समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५२ वा

द्वारकागमन, बलराम विवाह, रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मण जातो -


Download mp3

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
मुचकुंदा असा केला कृष्णाने तो अनुग्रह ।
कृष्णा परिक्रमा केली बाहेर पातला पुन्हा ॥ १ ॥
बाहेर येउनी पाही माणसे पशु पक्षि नी ।
वृक्षही सान ते झाले आकारे पूर्विच्याहुनी ।
लक्षोनी कलियूगाते गेला तो उत्तरेकडे ॥ २ ॥
तप श्रद्धा नि ध्यान संदेहमुक्त तो असे ।
कृष्णात लावुनी चित्त गंधमादनि पातला ॥ ३ ॥
साहोनी शीत उष्णाला नर नारायणाश्रमी ।
तपासी लागला नित्य भगवान् हरिपूजनी ॥ ४ ॥
भगवान् मथुरी आले सेनेने घेरिले तसे ।
म्लेंच्छांना मारुनी सर्व द्वारकी धन आणिले ॥ ५ ॥
माणसे धन ते नेता बैलांच्या वरि लादुनी ।
अठ्‌राव्या वेळि तो आला मागधो सैन्य घेउनी ॥ ६ ॥
शत्रूंचा पाहुनी वेग स्फूर्तीने कृष्णराम ते ।
माणसा परि भीवोनी लागले ते पळावया ॥ ७ ॥
टाकिले द्रव्य ते सारे पायांनी धावले पहा ।
नव्हती मुळि ती भीती परी नाट्य रचीयले ॥ ८ ॥
मागधे पाहिले बंधू पळती राम कृष्ण हे ।
धावला रथ घेवोनी प्रभाव नच जाणता ॥ ९ ॥
थकले म्हणुनी गेले त्या प्रवर्षण पर्वती ।
पडे नित्य तिथे वर्षा म्हणोनी हा प्रवर्षण ॥ १० ॥
जरासंध बघे की हे लपले बंधु पर्वती ।
धुंडिता दिसले ना ते पेटवी पर्वतास तो ॥ ११ ॥
शिखरे पेटली तेंव्हा द्वादशो योजने असे ।
बंधू उतरले खाली सेना ओलांडुनी तशी ॥ १२ ॥
दिसले नच ते कोणा नृपालाही तसेच त्या ।
पुन्हा ते पातले दोघे सुखाने द्वारकापुरी ॥ १३ ॥
कृष्ण नी बलरामो हे जळाले मानिता मनीं ।
पातला आपुल्या देशा मोठे ते सैन्य घेउनी ॥ १४ ॥
वदलो नवव्या स्कंधी आनर्त देशिचा नृप ।
रैवते रेवती कन्या बलरामा दिली असे ॥ १५ ॥
स्वयंवरात गोविंदे शिशुपालादि शाल्वला ।
बळाने हारिले सर्व रुक्मिणी हरुनी तिशी ॥ १६ ॥
विवाह साजरा केला गरूड नेइ जै सुधा ।
रुक्मिणी भीमक ची ती स्वयं लक्ष्मीच जन्मली ॥ १७ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
भगवन् ! ऐकिले आम्ही भीष्मक्‌नंदिनी रुक्मिणी ।
बळाने आणिली कृष्णे राक्षसी लग्न लाविले ॥ १८ ॥
कृष्णाने शाल्वलादींना जिंकिले कवण्या परी ।
तेजस्वी भगवान् कृष्णे रुक्मिणी हरिली कशी ॥ १९ ॥
पुण्यदा कृष्णलीला त्या धुती विश्वाचिया मळा ।
ऐकता वाटती नित्य नवीन कोण त्या त्यजी ॥ २० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
भीष्मक ते विदर्भाचे राजे हो श्री परीक्षिता ।
पाचपुत्र तशी एक मुलगी रूपवान् तयां ॥ २१ ॥
रुक्मी थोर रुक्मिरथो रुक्मिबाहू तसाच तो ।
रुक्मेश रुक्ममाली नी रुक्मिणी भगिनी सती ॥ २२ ॥
भगवान् कृष्णसौंदर्य गुण वैभव वीरता ।
एकता रुक्मिणी इच्छी पती तो योग्य आपणा ॥ २३ ॥
भगवान् कृष्णही जाणी तिचे रूप नि लक्षणे ।
म्हणोनी ठरवी चित्ती पत्‍नी ती आपणा बरी ॥ २४ ॥
चारीही इच्छिती बंधू कृष्ण हा योग्य मेहुणा ।
परी रुक्मी करी द्वेष शिशुपालास इच्छि जो ॥ २५ ॥
बंधूचा रोध ऐकोनी रुक्मिणी दुःखि जाहली ।
त्वरीत द्विज विश्वासू तिने कृष्णासि धाडिला ॥ २६ ॥
द्विज येता महाद्वारी द्वापालेचि पोचिले ।
पाहिले द्विजदेवाने कृष्णा कांचन आसनी ॥ २७ ॥
द्वजभक्त असा कृष्ण उठला पूजिले द्विजा ।
जशा त्या देवता त्याची आदरे करिती पुजा ॥ २८ ॥
सत्कार भोजने होता जावोनी कृष्ण त्याजला ।
चेपिता पाय तो बोले वचने नम्र शांत ते ॥ २९ ॥
द्विजवरा सुखी हो ना धर्म स्वीकृत पूर्वजे ।
पाळण्या न कुठे बाधा संतुष्ट मनि होत ना ? ॥ ३० ॥
द्विजाने मिळते त्यात संतोष मानणे तसा ।
निष्ठेने पाळिता धर्म कामना पूर्ण होत त्या ॥ ३१ ॥
इंद्रपद मिळोनीया संतोष नसता मनीं ।
लागते भटकावे नी संतोषी झोपतो सुखे ॥ ३२ ॥
संतोषे मिळले घेता शांती हीत मिळे तया ।
अशा त्या द्विजदेवाला नमी मी शिर टेकुनी ॥ ३३ ॥
सुविधा आपणा राजा पोचितो का वदा मला ।
प्रजेला पोषिता युक्त दोघां आनंद लाभतो ॥ ३४ ॥
कोठूनी पातले विप्रा कठीण मार्ग येथला ।
इच्छा काय असे सांगा सेवा काय करू तशी ॥ ३५ ॥
मनुष्यरूपि तो कृष्ण द्विजदेवा विचारिता ।
तेंव्हा ते वदले सारे रुक्मिणींचा निरोपही ॥ ३६ ॥
रुक्मिणीने सांगितले की -
( वसंततिलका )
ऐके गुणा भुवनसुंदर मी तुझ्या जै ।
     ते कर्ण मार्गि शिरुनी विझतात ताप ॥
ते रूप नेत्रि बघता पुरुषार्थ होती ।
     सोडोनि लाज सगळी तुज चित्त लागे ॥ ३७ ॥
पाही मुकुंद नयनी अद्वितीय ऐसा ।
     विद्या रुपी नि गुणशील कुले स्वभावे ॥
जीवा मिळेचि बघता रुप शांति थोर ।
     ती कोण हो युवति जी वरि ना तुला की ॥ ३८ ॥
तेणे मनात वरि मी मनि कृष्णदेवा ।
     तू जाणशीच सगळे वरि पत्‍निरूपी ॥
मी देह हा शुरमणी तुज अर्पियेला ।
     हा सिंहभाग मिळवी शिशुपाल कोल्हा ॥ ३९ ॥
दानादि कर्म नियमो व्रत पूजनो नी ।
     सेवा द्विजा नि गुरुची हरिची करी मी ॥
हे सत्य हो तरि मला हरि, कृष्ण येता ।
     ना स्पर्शिणेचि शिशुपाल तनूस माझ्या ॥ ४० ॥
माझ्या विवाह पहिल्या दिनि गुप्त यावे ।
     मारोनि टाक सगळे शिशुपाल आदी ॥
सैन्यास मारुनि मला मग नेउनीया ।
     त्या राक्षसीच विधिने वरिणे मला हो ॥ ४१ ॥
अंतःपुरात निवसे जरि मी तरी पै ।
     सांगेन तीहि इथली रित जी कुळाची ॥
बाहेर मंदिर असे कुळस्वामिनीचे ।
     येई वराति गिरिजापुजनास मी तै ॥ ४२ ॥
ब्रह्मादि घेति तव ती पदधूळ अंगी ।
     तेणेचि त्यां मिळतसे मनि शुद्धि तैसी ॥
ती ना मिळे जर मला त्यजि मी स्वप्राण ।
     जातील जन्म पुढती तरि लाभ होय ॥ ४३ ॥
द्विजदेव म्हणाले -
असा हा गुह्य संदेश यदुदेवा तुम्हास मी ।
सांगण्या पातलो येथे त्वरीत कार्य साधिणे ॥ ४४ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बावन्नावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP