[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
अक्रूर घेउनी आज्ञा हस्तिनापुरि पातले ।
अक्षय कीर्तिची चिन्हे वस्तुवस्तूत तेथल्या ।
दिसली पुरुवंशाच्या नृपतींची पदोपदी ॥ १ ॥
तिथे ते धृतराष्ट्रोनी भीमो विदुर कुंति नी ।
बाल्हीक सोमदत्तो नी अश्वत्थामा नि द्रोण तै ।
कर्ण दुर्योधनो तैसे युधिष्ठिरादि पांडवा ।
अन्यान्य इष्टमित्रांना भेटले प्रेमपूर्वक ॥ २ ॥
संबंधितासि भेटे जै अक्रूर गाधिनंदन ।
तयांनी पुसले क्षेम मथुरावासिचे तसे ॥ ३ ॥
पाहण्या धृतराष्ट्रो ते पांडवां वागतो कसे ।
राहता दिसले त्यांना शकुनी फूस लावितो ॥ ४ ॥
वदले कुंति विदुरो प्रभाव बल वीरता ।
विनयो शस्त्रकौशल्य पांडवांचे बघोनिया ।
दुर्योधन जळे चित्ती अनिष्ठ करण्या बघे ॥ ५ ॥
दुर्योधनादि बंधूंनी पांडवा कैक वेळ ते ।
वीषपानादिचे घात केलासे अग्निघातही ॥ ६ ॥
कुंतीच्या घरि ते आले भगिनी भेटली तयां ।
माहेरा आठवोनीया अश्रु ढाळीत बोलली ॥ ७ ॥
प्रिय बंधो कधी माझी माय बाप नि बंधु ते ।
भाचे स्त्रिया सख्या कोणी आठवो करितात का ८ ॥
ऐकते मम भाचे ते कृष्ण नी बलराम हे ।
मामे भाऊ मुलांचे जे शरणागतरक्षक ॥ ९ ॥
शत्रुंनी घेरिले आम्हा हरिणी लांडग्यात जै ।
कृष्ण येईल का येथे आम्हाला सुखवील का ॥ १० ॥
(कृष्ण समोर आहे असे समजून म्हणते )
सच्चिदानंद कृष्णा रे योगी विश्वात्मरूप तू ।
गोविंदा भोगिते दुःख सुपुत्रा रक्षि रे मला ॥ ११ ॥
संसार नाशवंतो हा मोक्ष देती तुझी पदे ।
भवाचे भय ते ज्यांना त्यांना आश्रय तूच की ॥ १२ ॥
न स्पर्शी तुजला माया शुद्ध तू परब्रह्मची ।
स्वामी तू साधनांचा, मी शरणी रक्ष तू मला ॥ १३ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
पंजी कुंती तुझी राजा कृष्णाला स्मरुनी तदा ।
बहूत दुःखिता झाली रडली स्फुंद स्फुंदुनी ॥ १४ ॥
अक्रूर विदुरो दोघे सुख दुःख समान त्या ।
वदले कुंतिला दोघे अधर्म मोडण्यास्तव ।
तुजला पुत्र हे झाले या शब्दे समजाविले ॥ १५ ॥
अक्रूर निघता गेले धृतराष्ट्राचिये सभीं ।
सभेत कृष्ण रामाचा संदेश बोलले पहा ॥ १६ ॥
अक्रूर म्हणाले -
धृतराष्ट्र महाराजा वाढवा कुरु कीर्ति ती ।
मरता पंडु तो आता तुम्हीच स्वामि जाहला ॥ १७ ॥
धर्माने पृथिवी पाळा सर्वां आनंदि ठेविणे ।
समान वागता येश सद्गती शेवटी मिळे ॥ १८ ॥
वाईट वागता निंदा, नरकी पडताल की ।
म्हणॊनी पुत्रवत् माना पांडवा कुंतिच्या सुता ॥१९ ॥
अक्षेय कांहि ना राही एकदा सोडणे असे ।
शरीर त्यागिणे लागे पुसणे अन्य काय ते ॥ २० ॥
एकता जन्मतो जीव मरतो अंति एकटा ।
पाप-पुण्य जसे ज्याचे एकटा भोगितो तसे ॥ २१ ॥
आपुले म्हणतो पुत्र पुत्रही वदती तसे ।
अधर्मे लुटिती द्रव्य जळा जळज ते जसे ॥ २२ ॥
अधर्मे पोषिता मूर्ख सर्वांना आपुले म्हणे ।
असंतुष्ट असे त्यांना ठेविता मरतो पहा ॥ २३ ॥
धर्माला त्यजिता प्राणी खरा स्वार्थ न जाणतो ।
पापाचे घेतसे ओझे नरकी पडतो तसा ॥ २४ ॥
महाराजा म्हणोनीया स्वप्नवत् हे मनोरथ ।
प्रयत्ने चित्त रोधावे समत्वीं शांत होइ जे ॥ २५ ॥
राजा धृतराष्ट्र म्हणाला -
कल्याण बोलले माझे जै सुधा मर्तका मिळे ।
अमृते तृप्ति ना होय मी तसा नच तृप्त हो ॥ २६ ॥
हितैषी ! चंचलो चित्त बोध ना ठरतो तिथे ।
पुत्रप्रेमेचि हा भेद विजेच्या परि चित्त हे ॥ २७ ॥
ऐकतो शक्तिमान् कृष्ण पृथ्वीचा भार हारिण्या ।
जन्मले यदुवंशात त्यां इच्छे सर्व ते घडॆ ॥ २८ ॥
( वसंततिलका )
माया अचिंत्य हरिची रचि सृष्टि तैसे
नी त्यात तो शिरुनिया फळ तो विभागी ।
संसारचक्र फिरते हरिची लिला ही
ऐश्वर्यशालि प्रभूसी नमितो पहा मी ॥ २९ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
अभिमान नृपाचा हा ऐकता स्वजनास त्या ।
प्रेमे निरोपिले आणि मथुरी पातले पुन्हा ॥ ३० ॥
परीक्षित सर्व ते कृष्णा बळरामास सर्व तो ।
बोले अक्रूर व्यवहार उद्देश पूर्ण जाहला ॥ ३१ ॥