[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
केशीस कंसे व्रजि धाडिले तो
होवोनि अश्वो व्रजि पातला नी ।
टापे भुमिसी उखडीत आला
आयाळ झट्के ढग पांगले की ॥ १ ॥
खिंकाळता लोक भिले मनात
मोठेचि डोळे मुख खोड जैसे ।
देहे दिसे तो घटची ढगाचा
भूकंप होई पद आपटीता ॥ २ ॥
श्रीकृष्ण पाही जन भीतियुक्त
ढगांपरी तो हलवीहि पुच्छ ।
झूजावया धुंडुनि पाहि अश्व
सिंहध्वनीने मग कृष्ण बोले ॥ ३ ॥
पाहोनि कृष्णा मग तो चिडोनी
आकाश प्याया जणु तोंडवासी ।
खरेचि केशी बहुही प्रचंड
कृष्णासि झाडी मग दोन लाथा ॥ ४ ॥
कृष्णे तया वंचियले नि हाते
पायी धरी जै गरुडोचि सर्पा ।
क्रोधेचि त्याला फिरवून फेकी
त्या चारशे हातहृ अंतराला ॥ ५ ॥
सचेत होता मग केशि धावे
फाडोनि तोंडा हरिच्या तनूशी ।
तो पहाता हासुनि कृष्ण पाही
मुखात डावा कर घालि त्याच्या ॥ ६ ॥
परीक्षिता ते कर कोवळे की
ते तप्त लोहा परि तोंडी त्याच्या ।
जाळोनि दातां उपटोनि काढी
नी वाढ वाढे मुखि हात त्याच्या ॥ ७ ॥
दाटोनि हाते मग श्वास गेला
पायास आप्टी भिजले शरीर ।
बाहेर डोळे पडले तयाचे
पडे मरोनी मळ त्यागुनीया ॥ ८ ॥
शेंदाड फाटे तयि फाटला तो
नी कृष्ण काढी अपुल्या कराला ।
अनायसे शत्रुस मारिता तैं
पुष्पेचि देवे बहुवृष्टि केली ॥ ९ ॥
हितैषी सर्व जीवांचे भगवत्प्रेमि नारद ।
कंसाच्या पासुनी आले कृष्णा एकांति बोलले ॥ १० ॥
श्रीकृष्णा सच्चिदानंदा योगेशा जगदीश्वरा ।
जगाचा वासुदेवो तू यदुवंश शिरोमणी ॥ ११ ॥
सर्व काष्ठा मधे एक अग्नि तैं प्राणियात तू ।
राहसी पंचक्रोशात साक्षे जीवास जाणसी ॥ १२ ॥
सर्वांचा तू अधिष्ठाता अधिष्ठान विहीन तू ।
मायेने निर्मिसी सृष्टी पोषिसी लीनि नेशिही ॥ १३ ॥
राक्षसे दावने दैत्ये राजांचे वेष घेतले ।
तयांना नष्टिण्या तैसे धर्मरक्षार्थ जन्मला ॥ १४ ॥
आनंद वाटतो हा की सहजी केशि मारिला ।
पळाले स्वर्गिचे देव खिंकाळी ऐकता तशी ॥ १५ ॥
परवा तुझिया हाते चाणूर मुष्टिकादिक ।
हत्ती नी कंसराजा हे मेलेले मी बघेन की ॥ १६ ॥
काल यौवन नी मूर शंखा नी नरकासुरो ।
मेलेले पाहि ती मौज कल्पवृक्षासि आणिता ॥ १७ ॥
कृपा नी वीरता रूपा पाहोनी शुल्क देउनी ।
वरितील बहू कन्या द्वारकी नृग मोचिसी ॥ १८ ॥
स्यमंतकमणी रत्न जांबवान् पासुनी तसा ।
आणिसी, द्विजपुत्राला मरता जीववीसि की ॥ १९ ॥
सोंगाड्या वासुदेवाला पौंड्रका वधुनी पुन्हा ।
जाळीसी काशिपूराते मारिसी शिशुपाल तू ।
द्वारकेस वसोनीया साधिशील पराक्रम ।
ज्ञानी नी प्रतिभावंत गातील तेहि पाहि मी ॥ २१ ॥
पृथ्वीचा भार सांडाया अर्जूनसारथी तसा ।
होवोनी कैक अक्षौणी मारिशी मीच पाहि तैं ॥ २२ ॥
( इंद्रवज्रा )
विशुद्ध विज्ञान घनःस्वरूपा
वस्तूत होशी मिळाल्या तुला त्या ।
संसार चक्री नितमुक्त तूची
गुणप्रवाहा तुजला नमी मी ॥ २३ ॥
स्वतंत्र तू नी तै आंतरात्मा
न भेद तूते मुळि शेष नाही ।
क्रीडार्थ तू हा अवतार घेशी
नमो तुला रे यदुवंश श्रेष्ठा ॥ २३ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
देवर्षिनी असा कृष्ण स्तविला नी प्रणामिला ।
रोमांच उठले अंगी गेले आज्ञाहि घेउनी ॥ २५ ॥
केशीला मारिता कृष्ण गाई चारावया पुन्हा ।
जातसे खेळ खेळाया वनात लपना छपी ॥ २६ ॥
एकदा चारता गाई चोर नी कुणि रक्षक ।
जाहले खेळती खेळ लपना छपनी असा ॥ २७ ॥
सर्वात कुणि ते चोर मेंढा नी कुणि रक्षक ।
जाहले निर्भये खेळ खेळता रमले तसे ॥ २८ ॥
त्या वेळी गोप वेषाने तो व्योमासुर पातला ।
चोर तो सहसा होई लपवी गोप मेंढ जे ॥ २९ ॥
गुंफेत लपवी गोप शिळेने बंद ती करी ।
खेळता चार वा पाच राहिले बाळ गोप ते ॥ ३० ॥
कृष्णाने जाणिले कृत्य येता तो गोप न्यावया ।
कृष्णाने धरिला त्याला सिंह मेढी धरी तसा ॥ ३१ ॥
बळी व्योमासुरो मोठा घेतसे सत्य रूप ते ।
वाटले सुटतो त्याला परी कृष्णेचि दाबिले ॥ ३२ ॥
पाडिले भूमिसी आणि गळाचि फाडिला असे ।
विमानी देवता सर्व पाहती हरिची लिला ॥ ३३ ॥
गुंफेचे दार कृष्णाने तोडोनी गोप सोडिले ।
गायल्या देवता श्रेष्ठ व्रजात गोप पातले ॥ ३४ ॥