समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४२ वा

कुब्जेवर कृपा, धनुष्य भंग, कंसाची घबराट -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( इंद्रवज्रा )
श्रीशुकदेव सांगतात -
मार्गात जाता युवती कुणी ती
     रूपी नि कुब्जा अशि ती तनूने ।
हातात होती उटि चंदनाची
     पाहोनी कृष्णे पुसिले हसोनी ॥ १ ॥
हे सुंदरी चंदन नेशि कोठे
     सांगी तुझे नाम असेल सत्य ।
देगे अम्हाला उटि अंगराग
     शीघ्रेचि होई तव ते भले की ॥ २ ॥
सैरंध्री (कुब्जा) म्हणाली -
मी कंसदासी नृपप्रीय ऐसी
     नामे त्रिवक्रा उटि लाविते की ।
या अंगरागे नृप होय तृप्त
     तुम्हाहुनी पात्र न कोणि याते ॥ ३ ॥
( अनुष्टुप् )
कौमार्य रूप नी हास्य पाहता दासि हारपे ।
हरिला अर्पिले चित्त बंधुंना उटि लाविली ॥ ४ ॥
पिवळी सावळ्या देहा गोर्‍या बळिस लाल ती ।
नाभीच्या वरि तो लेप पाहता कृष्ण हर्षले ॥ ५ ॥
प्रसन्न जाहले कृष्ण तात्काल फल दाविण्या ।
त्रिवक्रा रूपवान् दासी निटास कृष्ण इच्छितो ॥ ६ ॥
तिच्या पंजावरी पंजे पायाचे दाबिले तशी ।
बोटांनी हनुवटी थोडी धरिता उंच केलि ती ॥ ७ ॥
अशी उंचविता दासी सर्वांग सम जाहली ।
नितंब स्तन ते पुष्ट कृष्णस्पर्शेचि जाहले ॥ ८ ॥
उदार गुणसंपन्न होता तात्काल रुपिणी ।
कामना जागता लाजे चाळवी पदरा वदे ॥ ९ ॥
वीरा ! माझ्या घरी यावे येथे मी सोडिना असे ।
ढवळे चित्त हे माझे प्रसीद पुरुषोत्तमा ॥ १० ॥
बळी समक्ष हे ऐसे कृष्णाला दासि बोलली ।
गोपमुख बघे कृष्ण हासोनी वदला तिला ॥ ११ ॥
सुंदरी तव तो गेह मिटवी मनव्याधि त्या ।
कार्य आटोपुनी येतो भट्क्या मी मज ना घर ॥ १२ ॥
गोड गोड अशा शब्दे कृष्णे दासी निरोपिली ।
पेठेत पातता बंधू सर्वांनी पूजिले द्वया ॥ १३ ॥
मीलना इच्छिती स्त्रीया दर्शने प्रेम दाटले ।
शुद्ध ना राहिली देही मूर्तीच्या परि ठाकल्या ॥ १४ ॥
यज्ञस्थान पुसे कृष्ण रंगशाळेत पातला ।
अद्‌भूत ते धनू तेथे कृष्णाने पाहिले असे ॥ १५ ॥
संहितेच्या समानार्थी समश्लोक नाही ॥ १६ ॥
( इंद्रवज्रा )
डाव्या कराने उचलोनि कृष्णे
     ओढोनि दोरी करि दोन भाग ।
जै मत्त हत्ती सहजी उसाचे ।
     दो भाग शुडे करितो लिलेने ॥ १७ ॥
( अनुष्टुप् )
धनुष्य तुटता शब्दे पृथ्वी आकाश दुम् दुमे ।
ऐकता कंसही झाला मनात भयभीत तो ॥ १८ ॥
सैनिक क्रोधले सारे वदले यां धरा धरा ।
बांधोनी टाकुया याला न पळो येथुनी तसा ॥ १९ ॥
राम कृष्ण तदा थोडे कोपता धनुखंड ते ।
घेवोनी चोपले भृत्य सर्वच्या सर्वही तदा ॥ २० ॥
कंसे पाठविता सेना दोघांनी खंड मारुनी ।
मारिले सर्वच्या सर्व द्वयो बाहेर पातले ॥ २१ ॥
पराक्रम असा श्रेष्ठ जनांनी ऐकिला तसे ।
पाहिले रूप अद्‌भूत जाणिले श्रेष्ठ देव हे ॥ २२ ॥
बल गोप तसा कृष्ण स्वतंत्र फिरले पुरां ।
सायंकाळी पुन्हा आले बाहेर तळ जेथ तैं ॥ २३ ॥
( वसंततिलका )
लक्ष्मीस इच्छिति जरी जगि सर्व लोक
     ती सर्व सोडुनि वसे परिच्या पदाला ।
आत्म्यात कृष्ण बघती मथुरा पुरीचे
     गोपी जशाहि वदल्या घडले तसेची ॥ २४ ॥
( अनुष्टुप् )
क्षिरादि घेतले भोज कंसवार्तेस घेउनी ।
सुखाने झोपले सर्व कार्य योजूनि ते तसे ॥ २५ ॥
धनुष्य तोडिले कृष्णे मारिले सर्व सैन्य ते ।
न कष्ट पडले त्यांना कंसाने ऐकले तदा ॥ २६ ॥
मनात घाबरे कंस रात्री ना झोप त्याजला ।
जागृत स्वप्निही त्याला दिसले मृत्युचिन्ह ते ॥ २७ ॥
जळात दर्पणी डोक्याविना ते दिसले धड ।
चंद्रादी ज्योतिही त्याला दिसल्या दोन दोनही ॥ २८ ॥
कानात घालता बोटे न येई तो अनाहत ।
पिवळे दिसले वृक्ष पायाचे चिन्ह ना उठे ॥ २९ ॥
स्वप्नात आवळी प्रेता गाढवावरि बैसुनी ।
खातसे वीष नी तेल अंगा लावोनि नग्नची ।
फिरतो अडुळा पुष्प-माला ती गळि घालुनी ॥ ३० ॥
जागृत स्वप्निही ऐसे दुश्चिन्ह पाहि कंस तो ।
भितीने वाढली चिंता चिंतेने झोप ना लगे ॥ ३१ ॥
परीक्षित् संपता रात्र सकाळ जाहली तदा ।
कंसाने मल्लक्रीडेचा केला उत्सव तो सुरू ॥ ३२ ॥
सजली रंगभूमी ती तुतार्‍या भेरि वाजल्या ।
झेंडे वस्त्र फुलांनीही स्थान शोभले तसे ॥ ३३ ॥
द्विजादी आपुल्या स्थानी ग्रामवासीहि बैसले ।
विदेश देशिचे राजे आपुल्या स्थानि बैसले ॥ ३४ ॥
मांडलिका मधे कंस उच्च आसनि बैसला ।
तदाही दिसले त्याला कुशकून कितेक ते ॥ ३५ ॥
हाबूक ध्वनि नी वाद्ये आखाडा घुमु लागला ।
गर्वे मल्ल स्वये आले आपुले गुरु घेउनी ॥ ३६ ॥
चाणूर मुष्टिको कूट शल तोषल आदि ते ।
मधूर बोलती शब्द आसनी बैसले सुखे ॥ ३७ ॥
कंसाने नंद गोपांना बोलावोनीहि ते तयां ।
सत्कार करुनी थोर मंचकी बैसवीयले ॥ ३८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बेचाळिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP