( अनुष्टुप् )
राजा परीक्षिताने विचारले -
भौमासुरास कृष्णाने वधिले काय कारणे ।
स्त्रियांना बंदिशाळेत का ठेवी असुरो वदा ॥ १ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात -
इंद्राचे छत्र नी माता अदितीकुंडले तसे ।
भौमाने घेतले तेंव्हा गाठिला मणिपर्वत ॥
कृष्णाला वदता इंद्र सत्यभामासवे हरी ।
गरुडी बैसुनी गेला प्राग्ज्योतिष या पुरा ॥ २ ॥
पहाडी तटबंदी तै सशस्त्र दळ ते पुन्हा ।
जलखंदक ते घोर विजेचे कुंपणो पुन्हा ।
विषारी वायुची भिंत मूरराक्षसि ते दळ ॥ ३ ॥
कृष्ण गदे गिरी फोडी बाणांनी तटबंदि ती ।
चक्राने जाळिल वायू खडगाने सैन्य मारिले ॥ ४ ॥
फुंकिता शंख जोराने यंत्रचालक सर्व ते ।
मूर्छित हरिने केले गदें किल्लाहि तोडिला ॥ ५ ॥
पांचजन्य ध्वनी ऐसा युगांत जणु पातला ।
जळी निद्रित तो होता दैत्य पंचमुखी असा ॥ ६ ॥
( इंद्रवज्रा )
सूर्याग्निसा तो जळपूच दैत्य
युगांत वाटे बघता तयाने ।
धावोनि आला करिं शूळ घेता
वाटे जणू तो गिळितो त्रिलोक ॥ ७ ॥
त्रिशूळ फेकी गरुडावरी नी
पाची मुखाने करि सिंह नाद ।
दाही दिशा नी तिन्हि लोक तेणे
ब्रह्मांड सारे हादरुन गेले ॥ ८ ॥
कौशल्यदावी हरि तेधवा नी
बाणेचि खंडी शुळ तीन भागी ।
मुखात त्याच्या हरि सोड बाण
क्रोधे गदा चालवि दैत्य तेंव्हा ॥ ९ ॥
कृष्णे गदा चालवुनी स्वताची
तो मूर केला शतखंड जेंव्हा ।
येई भुजा तो पसरोनि तेंव्हा
पाची शिरे छेदिलि श्रीहरिने ॥ १० ॥
उडोनि गेले मग पंचप्राण
जळात त्याचे पडले हि प्रेत ।
ताम्रान्तरीक्षो श्रवणो वसू नी
विभा नभस्वान् अरुणो ययांना ॥ ११ ॥
या दैत्य पुत्रा अति शोक झाला
घेवोनि शस्त्रे मग धावले ते ।
सेनापती पीठ करोनि दैत्य
भौमासुरे धाडिले की लढाया ॥ १२ ॥
योजोनि बाणे गद खड्ग शूळ
त्रिशूळ शक्ती अतिवृष्टि केली ।
अनंत ऐसी हरिचीच शक्ती
कोट्यावधी तीर सोडोनि मोडी ॥ १३ ॥
कृष्णप्रहारे मग पीठ दैत्य
नी सैन्य सारे ठिकर्याच झाले ।
भौमासुरे घेवुनि मत्त सैन्य
हत्ती सवे तो मग पातला की ॥ १४ ॥
सपत्नि पाही गरुडी हरीला
वर्षाघनीं जै चमकेचि वीज ।
शतघ्न ऐशी मग शक्ती योजी
सवेचि सर्वे बहु मार केला ॥ १५ ॥
विचित्र ऐसे पर ज्या तिराला
ती तीक्ष्ण बाणे हरि सोडि तेंव्हा ।
भौमासुराचे मग सैन्य सारे
घोडे नि हत्ती मरु लागले तै ॥ १६ ॥
( अनुष्टुप् )
सैन्याने सोडिले जे जे ते ते शस्त्रास्त्र आपुल्या ।
बाणाने हरिने तेंव्हा मोडोनी काढिले तदा ॥ १७ ॥
गरूड झडपी हत्ती चोंचीने तोडिही तसा ।
आर्त ते जाहले सर्व घुसले नगरातही ॥ १८ ॥
भौमाने पाहिले सैन्य नगरीं घुसु लागले ।
वज्रभेदी अशी शक्ती योजी तो गरुडावरी ॥ १९ ॥
विफल जाहली शक्ती गरुडा स्फूर्ति जाहली ।
मत्त हत्तीस माळेचा प्रहार वाटतो तसा ॥ २० ॥
विफल जाहले यत्न तदा तो शूळ फेकितो ।
कृष्णाने तोडिला तोही नी भौमासुर कापिला ॥ २१ ॥
( इंद्रवज्रा )
सकुंडले शीर किरीटि शोभे
तुटोनि आले भुमिसी तसेची ।
दुःखीत झाले स्वजनो सखे ते
देवें हरीला सुम वाहिले तै ॥ २२ ॥
ती वैजयंती वनमान आणि
अदीतिची कुंडल भूमि अर्पी ।
वरुणछत्रो नि तसा महान
मणिहि अर्पी धरणी हरीला ॥ २३ ॥
( अनुष्टुप् )
परीक्षिता क्षिती तेव्हा विश्वेशा कर जोडुनी ।
प्रणामी भक्तिभावाने गायिली स्तूति या परी ॥ २४ ॥
पृथ्विदेवी म्हणाली -
शंखचक्र गदाधारी देवेशा नमिते तुला ।
भक्तइच्छार्थ आलासी येथ तू प्रगटोनिया ॥ २५ ॥
नमो पंकजनाभाला नमो पंकजमालिला ।
नमो पंकजनेत्राला नमो या पदपंकजा ॥ २६ ॥
नमो तुला भगवते वासुदेवास विष्णुसी ।
पुरुष आदिवीजाला पूर्णबोधास या नमो ॥ २७ ॥
अजन्मा जन्मिसी सृष्टी अनंतशक्ति ब्रह्म तू ।
चराचर अशा रूपा वारंवार प्रणाम हा ॥ २८ ॥
( इंद्रवज्रा )
रजोगुणे निर्मिशि सृष्टि तैसी ।
तमोगुणाने हरिसीहि सारी ।
नी सत्व योगे जिव जेववीशी
न गुंतशी तू गुणहीन ऐसा ॥ २९ ॥
मी नी जलो तेज नभो नि वायू
मात्रा तया तू मन इंद्रियासी ।
कर्ता जगां तूचि चराचराचा
भ्रमेचि भासे मग भेद ऐसा ॥ ३० ॥
भौमासुराचा भगदत्त पुत्र
माझाहि नातू, भयभीत झाला ।
मी घालिते रे पदि हा तुझ्या, तू
ठेवी शिरासी वरदा कराते ॥ ३१ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
पृथ्वीने प्रार्थिता ऐसे कृष्णे अभय देउनी ।
स्वयेचि धनभांडारी गेला श्रीकृष्ण तेधवा ॥ ३२ ॥
कृष्णाने पाहिले तेथे सोळा हजार त्या मुली ।
नृपांच्या हरुनी तेथे ठेविल्या बंधनी पहा ॥ ३३ ॥
अंतःपुरात कृष्णाला मुलिंनी पाहिले तदा ।
नी निर्हेतुक भावाने मनीं कृष्णा वरीयले ॥ ३४ ॥
आपापल्या मनीं सर्वे मिळावा पति हा असे ।
चिंतिले प्रेम भावाने हरिसी प्रेम अर्पिले ॥ ३५ ॥
सर्व त्या राजकन्यांना द्वारकापुरि धाडिले ।
संपत्ती रथ नी घोडे कृष्णाने भेटिही दिल्या ॥ ३६ ॥
ऐरावत कुलोत्पन्न चौदंई श्वेत हत्ति ते ।
चौंसष्ट द्वारकेला ते तेथुनी धाडिले पहा ॥ ३७ ॥
इंद्राच्या भवनी जाता सत्यभामा नि कृष्णला ।
सपत्न पूजिले इंद्रे कृष्णे त्या कुंडले दिली ॥ ३८ ॥
इच्छिता सत्यभामा ती कल्पवृक्षास घेउनी ।
देवांनां हरवोनीया द्वारकापुरि आणिला ॥ ३९ ॥
कृष्णाने सत्यभामेच्या अंगणी वृक्ष लाविला ।
बागेची वाढली शोभा स्वर्गीचा गंध पातला ॥ ४० ॥
( इंद्रवज्रा )
हेतेचि इंद्रे पद स्पर्शिले नी
होताचि कार्यो लढला हरीसी ।
त्या देवतांना बहु क्रोध तैसा
धिक्कार त्यांच्या धनसंचयाचा ॥ ४१ ॥
( अनुष्टुप् )
मुहूर्त पाहुनी युक्त, तेवढी घेउनी रुपे ।
कृष्णाने वरिल्या सार्या शास्त्रोक्त विधि तो जसा ॥ ४२ ॥
( इंद्रवज्रा )
पृथक् महालीं हरि ठेवि त्यांना
जगात नाही धन ते तिथे हो ।
इच्छेनुसारे हरि राहि तेथे
गृहस्थधर्मा बहु आचरोनी ॥ ४३ ॥
( वसंततिलका )
ब्रह्मादि देव सगळे रुप नेणती ते
तो श्रीरमापति तिथे मिळला स्त्रियांना ।
आनंद प्रेम दृढले बघती मधूर
लाजोनि नित्य करिती हरिचीच सेवा ॥ ४४ ॥
दासी कितेक असुनी स्वकरेचि कृष्णा
पूजादि तांबुल पदा धुविणे नि स्नान ।
सेवा पदास अथवा हलवोनि पंखा
स्वैपाक, हार करुनी नित सेविती त्या ॥ ४५ ॥