तसा ॥ ९ ॥
वारुणी पिवुनी गातो मदविव्हल लोचने ।
मदमत्त गजा ऐसा शोभला बलराम तो ॥ १० ॥
दुष्ट वानर त्या वृक्षी बसोनी हालवी तसा ।
स्त्रियांच्या पुढती ठाके आनंदे चिरकोनिया ॥ ११ ॥
आवडे चंचळांना ते मजेने पाहु लागल्या ।
वानरी धैर्य पाहोनी हासले बलराम ते ॥ १२ ॥
बळी पुढे अता दुष्ट स्त्रियांना छेडु लागला ।
दाखवी गुद ते केंव्हा डोळ्यानें पालवी कधी ॥ १३ ॥
चेष्टा त्याच्या बघोनीया क्रोधले बलरामजी ।
द्विविदा मारिता दोंडा चुकवी अंग तेधवा ॥ १४ ॥
मधुघट कधी फोडी रामाला चिडवी असा ।
स्तिर्यांचे फाडिले वस्त्र बळीला हासु लागला ॥ १५ ॥
बळीला तुच्छ मानी तो बळीही क्रोधले तये ।
शत्रु हा लक्ष्यिला त्यांनी दुर्दशा देशिची तशी ॥ १६ ॥
मुसळा नांगरी हाती आपुल्या घेतले असे ।
द्विवीद शक्तीमान् तैसा उपटी झाड शिंदिचे ॥ १७ ॥
रामाच्या मारण्या माथी पळता फेकिले असे ।
अविचल बळी राहा वृक्षाला धरिले करी ॥ १८ ॥
सुनंदमुसळे मारी बळी तो मर्कटास त्या ।
कपीचे फुटले डोके रक्तही वाहु लागले ॥ १९ ॥
गेरूचा धब्धबा जैसा कपी तो सजला तसा ।
डोकेही फुटता त्यान वेदना नच मानिता ॥ २० ॥
दुसरा उपटी वृक्ष बळीच्या अंगि फेकि तो ।
कित्येक फेकिता वृक्ष शतखंड करी बळी ॥ २१ ॥
उपटी वृक्ष नी फेकी मारण्या झटतो तसा ।
वृक्षहीन असे झाले वन ते लढता तसे ॥ २२ ॥
संपता वृक्ष ते सव चिडला बहु तो कपी ।
शिळांची करि तै वृष्टी बळी त्यां ठिकर्या करी ॥ २३ ॥
अंती ताडापरी बाहू मुष्टि बांधोनि धावला ।
झपाटे बळिला तैसा प्रहार छातिशी करी ॥ २४ ॥
क्रोधले बलरामो नी हाताने स्कंधि मारिता ।
ओकला कपि तो रक्त पडला धरणीवरी ॥ २५ ॥
वार्याने हालते नौका तसा हा पडता कपी ।
वृक्ष नी टेकड्या सारे कंपायमान जाहले ॥ २६ ॥
लोक ते बोलले जय् जय् सिद्ध तैसे नमो नमः ।
ऋषी ते साधु साधू नी फुलांची वृष्टी जाहली ॥ २७ ॥
द्विवीद त्रासिले लोका म्हणोनी मारिता तया ।
द्वारकीं पातले राम प्रशंसा बहु जाहली ॥ २८ ॥