समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५५ वा

प्रद्युम्नाचा जन्म व शंबरासुराचा वध -


Download mp3

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
काम तो भगवद्‌अंश रुद्र शापेचि भस्मला ।
शरीर धारण्या आला कृष्ण आश्रयि तो पहा ॥ १ ॥
तो आता रुक्मिणीगर्भे प्रद्युम्न जन्मला पहा ।
सुशील रूप वीर्याने सद्‌गुणी कृष्णची जसा ॥ २ ॥
शंबरो कामरूपी तो बाळा मारावया हरी ।
आपुला शत्रु जाणोनी दहाव्या दिनि जन्मता ॥ ३ ॥
समुद्री फेकिता बाळ मत्स्याने गिळिले असे ।
जाळ्यात गुंतला मासा अनेक मासळी तसा ॥ ४ ॥
कोळी तो शंबरासूरा भेट रूपेचि अर्पितो ।
स्वैपाकी कापण्या मासा पाकशाळेत नेई तै ॥ ५ ॥
मत्स्यपोटा मधे बाळ निघता दासिसी दिला ।
दासी मायावती चिंती शंकीत जाहली असे ।
बालको कामदेवो हा नारदे जो भविष्यिला ॥ ६ ॥
मायावती रती पत्‍नी कामदेवास जी असे ।
शंकरे जाळिता काम पुनर्जन्मार्थ तिष्ठली ॥ ७ ॥
हिला शंबासुरे केले आपुली स्वयपाकिनी ।
कळता तिजला सारे लावी प्रेमचि बाळका ॥ ८ ॥
थोडक्याच दिनामाजी तरुण पुत्र जाहला ।
अद्‌भूत रूप लावण्या पाहता भाळती स्त्रिया ॥ ९ ॥
( इंद्रवज्रा )
पद्‌माक्ष त्याचे अन दीर्घ बाहू
     ती सर्व लोकी पति सुंदरो हा ।
सलज्ज सेवा करु लागली ती
     प्रेमेचि पाही मिचकोनि दृष्टी ॥ १० ॥
( अनुष्टुप् )
प्रद्युम्न भाव पाहोनी वदला कामिनी परी ।
वागसी उलटी कैसी आईच्या सम तू तरी ॥ ११ ॥
रति म्हणाली -
तुम्ही नारायणोपुत्र शंबरासुरि चोरिले ।
कामदेव स्वयं तुम्ही रती मी धर्मपत्‍नि हो ॥ १२ ॥
चोरोनी असुरे तुम्हा समुद्रीं टाकिले असे ।
माशाने गिळिले तेंव्हा मजला प्राप्त जाहले ॥ १३ ॥
मायावी असुरो मोठा जिंकण्या बहु दुर्धर ।
मोह माया रचोनीया मारणे राक्षसास त्या ॥ १४ ॥
हारवे बाळ हे तेंव्हा चिंतीत माय-बाप ते ।
गाय वा टिटवी ऐसी अवस्था जाहली तयां ॥ १५ ॥
महामाया अशी विद्या रतीने त्यां दिली असे ।
विद्या ही सर्व मायेचा करिते नाश ती अशी ॥ १६ ॥
आता या शंबरासूरा प्रद्युम्न छेडु लागला ।
नव्हे युद्धार्थही त्याला स्पष्टची ललकारिले ॥ १७ ॥
ऐकता क्रोधला शत्रू दुरुक्त वाक्य ती तशी ।
साप जै खवळे तैसा गदा घेवोनि पातला ॥ १८ ॥
गदा ती फोरवोनीया प्रद्युम्नावरि फेकिली ।
फेकिता सिंहनादो वा विजेच्या परि गर्जला ॥ १९ ॥
गदा वेगेचि ये तैशी प्रद्युम्ने आपुल्या गदे ।
पाडिली, फेकिली त्याने शत्रूशी आपुली गदा ॥ २० ॥
दैत्ये मायासुरी विद्या योजिता गगनात तो ।
गेला नी शस्त्र अस्त्रांची वृष्टीही करु लागला ॥ २१ ॥
त्रासिता शस्त्र अस्त्रे ती प्रद्युम्ने या महारथे ।
योजिली ती महाविद्या जी माया शांतची करी ॥ २२ ॥
यक्ष नाग पिशाच्च्यांचे प्रयोग दैत्य तो करी ।
प्रद्युम्ने सर्वच्या सर्व विद्येने नष्टिले पहा ॥ २३ ॥
तीक्ष्ण खड्ग करीं घेता असुरावरि धावला ।
लाल दाढी मिशांचे ते प्रद्युम्ने शिर तोडिले ॥ २४ ॥
पुष्प वृष्टि सुरें केली पुन्हा मायावती रती ।
प्रद्युम्ना सह ती गेली वायुमार्गेचि द्वारकीं ॥ २५ ॥
आकाशी सावळा गोरा जोडा हा ढग वीज जै ।
शोभता द्वारकीं आले गेले अंतःपुरातही ॥ २६ ॥
मेघश्याम असा वर्ण नेसला तो पितांबर ।
आरक्त नेत्र नी बाहू लांब नी हास्य मंद ते ॥ २७ ॥
मुखारविंदि ते जैसे डोळे भृंगचि भासले ।
कृष्णची वाटला सर्वां लपोनी पाहती तया ॥ २८ ॥
निवांत जाणती स्त्रीया नाही हा कृष्णदेव तो ।
विस्मये हर्षता सर्व दांपत्यापाशि पातले ॥ २९ ॥
रुक्मिणी पातली तेथें मधूरवाणि बोलता ।
पाहिले दंपती आणि वात्सल्ये ऊर दाटले ॥ ३० ॥
विचार करिते चित्ती कोण हा नररत्‍न तो ।
कमलाक्ष कुणा पोटी जन्मला भाग्यशालिच्या ।
कोण रुपवती पत्‍नी याजला लाभली असे ॥ ३१ ॥
माझा तो हारवें पुत्र जन्मता सूतिकागृहीं ।
नसेल तर का हाच मोह तैसाच वाटतो ॥ ३२ ॥
मला हा वाटतो चित्ती दुसरा श्यामसुंदर ।
हासणे बोलणे तैसे चालणे शैलिही तशी ॥ ३३ ॥
असो कांहीहि तो आहे माझाच गर्भपुत्र हा ।
अंतरी वाटतो तोची डावी बाहू स्फुरे अशी ॥ ३४ ॥
संदेहे रुक्मिणी ऐशी विचार करिता मनीं ।
कृष्णही पातले तेथे नी वसूदेव देवकी ॥ ३५ ॥
कृष्ण ते जाणती चित्ती परी ना कांहि बोलती ।
पातले नारदो तेथे क्रमाने सर्व बोलले ॥ ३६ ॥
आश्चर्यमय ही गोष्ट ऐकता तेथल्या स्त्रिया ।
चकीत जाहल्या सर्व प्रद्युम्ना अभिनंदिती ॥ ३७ ॥
देवकी वसुदेवो नी राम कृष्ण नि रुक्मिणी ।
हृदयी धरुनी जोडा आनंदी सर्व जाहले ॥ ३८ ॥
द्वारकावासिच्या लोका कळता वदले तदा ।
आश्चर्य झाले ऐका मेलेला बाळ पातला ॥ ३९ ॥
( वसंततिलका )
प्रद्युम्न हा गमतसे हरि कृष्ण जैसा
     माताहि त्यां चुकुनिया नच थांबल्या तै ।
हे रूप कृष्ण प्रतिची नवलाव नाही
     स्त्रीया त्र्ययस्थ चुकती पुसणेच नाही ॥ ४० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंचावन्नावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP