समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६३ वा

भगवान कृष्णाबरोबर बाणासुराचे युद्ध -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
संपला पावसाळाही न पत्ता अनिरुद्धचा ।
घरचे लोक ते सर्व शोकाकूलित जाहले ॥ १ ॥
नारदे एकदा सर्व कथिली घडली कथा ।
कृष्णाने यदुवंशाने चढाई केलि तेधवा ॥ २ ॥
सांब सारण नी नंद प्रद्युम्न गद सात्यकी ।
सैन्य अक्षौहिणीबारा कृष्ण रामासवे तिथे ॥ ३ ॥
रचोनी व्यूह त्या सर्वे शोणीतपूर घेरिले ॥ ४ ॥
उद्याने बुरुजे द्वारे सैन्याने फोडिली तसे ।
क्रोधोनी पातला बाण तेवढे सैन्य घेउनी ॥ ५ ॥
बाणासुरा कडोनीया प्रत्यक्ष शिव कार्तिक ।
गणांच्या सह ते आले लढाया रामकृष्णसी ॥ ६ ॥
घोरयुद्ध असे झाले पाहता रोम ठाकती ।
प्रद्युम्न कार्तिकेयासी लढले कृष्ण नी शिव ॥ ७ ॥
कुभांड कूपकर्णासी लढले बलराम ते ।
सांब त्या बाणपुत्रांसी बाणासी सात्यकी लढे ॥ ८ ॥
ब्रह्मादि देवता सिद्ध गंधर्व अप्सरा तशा ।
विमानी चढुनी आल्या युद्ध ऐसे पहावया ॥ ९ ॥
शंकरानुचरो भूते प्रेत प्रथम गुह्यक ।
डाकिनी यातुधान् तैसे वेताळ नी विनायिका ॥ १० ॥
मातृगण पिशाच्चे नी कूष्मांड ब्रह्मराक्षसां ।
शार्ङ्‍गधनूस योजोनी अचुते मार मारिले ॥ ११ ॥
कृष्णा अन्यान्य शस्त्राने वेधिले शिवशंकरे ।
कृष्णाने सहजी सर्व केले शांत तदा पहा ॥ १२ ॥
योजी ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्रा वायूस पर्वतास्त्र ते ।
पर्जन्य अग्निसी तैसे नैजो ते पाशुपातला ॥ १३ ॥
जांभई अस्त्र श्रीकृष्णे योजिले शंकरा पुन्हा ।
युद्ध सोडोनि तो देई जांभया सारख्या तशा ।
हरा सोडोनिया कृष्णे सैन्यसंहार मांडिला ॥ १४ ॥
प्रद्युम्न इकडे बाणें केले घायाळ कार्तिका ।
अंगांगी पातले रक्त पळाले मयुरासह ॥ १५ ॥
बळीच्या मुसळी मारे कुभांड कूपकर्णक ।
पडले रणभूमीसी सेना सर्वत्र पांगली ॥ १६ ॥
पाहता क्रोधला दैत्य चिडोनी सोडि सात्यकी ।
लढाया धावला वेगे कृष्णाच्या वरि तेधवा ॥ १७ ॥
पाचशे धनु तो घेई हजार हात योजुनी ।
हजार लाविले बाण एकेका धनुसी द्वय ॥ १८ ॥
परंतु भगवान् कृष्णे सर्व ते बाण नी धनू ।
सारथी रथिचे घोडे तोडोनी शंख फुंकिला ॥ १९ ॥
कोटरा नावची देवी नागवी केश सोडिता ।
रक्षाया पुत्र तो बाण कृष्णा समिप पातली ॥ २० ॥
दृष्टी न टाकिता कृष्णे अन्यत्र पाहिले असे ।
बाण तो रथहीनोची नगरीं पातला तदा ॥ २१ ॥
त्रिपाद त्रिशिरे ऐसा शंकरे ज्वर सोडिला ।
दाही दिशास जाळोनी कृष्णाच्या वरि धाडिला ॥ २२ ॥
ज्वर तो आपुला कृष्णे त्याच्या वरिच सोडिला ।
महेश वैष्णवी ऐसे ज्वर ते लढु लागले ॥ २३ ॥
वैष्णवीज्वर तेजाने महेश्ज्वर त्रासला ।
पळाला भिवुनी चिर्के न त्राता त्याजला मिळे ।
तेधवा नम्र होवोनी कृष्णाला प्रार्थु लागला ॥ २४ ॥
ज्वर म्हणाला -
( शालिनी )
ऐशी शक्ती अंत ना तो तुझा की
     सर्वात्मा तू केवळ ज्ञानमूर्ती ।
श्रुतिंना जे वर्णिता ये न ऐसे
     ऐशा ब्रह्मा मी नमीतो सदाचा ॥ २५ ॥
कालो दैवो कर्म जीवस्वभाव
     द्रव्यो क्षेत्रो प्राण आत्मा विकार ।
या संघाने बीज पेरोनि देसी
     माया सारी ही तुझी, मी नमीतो ॥ २६ ॥
नाना भावे खेळशी खेळ ऐसा
     साधूदेवा धर्मकार्ये करीशी ।
हिंसी ऐसे दैत्यही मारतोशी
     घेशी रूपा भारत्यागा धरेच्या ॥ २७ ॥
तापे मी या रे ज्वरे त्रासलो की
     शांतो उग्रोतेज ते हे तुझेची ।
राही तापो देहधार्‍या तदाचा
     जो पर्यंतो येत ना या पदासी ॥ २८ ॥
श्रीभगवान म्हणाले -
( अनुष्टुप् )
त्रिशिरा निर्भयो राही प्रसन्न जाहलो तुला ।
स्मरे संवाद हा त्याला तुझे ना भय ते कधी ॥ २९ ॥
वदता कृष्ण हे ऐसे गेला अन्मुनि तो ज्वर ।
रथी बैसोनि तेंव्हा तो लढाया बाण पातला ॥ ३० ॥
सहस्र बाहुशी तेणे सहस्र शस्त्र घेतले ।
चक्रपाणीवरी क्रोधे तिरांचे वृष्टी तो करी ॥ ३१ ॥
कृष्णाने पाहिली वृष्टी तदा तो चक्र सोडुनी ।
लागला बाहु छेदाया फांद्या त्या तोडणे तसे ॥ ३२ ॥
तुटल्या बाहु त्या तैशा शंकरे पाहिले तदा ।
कृष्णाचा जवळी येता लागले स्तुति गावया ॥ ३३ ॥
भगवान रुद्र म्हणाले -
तूचि ब्रह्म परंज्योती मंत्राने झाकल्या रुपी ।
निर्विकार तुझ्या रूपा महात्मे नित्य जाणिती ॥ ३४ ॥
( इंद्रवज्रा )
नाभी नभो अग्नि मुखो तुझे ते
     ती वीर्य पाणी शिर स्वर्ग शोभे ।
मी तो अहंकार नि चंद्र चित्त
     सूर्यो तुझे नेत्र नि इंद्र बाहु ॥ ३५ ॥
वनस्पती रोम नि मेघ केस
     प्रजापती लिंग हृदेय धर्म ।
त्या लोकपाला तुलना जयाची
     तो तू स्वताची पुरुषो असा की ॥ ३६ ॥
रक्षावया धर्मचि जन्मला तू
     अभ्यूदया या जगतास तैसा ।
प्रभाव घेता अम्हि सर्व ऐसे
     पाळीतसो भूवन् सात देवा ॥ ३७ ॥
तू एक आद्यो पुरुषोऽद्वितीय
     तुर्येतही तू असशी हरी रे ।
प्रकाशिसी सर्व जिवास तूची
     मायारुपाने मग भेद होती ॥ ३८ ॥
जीवास दावी रुप सूर्य तोची
     झाके ढगांची स्वयि सावलीने ।
तसाचि जीवा असशी प्रकाश
     गर्वे तुला ना शकतीचे पाहू ॥ ३९ ॥
( अनुष्टुप् )
मायेने मोहिता जीव घर-दारात गुंतती ।
स्वताच उडि घेवोनी बुडती दुःखसागरी ॥ ४० ॥
कृपेने लाभतो देह जगती माणसास हा ।
न भजे तुजला तोची स्वताच फसतो तसा ॥ ४१ ॥
जीवांचा प्रीय तू आत्मा मृत्यूचा घास देह हा ।
विषयीं सुख जो पाही विष पी त्यागुनी सुधा ॥ ४२ ॥
मी ब्रह्मा देवता सर्व तुलाचि शरणागत ।
सर्वांचा प्रीय तू आत्मा सर्वांचा ईश्वरो तसा ॥ ४३ ॥
( इंद्रवज्रा )
तू सर्व हेतू जगतास या नी
     तू इष्ट देवो सम शांत आत्मा ।
तू आश्रयो एकलाची जगासी ।
     भुक्त्यर्थ आम्ही भजतो तुला की ॥ ४४ ॥
बाणासुरो हा मम प्रीय भक्त
     मी तो दिलासे वर श्रेष्ठ त्याला ।
प्रल्हाद याला ज‍इ मानिशी तू
     प्रसाद याला त‍इ देइ देवा ॥ ४५ ॥
श्रीभगवान् म्हणाले -
( अनुष्टुप् )
मानितो तुमची इच्छा तसा निर्भय मी करी ।
जाणुनी तुमचा हेतू याच्या मी बाहु तोडिल्या ॥ ४६ ॥
जाणी मी बळिचा पुत्र म्हणोनी नच मारिला ।
प्रल्हादा दिधला शब्द वंश मी नच खंडितो ॥ ४७ ॥
गर्व तो संपवायाते भुजा मी कापिल्या पहा ।
पृथ्वीचा भार जी सेना सर्व मी मारिली असे ॥ ४८ ॥
राहिल्या चार त्या बाहू सदाचि राहती अशा ।
तुमच्या पार्षदांमध्ये श्रेष्ठ हो भय ना कदां ॥ ४९ ॥
अभयो लाभता ऐसे असुरे कृष्ण वंदिला ।
अनिरुद्ध उषा यांना रथात आणिले तये ॥ ५० ॥
हराची संमती घेता अनिरुद्ध उषेस त्या ।
सालंकृत करोनीया अक्षौणी सैन्य घेउनी ।
पातले सर्वच्या सर्व द्वारकापुरि तेधवा ॥ ५१ ॥
( इंद्रवज्रा )
द्वारापुरी ती सजली तशीच
     संमार्जिले चंदन सर्व मारी ।
झेंडे पताका बहु लाविल्या नी
     सामोरि आले द्विज बंधु तेंव्हा ।
शंखानकाचा ध्वनि सर्व झाला
     प्रवेशला कृष्ण स्वराजधानी ॥ ५२ ॥
( अनुष्टुप् )
कृष्ण नी शंकरो यांची युद्धाची विजयी कथा ।
सकाळी स्मरतो त्याला न कधीच पराजय ॥ ५३ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर त्रेसष्ठावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP