श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
बलराम व्रजीं जाता करूषनृप पौंड्रक ।
दूत धाडोनि कृष्णाला कळवी वासुदेव मी ॥ १ ॥
मूर्ख ते म्हणती त्याला तूचि श्रीवासुदेव तो ।
जन्मलो जग रक्षाया, मूर्ख तो समजे तसे ॥ २ ॥
मुलात खेळता बाळ राजाच्या परि वागतो ।
तसा लीला न जाणोनी द्वारकीं दूत धाडिला ॥ ३ ॥
दूत तो द्वारकीं आला बैसला त्या सभेत नी ।
कृष्णां कमलपत्राक्षां राजसंदेश बोलला ॥ ४ ॥
एक मी वासुदेवो तो दुसरा नच की कुणी ।
उद्धारा जन्मलो मीच न मानी वासुदेव तू ॥ ५ ॥
मूर्खत्वे धारिशी चिन्ह् सोडोनी शरणार्थ ये ।
न जरी मानिशी तैसा युद्धा सामोरि ये असा ॥ ६ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
मूढाचे ऐकता श्ब्द उग्रसेनादि वीर ते ।
मोठ्याने हासले सर्व प्पौंड्रका तेधवा नृपा ! ॥ ७ ॥
दूताला वदले कृष्ण सांग जा तुझिया नृपा ।
न त्यागी चक्र हे चिन्ह सोडील वधण्यास ते ॥ ८ ॥
जल्पसी ज्या बलाने ते पालथे मरतील नी ।
गिधाडे तोडिती तेंव्हा कुत्र्याला नमिती जसे ॥ ९ ॥
भृत्य निर्भत्सना ऐके जाता स्वामीस बोलला ।
कृष्ण स्वार रथीं होता काशिदेशास घेरिले ॥ १० ॥
आक्रमण बघोनियां पौंड्रका तो महारथी ।
दोन अक्षौहिणी सैन्य घेवोनी युद्धि पातला ॥ ११ ॥
काशिराज तया मागे तीन अक्षौहिणी सह ।
सहाय्या पातला तेंव्हा कृष्णे पौंड्रक पाहिला ॥ १२ ॥
शंखचक्र गदा पद्म शार्ङ्ग श्रीवत्स चिन्हही ।
खोटाचि कौस्तुभो लेई गळ्यात वनमालही ॥ १३ ॥
ध्वजीं चिन्ह गरुडाचे पीतअंबर नेसला ।
अमूल्य मुकुटो तैसा मकराकार कुंडले ॥१४ ॥
मंचकी नट ये जैसा खोटा तो सजला तसा ।
पाहिनी सोंग ते कृष्ण हासला खद्खदोनिया ॥ १५ ॥
शूला गदा परीघो नी शक्ती ऋष्टी नि तोमर ।
पट्टीश खड्ग नी बाण कृष्णासी फेकि शत्रु तो ॥ १६ ॥
( इंद्रवज्रा )
जाळी जसा तो प्रलयाग्नि प्राण्या
तसेचि कृष्णो बहु शस्त्र सोडी ।
काशी तसे पौंड्रक या नृपाचे
रथाश्व हत्ती बहु नष्ट झाले ॥ १७ ॥
ते उंट सारे खर माणसे ही
प्रत्येक झाले शत खंड जैसे ।
तो भूतनाथो क्रिडला तिथे की
उत्साहले वीर बघोनि यत्त्या ॥ १८ ॥
( अनुष्टुप् )
पौंड्राला वदले कृष्ण वदसी सोड चिन्ह हे ।
सोडितो चक्र हे आता अन्यही शस्त्र हे तसे ॥ १९ ॥
खोटेचि घेशी तू नाम नाव ते काढितो तुझे ।
वाचला तर तू येतो तुजसी शरणार्थ मी ॥ २० ॥
कृष्णाने सोडिता बाण रथ तो मोडला असे ।
चक्राने छेदिले शीर इंद्र जै गिरि छेदितो ॥ २१ ॥
तसेचि काशिराजाचे शीर छेदोनिया पुरा ।
फेकिले कमळा जैसा वारा तोडोनि फेकितो ॥ २२ ॥
या परी ढोंगी तो पौंड्रक काशिराजा सख्यासही ।
मारता पातला कृष्ण सिद्ध गाती कथामृता ॥ २३ ॥
परीक्षित् पौंड्रके राये वेष घेवोनि चिंतिले ।
ध्यासाने स्मरिले राय सारुप्य मिळले तया ॥ २४ ॥
काशीत राजद्वाराशी मंडीत शिर पाहता ।
संदेहे पाहती सर्व, कोणाचे शिर हे असे ॥ २५ ॥
कळता रडल्या राण्या लोकही रडले तसे ।
हाय हाय नृपा नाथा आमुचा सर्व नाश हा ॥ २६ ॥
सुदक्षणे तयेपुत्रे अंत्येष्ठी करुनी पुन्हा ।
मनात ठरवी ऐसे मारीन पितृघातकी ॥ २७ ॥
एकाग्रे शंकरा त्याने आचार्या घेउनी सवे ।
आराधिले मनी हेतू कृष्णाला मारितोच मी ॥ २८ ॥
वर माग तुझा काय ? प्रसन्ने शिव बोलता ।
मारण्या पितृघाती तो उपाय सांगणे म्हणे ॥ २९ ॥
वएदले शिव ते त्याला ब्राह्मणासह यज्ञि तो ।
ऋत्विग्भूता यजावे नी दक्षिणागीत तो तशा ।
अभिचार विधीनेच साध्य हेतूहि होय तो ॥ ३० ॥
असावा द्विज द्वेष्टा तो संकल्प साध्य होतसे ।
तेणे केला विधी सर्व शत्रुमारण याग हा ॥ ३१ ॥
होता पूर्ण अभीचार प्रकटे अग्निदेवता ।
तप्त तांब्यावरी केश मिशा दाढी नि नेत्र ते ॥ ३२ ॥
भ्रुकुटी उग्र नी तेढ्या जिभल्या चाटितो असा ।
नागवा फिरवी शूळ तयात अग्नि तो निघे ॥ ३३ ॥
ताडाच्या परि ते पाय चालता भूमिकंप हो ।
क्षणात द्वारकीं आला सवे कित्येक भूत ते ॥ ३४ ॥
जंगला लागता आग हरिणे पळती जशी ।
तसे ते द्वारकावासी भिवोनी धावु लागले ॥ ३५ ॥
कृष्णाच्यापाशि ते आले वदले रक्ष तू अम्हा ।
नगरा लागली आग सर्वची भस्म होतसे ॥ ३६ ॥
कृष्ण तो स्वजना पाही प्रार्थिती ओरडोनिया ।
हासुनी वदला त्यांना न भ्यावे रक्षितो तुम्हां ॥ ३७ ॥
अंतर्बाह्य असा ज्ञाता ऐशा कृत्त्येस जाणता ।
सुदर्शणास आज्ञापी प्रतिकार करावया ॥ ३८ ॥
( इंद्रवज्रा )
जाज्वल्य अग्नी जणु कोटि सूर्य
सुदर्शना या हरि सोडि तेंव्हा ।
आकाश दाही दिशिचहि सारा
ठेचोनि काढी अभिचार अग्नी ॥ ३९ ॥
( वसंततिलका )
अस्त्रो सुदर्शन करी बहुमान ऐसा
थोबाद फूट फुटुनी हततेज कृत्या ।
काशीत ती परतली उलटोनिं येता
जाळीयलाचि नृपती गुरुही तसाची ॥ ४० ॥
( इंद्रवज्रा )
काशीस आले हरिचक्र पाठीं
जेथे सभा हाट विशाल गेह ।
हत्ती खजाने अन धान्य कोठ्या
अश्वो रथो तेथे कितेक होते ॥ ४१ ॥
( अनुष्टुप् )
सर्वची सर्व ती काशी विष्णुचक्रेची जाळिता ।
भस्म ती सर्वची होता कृष्णाच्यापाशि पातले ॥ ४२ ॥
पुण्यश्लोक असा कृष्ण ऐकता त्याचि ही लीला ।
अथवा ऐकवी अन्यां तयाचे पाप संपते ॥ ४३ ॥