[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
अक्रूर स्तविता ऐसे कृष्णाने विश्वरूप ते ।
दाविले लोपिले जैसे नट तो बदली रुपे ॥ १ ॥
अंतर्धान असे रूप पाहता पातले तिथे ।
बाहेर, येउनी कर्म केले नी रथिं बैसले ॥ २ ॥
विस्मीत दिसता त्यांना कृष्णाने पुसले असे ।
पाण्यात पृथिवी किंवा आकाश पाहिलेत का ? ॥ ३ ॥
अक्रूर म्हणाला -
प्रभो पृथ्वी जलामध्ये अद्भूत नाभिचेहि ते ।
सर्वची तुझिया रूपीं प्रत्यक्ष पाहिले असे ॥ ४ ॥
अद्भूत तेवढ्या वस्तू पाहतो तुझिया रुपी ।
मग मी सलिला मध्ये वेगळे काय पाहतो ॥ ५ ॥
गादिनीनंदने ऐसे बोलता हाकिला रथ ।
ढळता दिन तो गेले मथुरापुरिं सर्व ते ॥ ६ ॥
मार्गात स्थान स्थानी ते मथुरावासि भेटले ।
हर्षले पाहता दोघा न त्यांची पापणी हले ॥ ७ ॥
नंदबाबादि ते सारे आधीच पोचले तिथे ।
पुराच्या द्वारि ते सर्व वाट पाहात थांबले ॥ ८ ॥
तयांच्या पाशि श्री कृष्णे अक्रुराहात ते स्वयें ।
हातात धरले आणि विनये बोलला असे ॥ ९ ॥
काका ! प्रथम हा तुम्ही न्यावा रथ पुरां घरी ।
नगरा पाहण्या पायी येतो आम्ही इथोनिची ॥ १० ॥
अक्रुरजी म्हणाले -
प्रभो ! तुम्हा विना मी तो नगरीं जाउ ना शके ।
स्वामी मी आपुला भक्त न सोडा मजला असे ॥ ११ ॥
या चला बळिनी तुम्ही बाळगोपाळ नंदजी ।
प्रेमाने घर ते माझे सनाथ करणे हरि ॥ १२ ॥
गृहस्थाच्या घरापायधुळिने पावनो करा ।
देवता अग्नि नी गंगा पितरे तृप्तती पदीं ॥ १३ ॥
तुमचे धुवुनी पाय बळीनें यश मेळिले ।
गाती संत सदा ज्याते भक्तांना गति श्रेष्ठ ती ॥ १४ ॥
तुझ्याचि पदिची गंगा त्रिलोक ताप नाशिते ।
खरे पवित्र ते तीर्थ शंकरे शिरि घेतले ॥ १५ ॥
देवांचा देव तू स्वामी कीर्तनीय तुझ्या लिला ।
पुण्यश्लोक यशा गाती तुला मी प्रणिपातितो ॥ १६ ॥
श्री भगवान् म्हणाले -
काका मी दाउच्या संगे येईन आपुल्या घरा ।
यदुंचा शत्रु तो कंस मारिता सुखवीन मी ॥ १७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
भगवान् बोलता ऐसे काका ते हिरमूसले ।
नगरी जाउनी कंसा सांगोनी घरि पातले ॥ १८ ॥
नगरी दिनि तिसर्या प्रहरी कृष्ण नी बलो ।
मथुरा पाहण्या गेले नगरी त्या प्रवेशुनी ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा )
किल्ल्यास तेथे स्फटिकीच भिंती
गोपूर तैसे बहु फाटकेही ।
सुवर्ण द्वारे अन तोरणे ती
भिंतीस तांबे पितळो हि होते ।
प्रवेशण्याला बहु तो कठीण
असाचि होता चर तो जलाचा ।
स्थळो स्थळी त्या रमण्यास बागा
शोभा अशी शोभलि थोर तेथे ॥ २० ॥
ते चौक मोठे धनको महाल
ओटे सभास्थान नि थोर वाडे ।
घरेहि तेथे अतिरम्य तैसी
जेणे पुरा वाढतसेचि शोभा ॥ २१ ॥
वैडूर्य रत्ने पवळे नि मोती
यांनी झरोके सजलेहि सज्जे ।
बाजार चौकी पडले सडे नी
स्थळी स्थळी अंकुर पुष्प शोभा ॥ २२ ॥
दारावरी ते घट चंदनाचे
दह्यादुधाने बहु चोपडीले ।
सपुष्प फांद्या सफलाहि कांही
वस्त्रें असे ते घट शोभलेले ॥ २३ ॥
सबाळगोपाळ नि त्या बळीच्या
पुरात गेला हरि त्या पथाने ।
उत्साहि स्त्रीया चढल्या जिन्यात
पहावया श्रीहरि तो कसा ते ॥ २४ ॥
घाईत वस्त्रे अन दागिनेही
ल्याल्याचि स्त्रीया उलटे तसे की ।
पायात झुबके नुपुरेहि कर्णी
एकाच नेत्री कुणि अंजनो ते ॥ २५ ॥
उष्ट्या कराने कुणि पातल्या की
न स्नान कोणी उटणे तसेची ।
झोपेत कल्गा कुणि ऐकला ती
तशीच गेली हरी पाहण्याला ।
बाळास माता स्तन पाजताना
टाकोनि गेल्याहि जिन्यावरी की ॥ २६ ॥
हत्तीपरी मस्तीत कृष्ण चाले
प्रगल्भ हास्या बघता हरीच्या ।
आनंदले ते नर नारि सर्व
हास्यात त्याने मन चोरिले की ॥ २७ ॥
( वसंततिलका )
होत्या श्रवून ललना हरिच्या लिला त्या
पाही हसून हरिही तव त्या स्त्रियांनी ।
तो धारिला हृदयि नी पुलकीत झाल्या
व्याकूळ चित्त अजि ते बहुशांत झाले ॥ २८ ॥
( अनुष्टुप् )
सज्जात जाउनी कृष्णा नारिंनी पुष्प वाहिले ।
मुखपद्मे स्त्रियांची ती प्रेमाने फुलली पहा ॥ २९ ॥
त्रिवर्णे दहि भातो नी हार चंदन अर्पुनी ।
कृष्ण नी बलरामाला या परी पूजिले असे ॥ ३० ॥
पाहता भगवंताला वदले धन्य गोपि त्या ।
कोणते तप ते त्यांचे परमानंद पाहती ॥ ३१ ॥
रंगारी रजको कोणी कृष्णे येताचि पाहिला ।
मागे कृष्ण तया वस्त्र उत्तमोत्तम जे असे ॥ ३२ ॥
बंधो दे असले वस्त्र पुरेल मजला तसे ।
अधिकार अम्हा तैसा भद्र होईल की तुझे ॥ ३३ ॥
परिपूर्ण असा कृष्ण त्याचेच सर्व विश्व हे ।
रजको मूर्ख कंसाचा क्रोधाने वदला असे ॥ ३४ ॥
राहता जंगली तुम्ही तिथे हे मिळतेच कां ।
उद्दाम जाहला तुम्ही राजाला लुटताय का ? ॥ ३५ ॥
मूर्खांनो जा पळा तैसे जगणे इच्छिता तरी ।
राजभृत्य तुम्हा आता मारोनी लुटतील की ॥ ३६ ॥
ऐकता क्रोधला कृष्ण मिठिने मान आवळी ।
रजको मरुनी खाली धरेशी पडला असे ॥ ३७ ॥
धोब्याचे भृत्य ते सारे गठ्ठे टाकोनि धावले ।
कृष्णाने सर्व ते वस्त्र आपुल्या करि घेतले ॥ ३८ ॥
स्वतः नेसला कृष्ण बळीदाऊसही दिले ।
गोपांना दिधले सार्या बाकी तेथेचि टाकिले ॥ ३९ ॥
जाता पुढे सर्व थोडे भेटला शिंपि त्याजला ।
कृष्णाचे रूप पाहोनी हर्षाने वस्त्र तो शिवी ॥ ४० ॥
वस्त्रांनी शोभले बंधू उत्सवी जणु ते द्वय ।
हत्तीची सजली पिल्ले कृष्ण नी श्वेतवर्णि हे ॥ ४१ ॥
कृष्णे प्रसन्न होवोनी शिंप्याला धन नी बल ।
अतिंद्रिय अशी शक्ती देवोनी भक्तिही दिली ॥ ४२ ॥
पुन्हा कृष्ण सुदाम्या या माळ्याच्या घरी पातले ।
पाहता वंदिले त्याने डोके भूमीस टेकुनी ॥ ४३ ॥
आसने घातली आणी धुतले हात पाय ते ।
तांबूल चंदने हारें विधिने कृष्ण पूजि तो ॥ ४४ ॥
वदे कृष्णां तुझी दोघे पातले धन्य आज मी ।
पवित्र जाहले कूळ चौऋणी मुक्त जाहलो ॥ ४५ ॥
दोघेही जनकल्याणा जन्मले पृथिवीवरी ।
ज्ञान बलादि अंशाने घेतला अवतार हा ॥ ४६ ॥
भजका पावशी तूनी तुला ना भेद तो मुळी ।
जगाचा सुहृदो तूची तूचि सर्वात व्याप्त की ॥ ४७ ॥
दास मी करणे आज्ञा सेवा काय करू तुम्हा ।
कृपेने देशि तू आज्ञा नियुक्त करिशी तुची ॥ ४८ ॥
राजेंद्रा ! स्तविता माळी कृष्णाचा हेतु जाणुनी ।
प्रेमाने पुष्पमाला त्या गंधीत अर्पिल्या द्वया ॥ ४९ ॥
गोपांना दिधले तेंव्हा प्रसन्न कृष्ण जाहला ।
शरणागत त्या माळ्या श्रेष्ठची वर ते दिले ॥ ५० ॥
सुदामा वदला कृष्णा जीवां आत्माचि तू प्रभो ।
सर्वरूप तुझ्या पायी दयाभाव असाचि दे ॥ ५१ ॥
तो तो वर दिला कृष्णे अक्षयी धन ही दिले ।
कांती कीर्ती बलो आयू त्यांदेता निघले पुढे ॥ ५२ ॥