समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६५ वा

श्रीबलरामांचे व्रजगमन -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
नंदबाबादि लोकांना भेटण्या इच्छिता बळी ।
बैसता रथि नी गेले नंदबाबाचिये व्रजीं ॥ १ ॥
आतुरे गोप गोपिंनी हृदयी धरिले तयां ।
यशोदा नंद यांना तै रामाने वंदिले तदा ॥ २ ॥
घेता पोटाइ सारे ते वदले रक्षिता अम्हा ।
आशिर्वाद दिले त्यांनी अश्रुंनी न्हाविले बला ॥ ३ ॥
ज्येष्ठांना वंदिले रामे सानांनी राम वंदिला ।
वयानुसार ते सर्वां भेटले बलरामजी ॥ ४ ॥
कुणाला दिधला हात कुणी वक्षभेट नी ।
हासुनी बोलले कोणा विश्राम जाहला तदा ॥ ५ ॥
पातले गोप ते सर्व क्षेम ते पुसले तया ।
जयांनी त्यागिले सर्व कृष्णासी चित्त लाविले ।
प्रेमे गद्‌गद होवोनी रामाला पुसले तये ॥ ६ ॥
वसुदेवादिते बंधू क्षेम सर्वासि होय ना ।
तुम्ही तो पुत्रवान् झाले स्मरता का अम्हा कधी ॥ ७ ॥
भाग्यचि मारिला कंस केले स्वजन ते सुखी ।
हाही आनंद तैसाची सुरक्षित् स्थळी राहता ॥ ८ ॥
दर्शना पातल्या गोपी पाहता तृप्त जाहल्या ।
हासोनी वदल्या राजा ~ कृष्णाचे क्षेम होय ना ? ॥ ९ ॥
बंधु माता पिता यांना स्मरतो का मनी कधी ।
येईल आमुची त्याला आटहवे का कधी तरी ॥ १० ॥
बंधू माता पिता पत्‍नी पुत्र नी सोयरे तसे ।
बहीण पुत्रि ही आमी त्या साठी सर्व त्यागिले ॥ ११ ॥
आडविले तया तेंव्हा वदला ऋण ना फिटें ।
कोण स्त्री गोड बोला त्यां न विश्वास करी तया ॥ १२ ॥
( इंद्रवज्रा )
ग्रामीण गोपी अम्हि या अशा नी
     तेथील नार्‍या चतुरा तशा त्या
असोनि तैशा फसल्या कशा त्या
     का तोच त्यांचा फसला स्वभावे ॥ १३ ॥
( अनुष्टुप् )
आपणा करणे काय वदली तिसरी कुणी ।
दुसरे बोल गे कांही वेळ तो घालवावया ।
जर ना आठवी आम्हा तर या दुःखिची जग ॥ १४ ॥
आता त्या गोपिच्या दृष्टीं कृष्णाचे हास्य पाहणे ।
चाल आलिंगिणे सर्व आठवे रडली तशी ॥ १५ ॥
अनुनयी तसे श्रेष्ठ बोलले बलरामजी ।
कृष्णसंदेश देवोनी सात्विल्या सर्व गोपिका ॥ १६ ॥
चैत्र वैशाख हे मास सरले तेथ हे असे ।
गोपीत रमता रात्री प्रेमवर्धन जाहले ॥ १७ ॥
त्या वेळी गंध पद्माचा वायूत धरता पिणे ।
पोर्णिमाचांदण्या मध्ये वाळवंटी बळी बसे ॥ १८ ॥
वरुणे वारुणी पुत्रा धाडिता लाकडातुनी ।
पातली गंध ना मावे वनात तेथल्या पहा ॥ १९ ॥
गंध तो मधुधारांचा बलरामास पातला ।
गोपिंच्या सह तो जाता अयांचे पानही करी ॥ २० ॥
भोवती गायल्या गोपी मत्त भुंगेहि ते तसे ।
विव्हल नेत्र ते झाले आनंद त्या द्वयांचिये ॥ २१ ॥
गळ्यात वैजयंती नी आनंदे मत्त जाहले ।
झळके कुंडलो एक मुखीं घामहि शोभला ॥ २२ ॥
शक्तिमान् बलरामो तो यमुनाजीस बोलवी ।
जलक्रीडा करायाते परी ती नच पातली ।
पुन्हा ती पातली, क्रोधे बळीने हल मारिता ॥ २३ ॥
क्रोधोनी बोलला राम थांब तू गर्विणी अशी ।
करितो खंड ते सारे हलाचे टोक मारुनी ॥ २४ ॥
दटावी राम हे ऐसे भये चकित जाहली ।
बळीच्या चरणापाशी पडोनी प्रार्थु लागली ॥ २५ ॥
बलरामा महाबाहो भुलले मी अराक्रमां ।
शेषजी अंश रूपाने पातला जाणिले अता ॥ २६ ॥
भगवंत तुम्ही श्रेष्ठ नेणता चुकलेच मी ।
क्षमावे पातले पायी मजला सोडणे पहा ॥ २७ ॥
यमुना प्रार्थिता ऐसी बळीने क्षमिले तिला ।
हत्तीच्या परि तो तेथे क्रीडला गोपिच्या सवे ॥ २८ ॥
येता जळातुनी त्यांना नींलांबर नि हारही ।
आभूषणे तसे सर्व लक्ष्मीने दिधले पहा ॥ २९ ॥
बळीने लेवुनी वस्त्रे सुवर्णमाळ धारिली ।
अंगाराग करी तेंव्हा ऐरावतचि भासला ॥ ३० ॥
परीक्षित् ! आजही वाहे यमुना त्याच मार्गि ती ।
यशोगान जणू गाते अनंत बलरामचे ॥ ३१ ॥
गोपीत रमला राम समया भान ते नसे ।
अनेक रात्रिची एक भासली रमला असा ॥ ३२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पासष्टावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP