समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३६ वा

अरिष्टासुराचा उद्धार, कंस अक्रूराला व्रजात पाठवितो -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
व्रजात कृष्ण जै जायी तेंव्हा उत्सवची असे ।
कंपती धरणी केली अरिष्टे बैल हो‍उनी ॥ १ ॥
डर्काळे उकरी माती प्रचंड पुष्ट तो असा ।
उचली शेपटी शिंगे शेत वाड्याहि नष्टिल्या ॥ २ ॥
मुते नी शेणही टाकी डोळे फाडोनि पाहतो ।
गर्जता पडले गर्भ स्त्रियांच्या पोटिचे तदा ॥ ३ ॥
प्रचंड देह त्याचा तो काय तो सांगणे असे ।
पर्वतो वाटला मेघा खेटले त्यास येउनी ॥ ४ ॥
तीक्ष्ण ते शिंग पाहोनी गोप गोपी भिल्या तदा ।
पशू तो स्थान सोडोनी पळाले दाहिही दिशा ॥ ५ ॥
वाचवी कृष्ण कृष्णा रे वदती व्रजवासि ते ।
भयातुर असे गोप गोविंदे पाहिले तदा ॥ ६ ॥
न भ्यावे वदला कृष्ण असुरां वदला पुन्हा ।
मूर्खा दुष्टा असा त्यांना दाविशी भय काय ते ॥ ७ ॥
दुष्टांचे बळ नी गर्व हरोनी मीच मारितो ।
वदता शड्डु ठोकोनी क्रोधिण्या आपुला कर ॥ ८ ॥
मित्राच्या ठेविला स्कंधि आव्हाने दैत्य क्रोधला ।
झपाटी हरिसी येता पुच्छे विस्कटिले ढग ॥ ९ ॥
रोखिले तीक्ष्ण ती शिंगे वटारी लाल नेत्र ते ।
तुटोनी पडला अंगी इंद्राचे व्रज जैं सुटे ॥ १० ॥
कृष्णाने धरिली शिंगे हत्ती हत्तीस ठोशि जैं ।
तसाचि फेकिला मागे आठरा पाय अंतरी ॥ ११ ॥
हरिने फेकिता त्याला उठला क्रोधुनी बहू ।
झपाटे श्वास फेकोनी लत्पटे सर्व अंग ते ॥ १२ ॥
( इंद्रवज्रा )
हा मारु इच्छी हरि पाहि तेंव्हा
     मारोनि ठोसा चकचूर केला ।
जै पोतिरा तो पडला धरेशी
     नी तिंबिला तो उपटोनि शिंगे ॥ १३ ॥
रक्तास ओकी मुतला नि हागे
     बाहेर त्याचे द्वय नेत्र आले ।
झाडोनि पाया मग प्राण सोडी
     देवो फुले वाहुनि स्तोत्र गाती ॥ १४ ॥
( अनुष्टुप् )
गोपांनी वाहवा केली अरिष्टासुर मारिता ।
गोठ्यात कृष्ण ये तेंव्हा गोपिंचे नेत्र पाणले ॥ १५ ॥
अद्‌भूत कृष्ण लीला या अरिष्टासुर मारिता ।
भगवान् नारदे सारे कंसाला कथिले असे ॥ १६ ॥
"कंसा जी सुटली पुत्री यशोदेचीच ती असे ।
व्रजात देवकीकृष्ण रोहिणीचाहि तो बळी ॥ १७ ॥
वसुदेवे भिवोनीया नंदाच्या घरि ठेविले ।
वधिती दैत्य भृत्याते" ऐकता कंस क्रोधला ॥ १८ ॥
मारण्या वसुदेवाते तयाने खड्ग घेतले ।
नारदे रोधिले त्याला ओळखी कंस मृत्यु तो ॥ १९ ॥
बांधिले वसुदेवाला कैदेत टाकिले पुन्हा ।
जाता नारद ते तेंव्हा केशीला वदला असे ॥ २० ॥
व्रजी त्वरित तू जावे मारावे कृष्ण नी बळी ।
पुन्हा मुष्टीक चाणूरा तोशला शल आदिला ॥ २१ ॥
पैलवान तसे मंत्री यांजला बोलला असे ।
वीरांनो गोष्टि या सार्‍या ऐकाव्या ध्यान देउनी ॥ २२ ॥
बलराम नि तो कृष्ण पुत्र ते वसुदेवचे ।
व्रजात राहती त्यांच्या हाताने मम मृत्यु हो ॥ २३ ॥
तेंव्हा ते पातता येथे कुस्तीच्या माध्यमे तयां ।
मारावे, सजवा मंच बोलवा लोक सर्वही ॥ २४ ॥
चतूर माहुता तूं तो कृष्ण द्वारासि पातता ।
माजरा हत्ति सोडोनी कृष्णा तेथेचि मारणे ॥ २५ ॥
मित्ति चतुर्दशीला तो धनुष्ययज्ञ मांडणे ।
भैरवा पशुहत्त्येने प्रसन्न करणे पहा ॥ २६ ॥
स्वार्थसिद्धांत तो कंस जाणी की रे परीक्षिता ।
अक्रूरा बोलवोनीया धरोनी हात बोलला ॥ २७ ॥
उदार अक्रूरा तुम्हा नित्य मी आदरीतसे ।
मित्रोचित करा कार्य तुम्ही माझे भले करा ॥ २८ ॥
श्रेष्ठ हे काम की तैसे आश्रयी पातलो तुम्हा ।
आश्रये विष्णुच्या इंद्र स्वार्थची साधितो तसा ॥ २९ ॥
नंदव्रजी तुम्ही जावे पुत्र ते वसुदेवचे ।
तथोनी रथि आणावे न वेळ सत्वरी निघा ॥ ३० ॥
ऐकतो विष्णुच्या हाती देवता मम मृत्यु तो ।
योजिती, नंदजी गोपा गौरवे आणणे इथे ॥ ३१ ॥
येथे येताचि त्यांना मी हत्तीच्या पायि मारितो ।
वाचले तर हे शाक्त कुस्तीत मारतील की ॥ ३२ ॥
मारिता वसुदेवो नी कृष्ण भोजादि वंशिचे ।
शोकात बुडती तेंव्हा स्वहस्ते वधितो तया ॥ ३३ ॥
म्हातारा तो पिता माझा तरीही राज्य इच्छितो ।
उग्रसेन पिता आदी द्वेषींना मीच मारितो ॥ ३४ ॥
मित्र अक्रूरजी तेंव्हा होई मी पृथिवी पती ।
सासरे ते जरासंध नी प्रीय द्विविदो सखा ॥ ३५ ॥
शंबरा नरको बाण हे तो मित्रचि सर्व ही ।
सहाय्ये त्या तयांच्या मी मारीन अन्य भूपती ॥ ३६ ॥
गुप्त मी वदलो सारे पोरांना आणणे त्वरे ।
बघाया धनुयज्ञाते चला हे एवढे वदा ॥ ३७ ॥
अक्रूरजी म्हणाले -
राजे हो इच्छिता मृत्यू टाळणे योग्य ते असे ।
समभावेचि बागावे दैवाने फळ लाभते ॥ ३८ ॥
मनाचे बांधिता पूल नष्टिते दैव त्यास की ।
सुखलाभीं न हो दुःख मी तो आज्ञाचि पाळितो ॥ ३९ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
अक्रूरां आणि मंत्र्यांना कंसे आज्ञा दिली अशी ।
महाली कंस तो गेला अक्रूर आपुल्या घरा ॥ ४० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर छत्तिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP