समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६० वा

श्रीकृष्ण-रुक्मिणी संवाद -


Download mp3

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
सुखाने एकदा बैसे मंचकी तो जगद्‍गुरु ।
रुक्मिणी पाय चेपी नी सख्या पंखाहि ढाळिती ॥ १ ॥
परीक्षित् । शक्तिमान् कृष्ण खेळता रचि विश्व हे ।
घालण्या धर्ममर्यादा यदूच्या कुळि जन्मला ॥ २ ॥
चांदवे त्या महालात मोत्यांच्या झालरी तशा ।
रत्‍नांचे दीपही तेथे सदैवचि प्रकाशती ॥ ३ ॥
जाई नी जुइचे हार गंधाने दाटले तिथे ।
गुंजती भृंग ते नित्य चंद्राचे चांदणे असे ॥ ४ ॥
गंध तो पारिजाताचा वायू तो पसरी पहा ।
धूपाचा धूर नी गंध बाहेर येतसे तदा ॥ ५ ॥
स्वच्छ दुग्धापरी शय्यी मंचकी राजला हरी ।
विश्वाचा स्वामि तो कृष्ण रुक्मिणी सेवि त्या पदा ॥ ६ ॥
रत्‍नांकित अशी दांडी पंख्याची घेउनी करी ।
हालवी रुक्मिणी तेव्हा करी सेवा अशी स्वयें ॥ ७ ॥
( वसंततिलका )
हातात अंगठि नि कंकण शोभले तै
     पायात ही नुपुर ती झूणझूणतात ।
लाली स्तनास दिसते हळु केशराची
     ती मेखळा हलतसे करि ऐशि सेवा ॥ ८ ॥
ती रुक्मिणी विलसते मणि कुंडलांनी
     श्रीयेचिया मुखिसुधा मधु हास्य तैसे ।
जाणी मनात हरिला अवतार ऐसा
     सेवा बघून हरि तो वदला प्रियेला ॥ ९ ॥
श्री भगवान् म्हणाले -
( अनुष्टुप् )
राजपुत्री तुझ्याशी ते ऐश्वर्यवंतही नृप ।
बलवान् रुपवान् ऐसे होते इच्छीत लग्न की ॥ १० ॥
वाग्‌निश्चय पिता बंधू यांनी तो सोडिला असे ।
त्यागिता सर्व ते श्रेष्ठ मजला वारिलेस तू ॥ ११ ॥
जरासंधादिका भेणे समुद्रीं राहिलो अम्ही ।
थोरांसी वैर ते आहे राज्याचाही न वारसा ॥ १२ ॥
आमुचा मार्ग तो काय लोकां माहित तो नसे ।
अनुनयो नसे स्त्रीशी क्लेश त्यांना पडे तसा ॥ १३ ॥
निष्कांचन असे आम्ही नव्हते पुढती नुरे ।
धनवान् नेच्छिती आम्हा प्रेम सेवा न अर्पिती ॥ १४ ॥
सम रूप कुलो द्रव्य तेथ मैत्री नि लग्न हो ।
श्रेष्ठत्वा अधमो यांशी न व्हावे मुळि ते तसे ॥ १५ ॥
वैदर्भी तू न जाणोनी वरिले स्तुती ऐकता ।
मी तो भिक्षू गुणहीन प्रशंसा खोटि ती असे ॥ १६ ॥
अनुरूप असा श्रेष्ठ आताही वरि क्षत्रिय ।
आशा सर्व पुर्‍या होती गाठणे वीर तो तसा ॥ १७ ॥
शिशुपाल जरासंध शाल्व नी दंतवक्र तो ।
रुक्मीही द्वेषितो आम्हा ठावुक काय ते तुला ? ॥ १८ ॥
बल पौरुष यांनी ते मदांध सर्व जाहले ।
हारण्या गर्व तो त्यांचा तुजला मी हरीयले ॥ १९ ॥
उदासीन असे आम्ही स्त्री द्रव्य पुत्र नेच्छितो ।
दीपशिखापरी साक्षी साक्षात्कारेचि धन्य हो ॥ २० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् ! क्षणही एक न त्यागी कृष्ण तो तिला ।
जाहला गर्व हा तीस म्हणोनी बोलले असे ॥ २१ ॥
( इंद्रवज्रा )
त्रिलोकस्वामी वदले असे ते
     अत्यंत झाली भयभीत चित्ती ।
उरी भरे ती धडकी तशी नी
     शोकार्णवासी रडता बुडाली ॥ २२ ॥
टोची भुमीला नख कोवळे ते
     वक्षस्थळा अश्रु धुवून गेले ।
दुःखे तिचा तो भरलाही कंठ
     अधोमुखे ती तशि तिष्ठली की ॥ २३ ॥
( वसंततिलका )
झाली व्यथीत भयभीत नि शक्ति गेली
     ती कंकणेनि चवरी पडली भुमीसी ।
क्षीणे मती नि पडली मग मूर्च्छिता ती
     केळी पडे धरणिशी जणु वायु येता ॥ २४ ॥
( अनुष्टुप् )
न नेई हासण्यावारी प्रेमाने पडली अशी ।
कृष्णाने पाहता प्रीया हृदयी प्रेम दाटले ॥ २५ ॥
चतुर्भुज उठे तैसा उचली आपुली प्रिया ।
बांधिले मोकळे केस पुशी मुख स्वये करे ॥ २६ ॥
अश्रूंनी स्तन नी नेत्र भिजले पुसिले करें ।
अनन्य प्रेमभावाने रुक्मिणी कवटाळिली ॥ २७ ॥
सांत्वनो आश्रयो तोची भक्ताला एकमात्र की ।
अवस्था पाहता तैशी बोलला रुक्मिणीस तो ॥ २८ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
ना, ना, प्रिये रुसू ऐशी कळाले प्रेम हे तुझे ।
प्रिये मी प्रेम बोलाते ऐकण्या छेडिले तुला ॥ २९ ॥
इच्छिले प्रणयी लाल ओठांना पाहणे मनीं ।
कटाक्ष टाकिता नेत्रे भुवया वेड लाविती ॥ ३० ॥
प्रिये जे दिन रात्रीस राबती त्यास त्यां घरी ।
अर्धांगी एकची होय, सुखाचे क्षण घालवी ॥ ३१ ॥
समश्लोकीमध्ये समानार्थी श्लोक नाही ॥
श्रीशुकदेव सांगतात -
कृष्णाने प्राणप्रीयेला बोलोनी समजाविता ।
सलज्ज हासली प्रीया दृष्टीने पाही श्रीहरी ।
मुखारविंद कृष्णाचे बोलली निरखोनिया ॥ ३३ ॥
रुक्मिणी म्हणाली -
( वसंततिलका )
ना मी तुम्हास अनुरूप गुण नी रुपाने
     नाही बरोबरि तुम्हा करु मी शके की ।
तुम्ही गुणातित प्रभो प्रकृती असे मी
     अज्ञानी ते भटकती मम पाठि मागे ॥ ३४ ॥
स्वामी कशी करु तुळा वदता तुम्ही की
     येथे लपोनि बसलो, गुणराज तुम्ही ।
आत्मस्वरूपि वसता अरि इंद्रियांचे
     अज्ञानि ते नृप असो नच तुम्हि तैसे ॥ ३५ ॥
न मार्ग ना करितसा पुरुषी क्रिया नी
     ते सत्यची नरपशू नच जाणती ते ।
जे चालती पथ तुझा अतिश्रेष्ठ तेची
     ऐश्वर्य शक्ति तुझि ती नच बोलणे की ॥ ३६ ॥
दारिद्य ते वदसि जे तुचि श्रेष्ठ वस्तू
     ब्रह्मादि देव सगळे तुज वंदिती की ।
भक्तास तू प्रिय तसा तुज भक्त प्रीय
     द्रव्येचि अंध असता यम वाट पाही ॥ ३७ ॥
तू ते समस्त पुरुषार्थ नि ते फलो ही
     ज्ञानी म्हणोनि भजती त्यजुनी अहंता ।
त्यांनाचि तो घडतसे सहवास ऐसा
     जे इंद्रियात रमती नच त्या मिळे हे ॥ ३८ ॥
भिक्षूक गाति तुज ते मुनि साधु संत
     दुष्टासही कधि मनी नच त्रास देती ।
मी जाणिले हरि तुम्हा तुम्हि जीव जीवा
     ब्रह्मादि देव त्यजुनी वरिले तुम्हा मी ॥ ३९ ॥
नाही कळे मजसि की भय काय तुम्हा
     आणीक येथ लपलो वदता असत्य ।
शार्ङ्‍गधनूस धरिता मज आणिले की
     गर्जोनि तै पशुपरी नृप ते पळाले ॥ ४० ॥
जे चालती पथ तुझा बहु कष्ट त्यांना
     पृथू ययाति भरतो गय अंग
सोडोनि राज्य तव घोर तपोचि केव्हा
     यालाही कष्ट म्हणणे नच युक्त देवा ॥ ४१ ॥
तू बोलशी वरि कुणा गुणि भूप त्यासी
     येता पदास करिशी भय मुक्त तू तो ।
ती कोण स्त्री मज अशी परिभाग्यशाली
     मृत्यू जरादि भय ते तिजला मिळेना ॥ ४२ ॥
आत्मा नि स्वामि जगता हरि एकटा तू
     मी शोधुनी अनुरुपा वरिले तुम्हाला ।
नाही मला भिती तशी भव सागराची
     मी इच्छिते तव पदा भ्रम नाशिण्यासी ॥ ४३ ॥
बैलासमान घरि जे करितात कष्ट
     ओझे खरा परि शिरी धरितात नित्य ।
दासा परी करिति ते नृप लाड स्त्रीशी
     ब्रह्मादि गाति गुण तो तव अच्युता रे ॥ ४४ ॥
भासे वरी तनु जरी अशि साजरी ती
     ते आत रक्त मल मूत्र नि कीट वायू ।
ति मूर्ख स्त्री म्हणतसे पति हा पहा की
     त्यांना कधी न मिळती चरणारविंद ॥ ४५ ॥
आत्मा तुम्ही असुनिया नच देही दृष्टी
     तुम्ही उदास मज हो नित पादसेवा ।
वृद्ध्यर्थ सृष्टि बघता गुण त्या रजाने
     तेंव्हा तुम्हीच मजला बहु बोधिता की ॥ ४६ ॥
( अनुष्टुप् )
अनुरूप वरी कोणी वदता मधुसूदना ।
काशीनरेश अंबेच्या परि त्या दुसर्‍या असो ॥ ४७ ॥
कुलटा धुंडिते नित्य विवाहोत्तर ही बहू ।
चतुरे नच ठेवावी तेणे दुःखचि लाभते ॥ ४८ ॥
समश्लोकीमध्ये समानार्थी श्लोक नाही ॥ ४९ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
ऐकण्या हेच ते सर्व तुला मी टोचिले असे ।
व्याख्या जी मम शब्दा तू लाविली युक्त ती असे ।
इच्छिशी सर्व ते लाभे बंधमुक्त करावया ॥ ५० ॥
पुण्यमयी तुझे प्रेम पातिव्रत्य बघीतले ।
विचलीत करू पाहे स्थीर बुद्धी तुझी असे ॥ ५१ ॥
मोक्षस्वामी प्रिये मी नी लोकांना तारितो भवी ।
सकाम मज जो पूजी मायेत गुंतलाच तो ॥ ५२ ॥
( इंद्रवज्रा )
मोक्षादिचा आश्रय मी प्रिये गे
     दुर्भागि ना ते भजती मला की ।
ज्या योनि लाभे सुकरादिकाची
     तो नर्क त्यांना अति गोड वाटे ॥ ५३ ॥
गृहेश्वरी मोद मनात वाटे
     या मुक्तिचा सेविसि तू पदाते ।
ना लाभते जी मनि इच्छि तृप्ती
     इंद्रीयभोगा तिजशी असे हे ॥ ५४ ॥
( वसंततिलका )
नाही प्रिया बघितली तुज ऐशि प्रेमी
     तू ना बघून मजला स्तुति ऐकुनीयां ।
त्यागोनि अन्य नृपती द्विज धाडिला तो
     संदेश गुप्त दिधला मजला सखे तू ॥ ५५ ॥
केला विरूप समरी तव बंधु तैसा
     मारीयलाहि बलने अनिरुद्धलग्नी ।
तू साहिलेस सगळे नच शब्द केला
     तेणेचि मी वश तुला गुण पाहुनीया ॥ ५६ ॥
संदेश प्राप्त असुनी मज वेळ झाला
     तेंव्हा तुलाचि गमले जग शून्य सारे ।
सर्वांग सुंदर अशी तनु अर्पिली तू
     ना फेड होय कधिही अभिनंदितो मी ॥ ५७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् ) आत्माराम जगा कृष्ण परीक्षित् जगदीश्वर ।
या परी प्रेम वाढाया बोले नी रत होयही ॥ ५८ ॥
सर्वव्यापक हा कृष्ण अन्य पत्‍न्यांचिये घरी ।
गृहस्थोचितची वागे भगवंत जगद्‌गुरु ॥ ५९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर साठावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP