( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
कळाले जरि गोविंदा त्या लाक्षागृहि पांडव ।
वाचले, परि वार्तेने बुडोनी सर्व वारले ।
तदा ते बलरामाच्या सोबती तेथ पातले ॥ १ ॥
भीष्मा कृपा विदूरा नी गांधारी द्रोण यांजला ।
भेटुनी बोलले हाय दुःखाची गोष्ट जाहली ॥ २ ॥
अवधीत तदा राजा कृतवर्मा नि अक्रुर ।
शतधन्व्या वदो गेले सत्राजित्मणि चोरणे ॥ ३ ॥
सत्राजित् वदला होता देतो पुत्री म्हणोनिया ।
न देता द्वेषितो आता त्यालाही ठार मारु की ॥ ४ ॥
पापी तो शतधन्वा नी मृत्यू समिप पातला ।
सत्राजित् मारिला तेणे द्वयांची फूस ऐकता ॥ ५ ॥
शोकाने रडती स्त्रीया परी दुर्लक्षुनी तयां ।
पळाला मणि घेवोनी पशूहत्या जशी करी ॥ ६ ॥
सत्यभामाहि शोकाने पिताजीऽ शब्द ओरडे ।
उठे मुर्च्छ्ये मधोनीया पुन्हाही शोक ती करी ॥ ७ ॥
तेलाच्या कढई मध्ये पित्याचे प्रेत ठेवुनी ।
हस्तिनापुरि ती आली कृष्णाला सर्व बोलली ॥ ८ ॥
परीक्षित राम नी कृष्ण मानवी करुनी लिला ।
ढाळिती अश्रु शोकाने वदती ही विपत्तिची ॥ ९ ॥
पातली सत्यभामा नी राम कृष्णहि द्वारकीं ।
मारण्या शतधन्व्याला उद्योगी लागले पहा ॥ १० ॥
कळाले शतधन्वा तो प्राणाचे भय घेउनी ।
रक्षणार्थ वदो गेला कृतवर्मासि तो म्हणे ॥ ११ ॥
शक्तिमान् ईश कृष्णाते कधी मी लढुना शके ।
इह नी परलोकात वैरे कोण सुखी वसे ॥ १२ ॥
कंसाने बांधिता वैर हरला प्राण नी धना ।
सत्रा वेळा जरासंध हारता पायि तो पळे ॥ १३ ॥
कृतवर्मा असे त्याला देई उत्तर तो तदा ।
अक्रूरा प्रार्थिता त्याला अक्रूर बोलला असे ॥ १४ ॥
बंधो रे कोण तो ऐसा बल पौरुष जाणता ।
बांधील वैर तो त्यासी रची तो मोडि विश्व हे ॥ १५ ॥
करील काय तो केंव्हा ब्रह्माही जाणु ना शके ।
वय जै सात वर्षाचे तदा पर्वत हा धरी ॥ १६ ॥
सात दिन असे त्याने रक्षिले गोप नी पशू ।
अनंता आत्मरूपा त्या माझा रे प्रणिपात हा ॥ १७ ॥
अक्रूरशब्द ऐकोनी ठेवोनी मणी त्याजसी ।
बसे घोड्यावरी ऐशा चारशे कोस जो पळे ॥ १८ ॥
भगवान् कृष्ण नी राम गरुडध्वज या रथीं ।
बैसले धावले तैसे श्वशूरशत्रु मारिण्या ॥ १९ ॥
मिथीलापुरिच्या पाशी घोड्या वरुनि शत्रु तो ।
पडता पळता पायी क्रोधे मागेचि कृष्ण तो ॥ २० ॥
गाठी पायीच नी त्याला चक्रशस्त्र करोनिया ।
छेदिले शीर ते त्याचे मणी तो वस्त्रि शोधला ॥ २१ ॥
व्यर्थची मारिले याते न मणी याज पासि तो ।
वदला कृष्ण तो ऐसा बळिरामास तेधवा ॥ २२ ॥
बळिराम वदे कृष्णा कोणाच्या पाशि तो मणी ।
असेल ठेविला याने तेंव्हा जा द्वारकापुरीं ॥ २३ ॥
विदेहीनृप तो मित्र भेटू मी इच्छितो तया ।
यदुवंशविरो गेला वदता मिथिलापुरा ॥ २४ ॥
आनंदे भरला राजा पाहता बलरामला ।
त्वरीत योजिल्या वस्तू आसनी पूजिले बलां ॥ २५ ॥
कितेक दिन ते तेथे राहिले मिथिलापुरीं ।
महात्मा जनकाने तै सन्मान बहु अर्पिला ।
शिके दुर्योधनो तेथे गदायुद्ध बळी कडे ॥ २६ ॥
इकडे कृष्ण ते आले द्वारकी वदले तदा ।
न मिळे मणि तो तेथे शतधन्व्यासि मारुनी ॥ २७ ॥
और्ध्वदेहिक क्रीया ती श्वशूर प्रेतिची तदा ।
भावकी जमवोनीया कृष्णे आटोपिले असे ॥ २८ ॥
अक्रूर कृतवर्माने शतधन्वासि प्रेरिता ।
सत्राजित् मारिला तेणे पळाले भिउनी द्वय ॥ २९ ॥
वदती लोक ते कांही अक्रूर पळता असा ।
उत्पात द्वारकीं झाले कष्टही पडले जनां ॥ ३० ॥
बोलती काल ते आज सर्वा विस्मृति ती घडे ।
पवित्र कृष्ण तो जेथे अशूभ तेथ कायसे ॥ ३१ ॥
वृद्ध ते वदले कोणी काशिराज्यात एकदा ।
दुष्काळ पडला तेंव्हा श्वफल्का गादिनंदिनी ॥ ३२ ॥
देवोनी लग्न ते केले तेंव्हाच वृष्टी जाहली ।
अक्रूर पुत्र तो त्यांचा त्याचाही तो प्रभावकी ।
जेथे तो निवसे तेथे रोग-राई न होतसे ॥ ३३ ॥
कृष्णाने जाणिले सर्व तरीही अक्रुरास त्या ।
शोधिले भृत्य धाडोनी नी बोलावुनि घेतले ॥ ३४ ॥
गोड त्या बोलला कृष्ण तसे स्वागतिले असे ।
भगवान् जाणितो चित्त तेंव्हा हासुनि बोलला ॥ ३५ ॥
धर्म तो पाळिता तुम्ही आम्हा माहित की मणी ।
शतधन्वे तुम्हापाशी ठेविला तो सुरक्षित ॥ ३६ ॥
सत्राजिता न पुत्रो नी पुत्रीचे पुत्रची पुढे ।
पिंडदान करोनीया होती वारस त्याचिये ॥ ३७ ॥
स्यमंतक मणी तेंव्हा मिळावा आमुच्या मुलां ।
तरीही ठेवणे तुम्हा पाशी ते गैरही नसे ।
परी श्री बलरामो हे विश्वास नच ठेविती ॥ ३८ ॥
म्हणोनी हो महाभागा संशयो दूर तो करा ।
मणीप्रभाव मेळोनी तुम्ही यज्ञास योजिता ।
सुवर्ण वेदिही तेथे निर्मितात पुनः पुन्हा ॥ ३९ ॥
समजावी असा कृष्ण तेंव्हा तो कपड्यातला ।
काढिला मणि नी कृष्णा अक्रुरे दिधला असे ॥ ४० ॥
कृष्णाने भावुकीला तो स्यमंत मणि दाविला ।
कलंक धुतला सर्व अक्रूरा दिधला पुन्हा ॥ ४१ ॥
( प्रहर्षिणी )
सर्वीं व्यापक हरिची कथा पवित्र
नाशी पाप सकल नी धुते कलंक ।
वाची वा स्मरण करी नि कर्णि ऐके
त्याचे पाप धुउनि सगळे मिळेचि शांती ॥ ४२ ॥