समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३८ वा

अक्रूरजीची व्रजयात्रा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
अक्रूर बुद्धिमान् रात्री मथुरी थांबुनी पुन्हा ।
उषःकाली रथा मध्ये निघाले व्रजभूमिसी ॥ १ ॥
अक्रूर व्रज मार्गात कमलाक्ष हरीचिया ।
भक्तिने घरले पूर्ण मनात चिंतु लागले ॥ २ ॥
कोणते पुण्य मी केले तपस्या दान कोणते ।
जयाचे फळ ते आज घडते ,कृष्ण दर्शन ॥ ३ ॥
विषयासक्त मी ऐसा ऋषिंनाही न तो मिळे ।
दुर्लभो मजला जैसे शूद्रपुत्रास वेद ते ॥ ४ ॥
तरीही मजला नक्की घडेल कृष्णदर्शन ।
काळाचा ओघ हा ऐसा तृण जै पार हो नदी ॥ ५ ॥
अशूभ नष्टले माझे साफल्य जन्मि जाहले ।
आज त्या चरणी साक्षात् नमस्कार करीन मी ।
यती योगी ययांचा जो ध्यानाचा विषयो असे ॥ ६ ॥
( इंद्रवज्रा )
कंसेचि केली बहु ही कृपा की
     स्वयं हरीच्या पदि पावतो मी ।
अज्ञान नाशी नखकांति ज्याची
     स्वयं हरी तो प्रगटे इथे की ॥ ७ ॥
ब्रह्मादि देवो पद ध्याति ज्याचे
     लक्ष्मी नि ज्ञानी नच सोडि ज्याते ।
चारावया गायिहि तेच जाती
     नी रंगती गोपिका वक्षगंधे ॥ ८ ॥
त्या पोवळ्यांचा पदि रंग आहे
     मधु स्मितो नासिक पोपटाचे ।
गालावरी केश रुळोनि येती
     त्या श्रीमुखा मी अजि पाहतो की ।
अवश्य होई मज दर्शनो ते
     हरीण धावे उजव्या कराने ॥ ९ ॥
हरावया भार धरेशी विष्णु
     स्वेच्छे मनुष्यीं करितोय लीला ।
लावण्यधामो मज आजि भेटे
     नेत्रासि माझ्या फळ आज लाभे ॥ १० ॥
द्रष्ट जगाचा नच स्पर्शि माया
     भेद भ्रमोही दुर राहि त्याच्या ।
द्रष्टी कटाक्षे रचि जीव सारे
     गोपिं सवे तो व्रजि खेळ खेळे ॥ ११ ॥
वाणीसि गाता हरिकीर्ति कर्म
     स्फूःर्तीच लाभे जिवनी तयांच्या ।
धुवोनि जाते अपवित्र सारे
     न गाति ते तो जितप्रेत ऐसे ॥ १२ ॥
माहात्म्य त्याच्या गुणकीर्तनी हे
     तो विष्णु साक्षात् यदुवंशि जन्मे ।
भद्रार्थ भक्ता अन देवतांच्या
     व्रजात राही गुण देव गाती ॥ १३ ॥
संदेह नाही अजि पाहि त्याला
     संताश्रयो नी गुरु जो जगाचा ।
लक्ष्मीपतीते अजि पाहतो मी
     या सुप्रभाती शुभ होय सर्व ॥ १४ ॥
रथातुनी धावत मी चलेन
     पडेत पाया बळि कृष्ण यांच्या ।
ते ध्यान बिंदू पद पाहि आज
     वंदीन बाळे मग गोपिकांची ॥ १५ ॥
भाग्येचि जातो पदि मी पडेन
     ठेवील का तो शिरि हात माझ्या ।
सदाचि दे जो अभयो जगास
     जे काळ सर्पाबहु भीत त्यांना ॥ १६ ॥
इंद्रे बळीने पुजिले पदाला
     त्रिलोकराज्ये दिधली तयांना ।
सुगंध येतो हरिपाद पद्मा
     गोपीस स्पर्शी थकता हरी तो ॥ १७ ॥
मी कंसदूतो हरिपाशि आलो
     मला न मानो हरि शत्रु तैसा ।
सर्वज्ञ तो ना कधि मानि तैसे
     क्षेत्रज्ञ रूपे बघतो स्वयें तो ॥ १८ ॥
राहीन तेथे कर जोडुनीया
     पाहीन प्रेमे हरि तैं मला की ।
जन्मांतरीचे मग पाप नासे
     नीमग्न होतो बहु मी सदाचा ॥ १९ ॥
मी त्या घराचे बहु हीत इच्छी
     वक्षास घेई मज देव तोची ।
आलिंगने पावन देह होई
     येईल शक्ती दुसर्‍या करासी ॥ २० ॥
आलिंगिता मी झुकवीन डोके
     म्हणेन काका मजला हरी तो ।
साफल्य होई मम जीवनाचे
     न कृष्ण ज्याचा, मृत देह तोची ॥ २१ ॥
शत्रू नि मित्रो हरिसी कुणी ना
     हरी कुणाला नच की उपेक्षी ।
जै कल्पवृक्षो मनि इच्छिता दे
     भक्तास तैसा हरि प्रेम देतो ॥ २२ ॥
राहीन तेथे कर जोडुनीया
     नेईल रामो मजला घरात ।
सत्कार तेथे मजला मिळेल
     पुसेल कंसो घरच्यास कैसा ॥ २३ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
श्वफल्कपुत्र अक्रूर चिंतनी बुडता रथे ।
पोचले नंदगावात अस्ताला रवि जाय तैं ॥ २४ ॥
( इंद्रवज्रा )
इंद्रादि ज्याला नमितात नित्य
     गोठ्यात ते पाय अक्रूर स्पर्शी ।
पद्मांकुशाचे पदिचिन्ह होते
     भूमी ठशाने बहु शोभली की ॥ २५ ॥
आल्हादुनी ते विव्हळोनि गेले
     रोमांच आले नयनात पाणी ।
रथातुनी धावत तेथ आले
     वदे प्रभूची पदधूळ ही की ॥ २६ ॥
( अनुष्टुप् )
अवस्था अक्रूराचे ती जीवांचा उच्च लाभ तो ।
भावना त्यागुनी सर्व हरीशी भाव लाविणे ॥ २७ ॥
व्रजीं अक्रूर जाता तै कृष्ण नी बलराम तो ।
उभेचि दुग्धशाळेत कमलाक्ष असे द्वयो ॥ २८ ॥
किशोर गौर श्यामो हे सौंदर्यखानची जसे ।
हत्तीची चालची तैसे हास्य नी लांब त्या भुजा ॥ २९ ॥
ध्वज अंकुश नी वज्र पद्मचिन्ह धरेस त्या ।
मंदहास्य दया पूर्ण औदार्यमूर्ति ते जसे ॥ ३० ॥
औदार्यपूर्ण त्या लीला प्रकाशे वनमाळ ती ।
आत्ताच स्नान ते केले लिपिली चंदनो उटी ॥ ३१ ॥
पाहिला अक्रूरे राजा ! जगद्‌हेतु जगत्‌पती ।
जगाच्या रक्षणासाठी पूर्णांशी पुरुषोत्तम ॥ ३२ ॥
जन्मले कृष्ण रामो हे कांतिने तम संपतो ।
पर्वता स्वर्ण चांदीने मढिता झळके जसा ॥ ३३ ॥
पाहता प्रेमभावाने अक्रूर भरले पहा ।
रथीचे धावले खाली साष्टांग नमिती द्वया ॥ ३४ ॥
आल्हाद दर्शने झाला भरले नेत्र अश्रुने ।
गळा दाटोनि आला नी स्वनाम वदु ना शके ॥ ३५ ॥
कृष्णाने जाणिले चित्ती ते चक्रांकित हात जे ।
लावोनी ओढिले आणि हृदयी धरिले पहा ॥ ३६ ॥
विनये बळिशी येता गळ्यात लाविला गळा ।
दोघांनी धरिले हात घरात आणिले तयां ॥ ३७ ॥
बहू सत्कारिले गेही क्षेम ते पुसले असे ।
आसनी मधुपर्काने विधिने पाय धूतले ॥ ३८ ॥
शय्या देवोनि पायांना चेपोनी सेविले असे ।
थकवा जाय तो तेंव्हा मिष्टान्न भोजनो दिले ॥ ३९ ॥
भगवान् बळिने तेंव्हा माला तांबूल अर्पिले ।
सुगंधी द्रव्य अर्पोनी केले आनंदी तो तयां ॥ ४० ॥
सत्कारे पुसती नंद कंसाने त्रासिता तुम्ही ।
जिवंत राहिले कैसे बकरी खाटका पुढे ॥ ४१ ॥
बिलग्‌त्या बहिणीचे जो छोटेसे बाळ मारितो ।
तया राज्यीं सुखी तुम्ही कल्पना करणे कशी ॥ ४२ ॥
दोघांनी पुसले क्षेम सन्मान दिधला तयां ।
प्रवासथकवा सारा गेला अंगातुनी तदा ॥ ४३ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अडोतिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP