समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५० वा

जरासंधाकडून युद्ध, द्वारकापुरीचे निर्माण -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
अस्ति नी प्राप्ति या दोघी कंसराण्या परीक्षिता ।
पतीनिधनदुःखाने पित्याच्या घरी पातल्या ॥ १ ॥
पिता मगधराजा तो जरासंधास दुःख ते ।
वदल्या विधवा होण्या सकारण प्रसंग तो ॥ २ ॥
शोकाकुल पिता झाला क्रोधाने पेटला पुन्हा ।
ठरवी यदुवंशाला युद्धात संपवावया ॥ ३ ॥
तेविस् अक्षौहिणी सैन्य आणिले मथुरेस नी ।
राजधानी यदुंची ती चौबाजू घेरिली असे ॥ ४ ॥
कृष्णाने पाहिली सेना समुद्रापरि घेरिते ।
आपुले स्वजनो सर्व जनताही भिली तशी ॥ ५ ॥
पृथ्वीचा भार हाराया कृष्णे हा देह धारिला ।
कृष्णाने चिंतिले चित्ती हे काय कार्य आपुले ॥ ६ ॥
चिंतिले छान हे झाले सर्व योद्धेचि पातले ।
आता मी मारितो सर्व रथी पायदळी तसे ॥ ७ ॥
जरासंधा न मारी मी जीवीत राहणे वरा ।
तेणे तो आणखी कांही आणील असुरां इथे ॥ ८ ॥
प्रयोजन असे माझे पृथ्वीचा भार हारिणे ।
रक्षिणे साधु संतांना दुर्जना ठार मारिणे ॥ ९ ॥
धर्मरक्षावया ऐसा मी वेळो वेळि जन्मतो ।
अधर्म रोधण्या सारा अनेक देह धारितो ॥ १० ॥
गोविंदे चिंतिता चित्ती आकाशी दिव्य हो रथ ।
सुसज्ज युद्ध आयूधे सारथे आणिले असे ॥ ११ ॥
दिव्य सनातनो शस्त्र आपोआपचि पातले ।
पाहता भगवान् तेंव्हा बंधू रामास बोलला ॥ १२ ॥
शक्तिशाली तुम्ही बंधू तुम्ही स्वामी नि रक्षक ।
मानिती यदुवंशी हे आता संकट पातले ।
तुमचे प्रिय आयूध हल मूसळ ही रथीं ॥ १३ ॥
संहारा शत्रु ते सारे रथात बसुनी अता ।
स्वजना रक्षिणे तैसे साधुंचे हित साधणे ॥ १४ ॥
तेविस् अक्षौहिणी सैन्य मोठाचि भार हो कमी ।
तेंव्हा श्री बलरामाने धारिले कवचो तसे ।
बैसले रथि नी गेले बाहेर मथुरेचिया ॥ १५ ॥
कृष्णाचा रथ तो हाकी दारूक रथि बैसुनी ।
सवे थोडेचि ते सैन्य कृष्णे शंखहि फुंकिला ॥ १६ ॥
ध्वनी तो ऐकता शत्रु मनात थर्रर्र कांपले ।
पाहता मागधो बोले पुरुषाधम । कृष्ण तू ॥ १७ ॥
लहान आणखी होय लढण्या लाज वाटते ।
लपशी, मारिशी मामा पळ तू नच रे लढू ॥ १८ ॥
तू बळी मरुनी युद्धी इच्छिशी स्वर्ग तो तरी ।
लढ नी जाय स्वर्गी अथवा मज मारणे ॥ १९ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
माघधा शूर जो ऐसा टेंभा ना मिरवी कधी ।
पहा डोक्यावरी मृत्यू न बोल सन्निपातिसा ॥ २० ॥
( इंद्रवज्रा )
श्री शुकदेव सांगतात -
भानू ढगाने अन अग्नि धूम्रे
     न तो दिसे पै नच झाकलेले ।
तसे बळी नी हरि-कृष्ण तेंव्हा
     ध्वजा रथांनी दिसती न कोणा ॥ २१ ॥
सज्जात गेल्या मथुरी स्त्रिया त्या
     कौतुक पाह्या रणभूमिचे ते ।
गरूडचिन्हांकित कृष्णझेंडा
     नी ताड चिन्हांकित त्या बळीचा ।
ध्वजा दिसेना त‍इ शोक होता
     मूर्च्छित झाल्या रमण्या तिथे की ॥ २२ ॥
श्रीकृष्ण पाही अरितीर तेंव्हा
     असंख्य आले जणु वृष्टि होय ।
व्यथीत झाले अपुलेहि वीर
     शारंग्‌धनू ते मग योजि हाते ॥ २३ ॥
भात्यात घाली कर कृष्ण आणि
     काढोनि सोडी कितिएक बाण ।
धनुष्य ऐसे फिरले तदा की
     जै चक्रवातो घुमतो धरेशी ।
हत्ती रथो अश्वहि मागधाचे
     ते पायसैन्यो बहु मारले की ॥ २४ ॥
मेले किती हत्ति तुटोनि डोके
     घोडे शिरावीण कितेक मेले ।
रथा न घोडा अन सारथी तै
     ती स्यंदने कैक निकामि झाली ।
तुटोनि बाहू अन पाय मांड्या
     रणात झाला बहु ढीग मोठा ॥ २५ ॥
मारी बळी तै मुसळेचि शत्रू
     त्या रक्तपाते सरिताच झाल्या ।
कापीत कोणी अपुलाच शत्रू
     घोडे नि हत्ती जुझती तसेच ॥ २६ ॥
पुरात सर्पो त‍इ हात तेथे
     जै कासवे तै शिरे ते कितेक ।
ते मृत हत्ती जणु द्वीप ऐसे
     नक्रापरी अश्वहि भासले की ॥ २७ ॥
माशापरी हात नि पाय होते
     शैवाळ जैसे कचभार भासे ।
ढाली जशा की भवरेच त्यात
     भित्रे पुराला भिउनी पळाले ॥ २८ ॥
सेना जरी जिंकियण्या कठीण
     कृष्णे बळी ने त्वरि मारियेली ।
स्वामी जगाचा करि काय नोव्हे
     हा खेळ त्याया सहजीच आहे ॥ २९ ॥
जो निर्मितो नी लिन सृष्टि घेतो
     कठीण त्याला मग काय विश्वीं ।
तरी मनुष्यापरि वेष धारी
     लीला करीतो म्हणणे तयासी ॥ ३० ॥
( अनुष्टुप् )
मेले ते शत्रुचे सैन्य शत्रूचा तुटला रथ ।
धरितो सिंह जै सिंहा तसा मागध बांधिला ॥ ३१ ॥
विपक्षी नृपती कैक मागधे पूर्वि मारिले ।
बळीने बांधिले आज वरूणफास टाकुनी ॥
बळी तो मारु ही इच्छी परी कृष्णेचि सोडिला ।
असुरा जमवी हा तो आणखी मारण्या पुन्हा ॥ ३२ ॥
शूरवीर असे थोर जरासंधास मानिती ।
लाजला तो बळी कृष्णे दयेने सोडिले तया ॥ ३३ ॥
तपस्या करण्या गेला परी मार्गात भूपती ।
भेटले वदले त्याला जिंकू कृष्णास हो चला ॥ ३४ ॥
सेना सर्वचि मेली नी उपेक्षुनी बळी तदा ।
सोडिता खिन्न तो झाला गेला तो मगधी तसा ॥ ३५ ॥
भगवान् कृष्ण सेनेत न कोणा क्षति पोचली ।
देवांनी वरुनी केली फुलांची वृष्टि तेधवा ॥ ३६ ॥
जरासंध हरे तेंव्हा प्रजा निर्भय जाहली ।
हृदयी दाटला मोद वंदिंनी स्तुति गायिली ॥ ३७ ॥
मथुरीं पातता कृष्ण स्वागता भेरि वासुर्‍या ।
वीणा मृदंग नी शंख यांचा घोषहि जाहला ॥ ३८ ॥
मार्ग समार्जिले सारे हास्याने खेळ चालले ।
तोरणे शोभले झेंडे द्विजांनी मंत्र गायिले ॥ ३९ ॥
प्रवेशता असा कृष्ण स्त्रियांनी पाहिले तया ।
हार फूल दही तैसे अंकूर वाहिले तया ॥ ४० ॥
अपार युद्धिचे द्रव्य वीरांचे दागिनेहि ते ।
दिधले उग्रसेनाला यदुराजास कृष्णने ॥ ४१ ॥
सत्रावेळा जरासंध एवढे सैन्य घेउनी ।
पातला लढला कृष्णा कृष्णसेनेसि ही तसा ॥ ४२ ॥
परंतु यादवे कृष्ण-शक्तिने हरिले तया ।
मारिता सर्व ते सैन्य स्वपुरा पातला पुन्हा ॥ ४३ ॥
संग्राम आठरावा तो योजिता नारदे तदा ।
कालयवन तो दैत्य कृष्णाने पाहिला असे ॥ ४४ ॥
आपुल्या सम तो कृष्ण यादवी थोर सैन्य ते ।
ऐकता तीन कोटीचे म्लेंच्छ सैन्यचि योजिले ॥ ४५ ॥
अकाली पाहिला हल्ला बंधुंनी युक्ति योजिली ।
विपत्ती दोन त्या एका समयी पातल्या तदा ॥ ४६ ॥
बलवान् यवने आज आम्हाला घेरिले असे ।
उद्या वा परवा येई जरासंधहि शत्रु तो ॥ ४७ ॥
लढण्या गुंतलो दोघे तर तो भाउ-बंधु हे ।
बांधोनी नेइ तो यांना बलवान् बहुची असे ॥ ४८ ॥
म्हणोनी निर्मुया दुर्ग दुर्गमो मानवास जो ।
किल्यात ठेवुया सारे मग या यवना वधू ॥ ४९ ॥
बंधूचा घेतला सल्ला कृष्णाने सागरात त्या ।
निर्मिले द्वारकापूर अठ्ठेचाळीस कोस जे ॥ ५० ॥
अद्‌भुत वस्तु त्या तेथे नैपुण्य विश्वकर्मचे ।
योजुनी सडका रस्ते छेदिती ते परस्परा ॥ ५१ ॥
उद्याने शोभली तेथे स्वर्गीय वृक्ष डौलती ।
सुवर्णशिखरे उंच द्वारे सज्जेहि ते तसे ॥ ५२ ॥
चांदीनी पितळेच्या त्या धान्य कोठ्याहि निर्मिल्या ।
स्वर्णमहाल नी त्याच्या शिखरा रत्‍न मौक्तिक ॥ ५३ ॥
मंदिरे वास्तुदेवांची सज्जे सुंदर त्यात ते ।
वर्णचारी असे लोक निवास करण्या असे ।
मध्यभागी नृपाचे नी राम कृष्णमहाल ही ॥ ५४ ॥
सुधर्मा पारिजातो हे देवेंद्रे दिधले तदा ।
सभा ती दिव्य ऐसी की भूक तृष्णा न लागते ॥ ५५ ॥
मनोवेगे असे कैक वरुणे श्यामकर्ण नी ।
कुबेरे अष्टसंपत्ती लोकपाले विभूति त्या ॥ ५६ ॥
शक्तिनी सिद्धिही त्यांनी कृष्णाला दिधल्या पहा ।
तसे तो जन्मता कृष्ण अर्पिल्या पदि सर्व त्या ॥ ५७ ॥
योगमायें तदा कृष्णे स्वजना द्वारकापुरीं ।
दिधले पाठवोनीया उरले त्यास रक्षिण्या ॥
बळीला ठेविले तेथे विचारे माळ घातली ।
अस्त्र शस्त्र न घेता ते आले बाहेर कृष्ण तै ॥ ५८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पन्नासावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP