श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
एकेका पत्निला झाले कृष्णाला दश पुत्र ते ।
बल तेजादि रूपाने कृष्णची दुसरे जसे ॥ १ ॥
प्रत्येक पत्निला वाटे कृष्ण हा आपुल्या घरी ।
राहतो नित्य ही ऐशी कृष्णाची महिमा तशी ॥ २ ॥
( वसंततिलका )
ते पद्मकोष वदनो नयनी विशाल
सप्रेम हास्य बघणे मधु शब्द त्याचे ।
ऐकोनि नित्य रमती बहु आत्मबोधी
श्रृंगार आदि करण्या नच भान राही ॥ ३ ॥
सोळाहजार अधिका निज मंद हास्ये
वक्रो बघोनि नयने करिती इशारे ।
जो पूर्णचे कुशल कामकलेत ऐसा
नाही कधीच शकल्या हरि देतवू त्या ॥ ४ ॥
प्राप्त्यर्थ कृष्ण न कळे विधि देवतांना
तो त्या स्त्रियांस मिळला रमण्या सदाचा ।
आनंद प्रेम नित वृद्धित हो तसे त्या
हासोनि नित्य बघती नव संगमाला ॥ ५ ॥
दास्या असोनि स्वयची करितात सेवा
पूजा नि तांबुल तसे पद देपिणेही ।
स्नानादि भोजन नि चंदन गंध देणे
नी पुष्पहार करणे स्वयची कराने ॥ ५ ॥
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! वदलो की ते प्रत्येकी दश पुत्र ते ।
आठ त्या पट्टराण्यांचे विवाह वदलो असे ।
प्रद्युम्न आदि पुत्रांचे सांगतो वर्णने पुढे ॥ ७ ॥
प्रद्युम चारुदेष्णो नी चारुदेह पराक्रमी ।
चारुगुप्त सुदेष्णो नी सुचारु भद्रचारु तो ॥ ८ ॥
चारुचंद्र विचारु नी दहावा पुत्र चारु तो ।
दहा हे रुक्मिणीपुत्र प्रतिकृष्णचि ते जसे ॥ ९ ॥
भानु सुभानु स्वर्भानू प्रभानू भानुमान् तसा ।
चंद्रभानू बृहद्भानू श्रीभानू अनिभानु नी ॥ १० ॥
दहावा प्रतिभानू हे सत्यभामास पुत्र की ।
सांबादी जांबवंतीचे सर्वात लाडके दहा ॥ ११ ॥
सांब सुमित्र पुरुजित् शतजित् विजयो तसे ।
सहस्रजित् चित्रकेतु वसमान् द्रविडो क्रतु ॥ १२ ॥
वीरचंद्रो अश्वसेनो चित्रगु वेगवान् वृष ।
आम शंकु वसू तैसे सत्याचे कुंति तेजवान् ॥ १३ ॥
श्रुत कवी वृषो वीर सुबाहू भद्र शांति नी ।
दर्श नी पूर्णमासो नी कालिंदी सुत सोमको ॥ १४ ॥
लक्ष्मणा गर्भिचे सिंह प्रघोष गात्रवान् बल ।
ऊर्ध्वगो प्रबलो ओज महाशक्ती सहो तसा ।
दहावा जाहला पुत्र अपराजित नावचा ॥ १५ ॥
मित्रविंदेस अनिलो व्रक हर्ष नि वर्धनो ।
अन्नाद क्षिधु नी वन्ही महाश गृध्र पावनो ॥ १६ ॥
संग्रामजित् बहत्सेनो शूरो प्रहरणो जय ।
अरिजित् सत्यको वाम आयू भद्र सुभद्र हे ।
भद्राचे पुत्र हे ऐसे दश नाम तयांचिये ॥ १७ ॥
शिवाय पट्टराणीच्या सोळा हजार शंभर ।
रोहिणी आदि त्या पत्न्या तयांना दिप्तिमान् तसा ।
ताम्र तप्तादि प्रत्येकी दशची दश पुत्र ते पहा ॥ १८ ॥
प्रद्युम्नास रती पत्नी शिवाय रुक्मिपुत्रि ती ।
रुक्मवतीहि वरिली अनिरुद्ध तिचाच तो ।
करोडो जाहली संख्या प्रपौत्र आदिची पुढे ॥ १९ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
रणात रुक्मिला कृष्णे केलेसे अवमानित ।
कन्या तेणे दिली कैसी कृपया सांगणे अम्हा ॥ २० ॥
काळास जाणिता तुम्ही तुम्हा काय न ठावुक ।
योग्याला दिसते सर्व दूर वा बहु काळचे ॥ २१ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
प्रद्युम्न मूर्तिमान् कामो वरमाला स्वयं गळी ।
घाली रुक्मवती त्याच्या प्रद्युम्ने, वीर जिंकिले ॥ २२ ॥
क्रोधाग्नी रुक्मिच्या चित्ती तरी भाच्यास पुत्रि ती ।
दिधली, र्तुक्मिणी लागी प्रसन्न करण्या तदा ॥ २३ ॥
चारुमती असे कन्या सुनेत्रा रुक्मिणीस जी ।
बली जो कृतवर्माचा याने ती वरीली असे ॥ २४ ॥
जुने वैर असोनीया रुमीने नात रोचना ।
दिधली अनिरुद्धाला प्रतिकूल असोनिया ॥ २५ ॥
अनिरुद्ध विवाहास राम कृष्ण नि रुक्मिणी ।
प्रद्युम्न सांब आदी ते पातले भोजकोटि तै ॥ २६ ॥
निर्विघ्न संपता कार्य ल्कलिंगनृपती तदा ।
रुक्माला वदला रामा फासे खेळून जिंकिणे ॥ २७ ॥
राजा रे बलरामाला नव्हते येत फास ते ।
नृपांनी लाविता फूस दोघां खेळात गुंतिले ॥ २८ ॥
शत नी दशसहस्र मोहरा लाविता बळी ।
जिंकिला रुक्मिने तेंव्हा हासती अन्य भूपती ।
कलिंग हासता राजा ! चिडले बलराम ते ॥ २९ ॥
मोहरा लक्ष लावोनी खेळता रुक्मी डाव तो ।
बळीने जिंकिला तेंव्हा मी जिंके रुक्मि बोलला ॥ ३० ॥
क्रोधले बलरामो जै भरती सागरास ये ।
मोहरा त्या दहा कोटी लावोनी खेळले बळी ॥ ३१ ॥
याही वेळी बळी जिंके तरीही रुक्मि तो वदे ।
कलिंगे न्यय तो द्यावा विशेषज्ञ ययात ते ॥ ३२ ॥
आकाशवाणी तै झाली धर्मपूर्वक खेळ हा ।
रामाने जिंकिला सत्य खोटे रुक्म वदे तसा ॥ ३३ ॥
रुक्मीचा मृत्यू तो आला राजाने फूस लाविली ।
वाणी दुर्लक्षिली त्यांनी बलरामास हासले ॥ ३४ ॥
वदले शेवटी तुम्ही वनीचे गोपची खरे ।
तुम्हास काय ते ज्ञात राजांचा खेळ हा असे ।
फासे तीर तुम्हा काय माहीत फेकणे कसे ॥ ३५ ॥
रुक्मीचे ऐकता बोल क्रोधले बलराम नी ।
मुद्गरा उचलोनीया रुक्मीला ठार मारले ॥ ३६ ॥
कलिंग विचकी दात परी पाहोनि रंग तो ।
पळाया लागता त्याचे बळीने दात पाडिले ॥ ३७ ॥
अन्य राजे तयांचेही मोडिले हात पाय ते ।
रक्ताने भिता तैसे पळाले तेहि तेथुनी ॥ ३८ ॥
परीक्षित् भगवान् कृष्ण कांही न बोलले तदा ।
जेणे त्या त्या रुक्मिणी - रामा वाईट वाटणे नको ॥ ३९ ॥
( इंद्रवज्रा )
विवाह झाला अनिरिद्धचा नी
शत्रुस सार्या वधिले बळीने ।
तो रोचनानी अनिरुद्ध सारे
रथेचि आले पुरि द्वारकी त्या ॥ ४० ॥