श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! एकदा सांब प्रद्युम्न चारुभान नी ।
गदादी राजपुत्रो हे फिराया वनि पातले ॥ १ ॥
खेळता तृष्णले सर्व पाण्याला शोधु लागले ।
विचित्र दिसला आड न पाणी जीव एक तै ॥ २ ॥
सरडा पर्वता ऐसा सर्वा आश्चर्य जाहले ।
दयार्द्र जाहले सर्व काढाया यत्नि लागले ॥ ३ ॥
दोरी वा वादिने त्याला बांधोनी ना निघेच की ।
श्रीकृष्णासी जाउनी सारे आश्चर्य सर्व बोलले ॥ ४ ॥
जगज्जीवन श्रीकृष्ण विहिरीपाशि पातले ।
सहजी काढिला त्यांनी बाहेर सरडा तदा ॥ ५ ॥
( इंद्रवज्रा )
स्पर्शे हरीच्या रुप पालटोनी
स्वर्गीय देहो मिळता तयाला ।
सोन्यापरी अंग सतेज झाले
अद्भूत वस्त्रे अन हार कंठी ॥ ६ ॥
जाणी मनी कृष्ण तरी विचारी
दावावया माणुसि भाव तैसा ।
तुम्ही महाभाग कुठोनि आले
दिव्यस्वरूपी जणु देवताची ॥ ७ ॥
तुम्हा अशी योनि मिळे कशाने
तुम्हा न शोभे अशि हीन योनी ।
वृत्तांत सारा जर युक्त वाटे
तरी तसा तो कथिणे अम्हाला ॥ ८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
कृष्णाने पुसता ऐसे सूर्यापरि किरीट तो ।
झुकवी माधवापायी पुढे तो वद ला असा ॥ ९ ॥
राजानृग म्हणाला -
राजाइक्ष्वाकुपुत्रो मी नृग नामे असे प्रभो ।
नामावळीत दात्यांच्या मम नाम असे जरी ॥ १० ॥
वृत्तींचे तुम्हि तो साक्षी त्रिकलज्ञ तुम्ही असा ।
न लपे आमुच्यापाशी आज्ञा जाणोनि सांगतो ॥ ११ ॥
पृथ्वीचे कण नी तारे वृष्टीचे थेंब जेवढे ।
तेवढ्या दिधल्या गाई दान मी स्वय की हरी ॥ १२ ॥
( इंद्रवज्रा )
दुधाळ श्रृंगा तरुणी गरीब
सुलक्षणा नी कपिलाच गाई ।
सुवर्ण श्रृंगा रजतो खुरासी
अलंकृता त्या दिधल्या अशा मी ॥ १३ ॥
जे विप्र पुत्रो गुणशीलवंत
तपस्वि नी पाठक वेदविद्या ।
अध्यापिती जे श्रुति वेद त्यांना
गाई अशा दान दिल्या प्रभोरे ॥ १४ ॥
सदासि कन्या घर अश्व सोने
चांदी नि हत्ती तिळपर्वते ती ।
शय्या नि रत्ने वसने रथोही
हे दान यज्ञे अन आड केले ॥ १५ ॥
( अनुष्टुप् )
अप्रतिग्रहविप्राची एक गाय चुकोनिया ।
पातली मम गाईत नेणे मी दान ती दिली ॥ १६ ॥
घेवोनी विप्र ती गाय जाताचि पहिला बघे ।
राजाने दिधली माते वदता दुसरा तया ॥ १७ ॥
भांडता पातले आणि आत्ताच दान घेतली ।
भिक्षू द्विज वदे ऐसा चोरिली कावदे दुजा ।
द्वजांचे ऐकुनी शब्द भ्रमीत चित्ति जाहलो ॥ १८ ॥
धर्मसंकट जाणोनि विनये वदलो तयां ।
मी देतो लक्ष गाई त्या परी द्या मज ही तुम्ही ॥ १९ ॥
द्विज सेवक मी आहे अज्ञाने चूक जाहली ।
क्षमावे मजला आणि नरकीं वाचवा मला ॥ २० ॥
गेला तो वदुनी की मी बदली नच घे मुळी ।
गेला दुजाहि तो विप्र न घे दान वदोनिया ॥ २१ ॥
जै आयु संपली माझी पातले यमदूत तै ।
नेले मज यमापाशी यमाने पुसले मला ॥ २२ ॥
पापाचे फळ आधी का पुण्याचे आधि इच्छिशी ।
लाभेल तेजवान् लोक पुण्यवंत तसाच तू ॥ २३ ॥
तेंव्हा मी वदलो देवा पापाचे फळ दे मला ।
तेंव्हाचि सरडा झालो पडलो येथ येउनी ॥ २४ ॥
उदार दानि मी भक्त इच्छी मी तव दर्शन ।
तुझ्या कृपे स्मृती ऐशी जागती राहिली असे ॥ २५ ॥
( वसंततिलका )
योगीश्वरोहि भजती तुजला श्रुतीने
ना जाणिले मज कशा दिसला हरी तू ।
कार्यात मी फसुनिया बहु अंध होतो
जो या भवात सुटला तयि भेटसी तू ॥ २६ ॥
( अनुष्टुप् )
देव देवा जगन्नाथा गोविंदा पुरुषोत्तमा ।
नारायणा हृषीकेशा अच्युता पुण्यश्लोक तूं ॥ २७ ॥
स्वर्गात चाललो कृष्णा आज्ञा द्यावी मला प्रभो ।
कृपा सदैव ती व्हावी चित्त राहो पदास या ॥ २८ ॥
अनंत ब्रह्म शक्ती तू सर्व जीवात राहसी ।
नमितो वासुदेवाला स्वामी योगेश्वरा सदा ॥ २९ ॥
परिक्रमा नृगे केली चरणी शिर टेकिले ।
विमानी बसला एला आज्ञा घेवोनि तेधवा ॥ ३० ॥
नृग जाता कुटूंबीया द्विजाचे र्पेम सांगण्या ।
क्षत्रीयधर्म बोधाया श्रीकृष्ण बोलले असे ॥ ३१ ॥
अग्नि समान तेजस्वी असोनी अल्पसेहि ते ।
द्वजाचे न पचे द्रव्य तो हा राजा कशातला ॥ ३२ ॥
हलाहलां न मी मानी तया औषध ते असे ।
द्विजधन असे वीष नच औषध त्या मुळी ॥ ३३ ॥
भक्षिता बाधते वीष विझतो अग्निही जलें ।
अरणी द्विजद्रव्याची समूळ जाळिते कुळा ॥ ३४ ॥
संमती नसतआ घेता त्रासिते तीन त्या पिढ्या ।
बळाने लाटिता द्रव्य त्रासिते दशही पिढ्या ॥ ३५ ॥
अंध तो राजलक्ष्मीने जाणून द्विजद्रव्य ते ।
घेइ त्या समजावा की स्वताच नर्क गाठिला ॥ ३६ ॥
उदार हृदयी विप्र तमाची वृत्ति छेडिता ।
तयाच्या स्र्हुपाताने जेवढे कळ धूळिचे ॥ ३७ ॥
भिजती तेवढी वर्षे सत्व जो हारितो अशा ।
उताविळ नृपा लाभे नर्क जो कुंभिपाक तो ॥ ३८ ॥
दुजांचे ऐकुनी शब्द वृत्ती वा धन जे द्विजी ।
लाटितो जन्म त्यां लाभे विष्टेत कीट होउनी ॥ ३९ ॥
म्हणोनी इच्छितो मी की चुकोनी कधिही असे ।
द्विजाचे धन ना यावे अल्पायू भोगणे असे ।
पराजय तसा होतो सापाचा जन्मही मिळे ॥ ४० ॥
म्हणोनी ऐकणे सर्व अपराध असोनिही ।
न द्वषा ब्राह्मणा केंव्हा शापिताही नमा तया ॥ ४१ ॥
त्रिकाल वंदितो त्यांना तुम्ही ही त्यां नमा तसे ।
आज्ञाभंग घडे जेंव्हा न क्षमा दंड देइ मी ॥ ४२ ॥
चोराने चोरिता त्याला अधःपतन ना चुके ।
नृगा जै सहजी शिक्षा लाभली ते तसे घडे ॥ ४३ ॥
असे वोलोनि भगवान् द्वारकावासि त्या जना ।
आपुल्या मंदिरा माजी गेले तेंव्हा प्रवेशुनी ॥ ४४ ॥