( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
वैदर्भी राजकन्येचा कृष्णे संदेश ऐकिला ।
द्विजहात धरोनीया हासुनी बोलले असे ॥ १ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणतात -
मीही इच्छी तसा तीते तिच्याशी चित्त लागले ।
न लागे झोप ती रात्री रुक्मि तो द्वेषितो अम्हा ॥ २ ॥
लाकडे घासिता त्यात अग्नि तो आपणा मिळे ।
तसे मी मारुत्नी त्यांना सुंदरी मिळवीन ती ॥ ३ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
मधुसूदन कृष्णाने परवा लग्न जाणुनी ।
दारुका दिधली आज्ञा त्वरीत रथ जुंपण्या ॥ ४ ॥
रथाते शैब्य सुग्रीव मेघपुष्प बलाहको ।
जुंपिले अश्व हे चार रथ हा सज्ज जाहला ॥ ५ ॥
शूरनंदन श्रीकृष्णो द्विजा प्रथम बैसवी ।
पुन्हा रथात तो बैसे रात्रीत पोचले तिथे ॥ ६ ॥
कुंडीनपति तो भिष्मक् पुत्र रुक्मिस ऐकता ।
शिशुपाल-स्वकन्येच्या विवाहा लागला असे ॥ ७ ॥
झाडिले सर्व ते मार्ग सडे संमार्जिले तिथे ।
सपुष्प ठेविल्या कुंड्या तोरणे ध्वज लाविले ॥ ८ ॥
पुष्पमाला फुले गंध वस्त्रालंकार लेवुनी ।
सजले नर-नारी तै दर्वळे धूपगंध तो ॥ ९ ॥
पितरे देवता यांना विधिपूर्वक पूजिता ।
ब्राह्मणा दिधले भोज स्वस्तिवाचन जाहले ॥ १० ॥
सुंदरा शोभलीकन्या मंगलस्नान जाहले ।
वस्त्र आभूषणे ल्याली करीं कंकण शोभले ॥ ११ ॥
सामऋक् यजु मंत्राने तिजला रक्षिले असे ।
अथर्वे ग्रहशांतीही केलीसे त्या पुरोहिते ॥ १२ ॥
शास्त्र विधि बहू जाणी तसा भीष्मक भूप तो ।
सोने चांदी तसे वस्त्र गूळ तीळ द्विजा दिले ॥ १३ ॥
चेदिराज दमघोषे मंत्राने शिशुपालला ।
मांगलीक असे कृत्य विवाहार्थचि साधिले ॥ १४ ॥
मदच्युत असे हत्ती माला सूवर्णसे रथ ।
दळाश्व घेउनी सारे कौंडिण्यपुरि चालले ॥ १५ ॥
राजा भीष्मक सामोरी आले नी पूजिले तया ।
आनंदे जनवासात वर्हाडी राहिले पुन्हा ॥ १६ ॥
वक्रदंद जरासंधो शाल्व पौंड्रक नी तसे ।
हजारो शिशुपालाचे वरातीं पातले नृप ॥ १७ ॥
सर्व ते रामकृष्णाचे विरोधात असेच की ।
रुक्मिणी शिशुपालाला मिळावी सर्व इच्छिती ॥ १८ ॥
प्रसंगी लढु कृष्णासी मिळोनी एक सर्व हे ।
रथाश्व हत्ति नी सेना सवे घेवोनि पातले ॥ १९ ॥
भगवान बलरामाला कळाले सज्ज शत्रु ते ।
कृष्ण तो एकटा गेला शंकीत जाहले मनीं ॥ २० ॥
जाणती शक्ति कृष्णाची परी ते प्रेम दाटले ।
त्वरीत दळ घेवोनी कौंडिण्यपुरि चालले ॥ २१ ॥
इकडे रुक्मिणी पाही कृष्णाची वाट सारखी ।
न कृष्ण द्विजही येता चिंतीत जाहली बहु ॥ २२ ॥
आता ही उरली रात्र कैसे कृष्ण न पातले ।
कळेना काय होई ते संदेशी द्विजही न ये ॥ २३ ॥
विशुद्ध पुरुषो कृष्ण माझ्यांत कांहि ते उणे ।
वाटले काय की त्याते म्हणोनी नच पातले ॥ २४ ॥
मंदभाग्य गमे माझे अनुकूल न शंकर ।
अप्रसन्न सती वाटे मजसी रुद्रपत्नि ती ॥ २५ ॥
विचारी पडली ऐसी कृष्णाने चित्त चोरिले ।
स्मरते वेळही आहे सअश्रु एत्र झाकिले ॥ २६ ॥
प्रतिक्षा करिता ऐसी उजवी बाहु मांडि नी ।
नेत्रही स्फुरला डावा प्रीयागमनि हे शुभ ॥ २७ ॥
कृष्णा संदेश देवोनी पातले द्विजदेव ते ।
ध्यानमग्न जशी देवी तशी रुक्मिणी पाहिली ॥ २८ ॥
प्रसन्न द्विजदेवाला पाहिले रुक्मिणी हिने ।
ओळखी कृष्ण तो येतो द्विजाला पुसले तिने ॥ २९ ॥
श्रीकृष्ण पातले येथे नेण्यासी तुजला तसे ।
प्रतिज्ञा वदले सत्य द्विज तो वदला असे ॥ ३० ॥
आनंद भरला चित्ती द्विजाला प्रीय कृष्ण तो ।
म्हणोनी रुक्मिणीने त्यां केले वंदन केवल ॥ ३१ ॥
भीष्मका कळले कृष्णराम हे लग्न पाहण्या ।
पातले तेधवा तेणे सवाद्य भेट देउनी ॥ ३२ ॥
मधुपर्क तसे वस्त्र उत्तमोत्तम भेटि ही ।
अर्पिल्या द्वय बंधूंना पूजिले विधिपूर्वक ॥ ३३ ॥
बुद्धिमान भीष्मक् होते हरिची भक्तिही तशी ।
कृष्णा सत्कारिले खूप सर सेनेसि त्या परी ॥ ३४ ॥
भीष्मके सर्व राजांचा अधिकारचि लक्षुनी ।
इच्छीत वस्तुदेवोनी सत्कार बहु अर्पिला ॥ ३५ ॥
विदर्भ देशिच्या लोका कळला कृष्ण पातले ।
दर्शना पातले सर्व सौंदर्य नेत्रि प्राशिती ॥ ३६ ॥
वदती सर्व ते तेंव्हा रुक्मिणी श्यामसुंदर ।
जोडा हा दिसतो योग्य न शोभे दुजि याजला ॥ ३७ ॥
आमुची पूर्वपुण्याई असेल कांहि ती तशी ।
विधाता घडवी ऐसे कृपेने जोड हा असा ॥ ३८ ॥
प्रेमाने वदती लोक समयी याच रुक्मिणी ।
ससैन्य निघली तैशी दर्शना देविमंदिरा ॥ ३९ ॥
देवीच्या पडण्या पाया चाले रुक्मिणि पायि ती ।
मनात ध्यायली नित्य मुकुंदचरणांबुजा ॥ ४० ॥
मौन धरोनिया होती, माता मैत्रिणि सोबती ।
शस्त्रास्त्र घेउनी हाती सेनेने रक्षिले तिला ।
मृदंग शंख नी ढोल तुतार्या बहु वाजती ॥ ४१ ॥
वस्त्रालंकार लेवोनी द्विजपत्न्याहि सोबती ।
वारांगना करीं पूजावस्तू घेउनी चालती ॥ ४२ ॥
गायके गायिली गाणी स्तुती मागधि गायिली ।
जय् जय्कार तसा झाला ख्यातिवर्णन चालले ॥ ४३ ॥
देवीच्या मंदिरी येता धुतले हात पाय नी ।
आचम्य करुनी शांतचित्ते मंदिरि पातली ॥ ४४ ॥
म्हातार्या जाणत्या विप्रा सोबती पातल्या तिथे ।
तयांनी देविते हीस प्रणाम करवीयला ॥ ४५ ॥
वदली रुक्मिणी तेंव्हा वंदिते तुज नी गणां ।
करावी पूर्ण ती इच्छा श्रीकृष्ण पति दे मला ॥ ४६ ॥
अक्षता जल गंधे नी धूप वस्त्रादि अर्पिता ।
आरती जाहली तेंव्हा अंबिका देविची तशी ॥ ४७ ॥
मीठ पोहे फळे पान ऊस नी कंठसूत्र या ।
साहित्येपूजिल्या सर्व सवाष्णब्राह्मणी तदा ॥ ४८ ॥
आशिर्वाद दिला त्यांनी प्रसाद दिधला तसा ।
नमिते नवती त्यांना प्रसाद मग सेविते ॥ ४९ ॥
संपता विधि तो सर्व सोडिले मौन ते तिने ।
धरिता सखिचा हात आली ती मंदिरातुनी ॥ ५० ॥
( इंद्रवज्रा )
वीरास मोही जणु देवमाया
सुमध्यमा कुंडलमंडिता ती ।
कटीस रत्नांकित मेखळा ती
वज्रस्तना शंकित पाहि नेत्रे ॥ ५१ ॥
ती दंतपंक्ती जणु कुंदमाला
नी ओठलाली पसरे तयांसी ।
ते हास्य मोठे रमणीय होते
झंकारती पैंजण पायभागी ।
ती हंसचाली चलता बघोनी
ते वीर सारे मनि मोहले की ।
त्या कामदेवे करण्यास सिद्धी
बाणे विदीर्णो हृदयेहि केली ॥ ५२ ॥
( वसंततिलका )
ओवाळिते हरि वरी रुप तैचि चाले
ती रुक्मिणी हळुपदीच वरातिं चाले ।
लज्जीत हास्य बघुनी हरपोनि शुद्ध
मूर्छित वीर पदले गळलेहि शस्त्रे ॥ ५३ ॥
पाहोनि वाट हरिची अतिमंद चाले
डाव्या करेंचि कच ते वरि सावरोनी ।
लाजोनि दृष्टि फिरवी नृपती वरी ती
तेंव्हाच श्याम दिसला मग सुंदरीला ॥ ५४ ॥
( इंद्रवज्रा )
रुक्मीणि इच्छी रथि बैसण्या त्या
त्या वीरमाथीं पद ठेवुनीया ।
गरूड चिन्हांकित ज्या ध्वजा त्या
रथात कृष्णो उचलोनि घेई ॥ ५५ ॥
मृगेंद्र कोल्ह्यातुनि जै शिकार
तसेच कृष्णो यदु सर्व गेले ॥ ५६ ॥
गर्वी जरासंध नि भूप सर्व
कीर्तिक्षयाने बहु क्रोधले की ।
धिक्कार आम्हा धनुवीर शांत
हिरावुनीया यश नेति गोप ॥ ५७ ॥