समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५६ वा

स्यमंतकमण्याची कथा, जांबवती व सत्यभामेशी कृष्णाचे लग्न -


Download mp3

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
खोटा कलंक लावी तो कृष्णाला सतराजित ।
स्यमंतक तशी कन्या मार्जना अर्पिती पुन्हा ॥ १ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
द्विजा सत्राजिते केला कोणता अपराध तो ।
त्याकडे तो मणि कैसा कन्या कृष्णास अर्पि कां ? ॥ २ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
सूर्याचा भक्त तो श्रेष्ठ म्हणोनी मित्र ते द्वय ।
प्रसन्न होउनी सूर्ये स्यमंतक् मणि अर्पिला ॥ ३ ॥
धरिता मणि तो कंठी सत्राजित् भास्करा परी ।
आला तो द्वारकेमाजी ते जे त्या नोळखी कुणी ॥ ४ ॥
पाहता झाकिती नेत्र लोकांना सूर्य वाटला ।
लोक ते सांगती कृष्णा खेळे चौरस कृष्ण जै ॥ ५ ॥
शंख चक्र गदा धारी गोविंदा यदुनंदना ।
दामोदरा पंकजाक्षा तुजला प्रणिपात हा ॥ ६ ॥
तेजाळ तेज घेवोनी आपुल्या दर्शनास तो ।
चंडांक्षु सूर्य तो येतो पसरीत स्वतेज की ॥ ७ ॥
त्रिलोकी शोधिती देव तरी तूं त्यां न भेटसी ।
येथे तू जाणुनी आला प्रत्यक्ष सूर्यदेव तो ॥ ८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
बालकापरि हे बोल ऐकता कृष्ण हासले ।
सत्राजित असे तो हो मण्याने चमके असा ॥ ९ ॥
स्वताच्या घरि तो गेला मंगलोत्सव जाहला ।
स्यमंतक मणी विप्रे मंदिरी स्थापिला असे ॥ १० ॥
प्रतीदिन मणी देई आठभार सुवर्ण ते ।
जेथे तो पूजिला जाई तेथे दुर्भिक्ष ना कधी ।
ग्रहपीडा महामारी अशूभ कोणते नसे ॥ ११ ॥
प्रसंगी एकदा कृष्ण वदला सतराजिता ।
उग्रसेना मणि द्यावा परी ना मानि तो तदा ॥ १२ ॥
प्रसेन बंधु तो त्याचा एकदा मणि धारुनी ।
रात्री वनात तो गेला शिकार करण्या पहा ॥ १३ ॥
सिंहे एके तिथे त्याला अश्वाला ठार मारुनी ।
घेवोनी मणि तो गेला गुंफेत आपुल्या तदा ।
सिंहाला जांबवानाने मारोनी मणि घेतला ॥ १४ ॥
त्याने तो आपुल्या बाळा गुंफेत खेळण्या दिला ।
झाले सत्राजिता दुःख बंधू ना परते जधी ॥ १५ ॥
संशयो घेतला त्याने कृष्णाने बंधू मारिला ।
ऐकता बोल हे त्याचे पुरीं कुजबूज जाहली ॥ १६ ॥
कृष्णाने जाणिले सर्व कलंक लागतो असा ।
सभ्य लोकां सवे कृष्ण धुंडिण्या वनि पातले ॥ १७ ॥
शोधिता दिसले लोका सिंहाने अश्व मारिला ।
सिंहाच्या पदचिन्हाने जाणिले सिंहही तसा ।
अस्वले मारिला एका गुंफेच्या पुढती पहा ॥ १८ ॥
तिथेचि सर्व लोकांना कृष्णाने थांबवोनिया ।
अंधार्‍या घोर त्या गुंफी एकटाच प्रवेशला ॥ १९ ॥
कृष्णाने पाहिले तेथे खेळणे मणि जाहला ।
पिलांच्यापासि येवोनी उभा राहोनि ठाकला ॥ २० ॥
नवखा दिसता कोणी पिले ओरडली तदा ।
चित्कार ऐकुनी त्यांचा क्रोधेचि जांब पातला ॥ २१ ॥
माहात्म्य नच जाणी तो कृष्णा माणूस मानुनी ।
लढाया जाहला सिद्ध कृष्णस्वामी सवे पहा ॥ २२ ॥
ससाणे लढती तैसे दोघेही झुंजु लागले ।
शस्त्रास्त्र सोडुनी जांब बाहुयुद्धास लागला ॥ २३ ॥
वज्रप्रहार जैसे ते प्रहार करिती तदा ।
अठ्ठाविस दिन रात्री लढले नच थांबता ॥ २४ ॥
शेवटी मारुनी ठोसा कृष्णाने ठेचिले तया ।
शरीरा फुटला घाम आश्चर्ये वदला तदा ॥ २५ ॥
प्रभो मी जाणिले तुम्हा तुम्ही विष्णु स्वयं असा ।
तुम्हीच सर्व जीवांचे प्राण इंद्रिय नी बल ॥ २६ ॥
ब्रह्म्याला निर्मिले तुम्ही तुम्ही सर्वत्र राजता ।
कालाचे नियते तुम्ही आत्माराम तुम्ही असा ॥ २७ ॥
( वसंततिलका )
मी ते स्मरे बघसि तू जधिं सागरास
     नक्रादि ते खवळती मग सेतु होय ।
ते मेळविण्यास यश तू जितिलीस लंका
     बाणे तुझ्याचि शिर राक्षसिते उडाले ॥ २८ ॥
( अनुष्टुप् )
परीक्षित् ऋक्षराजा तो जांबवान् ओळखी जधी ।
नेत्रारविंद कृष्णाते तदा कल्याणकारि तो ॥ २९ ॥
आपुला हात त्या जांबतनुशी फिरवीयला ।
गंभीरवणिने त्याला प्रेमाने बोलला असे ॥ ३० ॥
ऋक्षराज मणि हेते गुंफेत पातलो असे ।
मणी हा देउनी त्यांना कलंक धुवु इच्छितो ॥ ३१ ॥
ऐकता जांबवंताने आनंदे कृष्ण पूजिला ।
कुमारी जांबवंती नी मणीही पायि अर्पिला ॥ ३२ ॥
बाहेर तिष्ठले लोक बारा दिन पुन्हा तया ।
जाहले दुःख ते फार द्वारकापुरि पातले ॥ ३३ ॥
तिथे ती देवकी माता रुक्मिणी वसुदेवजी ।
दुःखीत जाहले सर्व न येता कृष्ण तेधवा ॥ ३४ ॥
द्वारकावासि ते सर्व दुःखे सत्राजितास त्या ।
वाईट बोलले सारे देवीला सर्व प्रार्थिती ॥ ३५ ॥
देवी प्रसन्न झाली नी आशिर्वाद दिला तिने ।
तेवढ्यात मणी पत्‍नी सवे तो कृष्ण पातला ॥ ३६ ॥
आनंदमग्न ते झाले सपत्‍न कृष्ण पाहता ।
मणी तो शोभला कंठी मरुनी जणु पातला ॥ ३७ ॥
पुन्हा श्री भगवान् कृष्ण उग्रसेनापुढे सभीं ।
सत्रजितास बोलावी, हाडसोनि मणी दिला ॥ ३८ ॥
मणी तो घेतला त्याने लाजेने खालि पाहि तो ।
पश्चात्ताप तया झाला तसाचि घरि पातला ॥ ३९ ॥
अपराध सले नित्य विरोधे भय दाटले ।
परिमार्जन तो शोधी प्रसन्न कृष्ण व्हावया ॥ ४० ॥
कल्याणार्थ करू काय जेणे लोक न निंदिती ।
अदूरदृष्टी मी शुद्र लोभाने मूर्ख जाहलो ॥ ४१ ॥
आता मी सत्यभामा ही कन्यारत्‍नात रत्‍न जी ।
आणीक मणिही कृष्णा अर्पोनी पाप हे धुतो ॥ ४२ ॥
विवेक बुद्धिने त्याने स्वताशी ठरवोनिया ।
स्यमंतक तशी कन्या कृष्णाला अर्पिली तये ॥ ४३ ॥
विधिपूर्वक कृष्णाने सत्यभामा वरीयली ।
रूप शील गुणे तैशी अनेक इच्छिती जिला ॥ ४४ ॥
वदले भगवान् कृष्ण न आम्ही मणि घेत हा ।
सूर्यभक्त तुम्ही आहा तुमच्यापाशि ठेविणे ।
तो जे निर्मील ते सोने आम्हा द्यावे तुम्ही पहा ॥ ४५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर छपन्नावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP