[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( शुद्धकामदा )
विरहात गोपिका गातात -
महति वाढली की व्रजी अशी
त्यजुनि धाम लक्ष्मी इथे वसे ।
चरणि प्राण अर्पोनि गोपिका
वनि वनीहि धुंडीति हो पहा ॥ १ ॥
हृदयस्वामि तू दासि आम्हि की
कमल कर्णिका गंध चोरिसी ।
बघुनि तू अम्हा विंधिसी हरी
वधचि नेत्रमारुनि साधिसी ॥ २ ॥
जलविषा पिऊनीहि मृत्यु वा
असुर राक्षसो मारण्यास ये ।
शतमखे जरी मेघ वर्षिले
समयि सर्व तू रक्षिसी अम्हा ॥ ३ ॥
नचहि केवलो पुत्र गोपिचा
अखिल जीविचा जीव तू हरी ।
हृदयि राहसी साक्षि तू जिवा
तनय प्रार्थिता जन्मला व्रजी ॥ ४ ॥
करिसि कामना पूर्ण तू हरी ।
अभय देसि तू प्रार्थिती तया ।
कर करी हरी लक्ष्मिसी दिला
शिरिहि आमुच्या तोच ठेव तू ॥ ५ ॥
हरिसि दुःख तू या व्रजींचिये
मधुर हास्य ते गर्व हारि ते ।
रुसु नको प्रिया दासि आम्हि की
मुख अम्हा तुझे दावि सावळे ॥ ६ ॥
चरणपद्म ते पाप नाशिती
स्वकरि लक्ष्मिजी सेविते तया ।
फणिवरा वरी ठेविसी पदा
हृदयि ठेवि ते तोषवी अम्हा ॥ ७ ॥
मधुर बोलसी ज्ञानिही रमे
मधुर शब्द ते एक एक की ।
वदसि शब्द त्यां गोपि रम्यती
अधरपान दे तृप्तवी अम्हा ॥ ८ ॥
तव कथामृतो तप्त जीवना
मिटवि पाप नी ताप ही असा ।
कवि नि भक्त ते गाति कीर्तनी ।
बहुहि भूसि दाता जिवास तू ॥ ९ ॥
दिन असे असा हास्यि मग्नता
मनिहि ध्यान ते क्रीडसी असा ।
हृदयिच्या अशा करिसी गोष्टि तू
कपटि आज कां क्षुब्धला मनीं ॥ १० ॥
चरण ते तुझे कोवळे तसे
कुरण चारण्या गायि नेसि तै ।
बहुत कष्ट ते सोसिशी पदा ।
हृदयि भेटण्या प्रेम येतसे ॥ ११ ॥
दिनहि जै सरे येसि तू घरा
धुळहि गोक्षुरी केशिं येतसे ।
रुप तुझे असे दविलेस तू
हृदयि भेटण्या प्रेम दाटले ॥ १२ ॥
मिटवि दुःख तू एकमात्रची
चरणि येइ त्या तोषिसी बहू ।
चरण दुःख ते नाशिती असे
स्तनिहि ठेव ते तोषवी मना ॥ १३ ॥
अधर अमृते विरह संपतो
अधर वंशि ती नित्य चुंबिते ।
पिउनि एकदा मोह तो नुरे
रस असा अम्हा वाटि श्रीहरी ॥ १४ ॥
वनि विहारण्या जाशि तू जधी
पळहि वाटते यूगची जसा ।
परतसी जधी पाहता रुपा
नयन फाकती पापणी न हो ॥ १५ ॥
पति सुतो तसे बंधु सोयरे
कुळहि त्यागुनी पायि पातलो ।
मनि तुझी बहू आस घेतली
कपटि तू असा सोडिसी अम्हा ॥ १६ ॥
मिलन व्हावया गोष्टि बोलसी
बघसि तू जधी वक्ष रुंदते ।
दिसत नेत्रि श्रीवत्सचिन्ह ते
मुहुरली मने मुग्ध जाहलो ॥ १७ ॥
व्रजिचिया जना सुखचि द्यावया
धरिसि देह हा भद्र साधण्या ।
हृदय हे जळे औषधीचि दे
हृदयरोग हा संपवी अता ॥ १८ ॥
( वसंततिलका )
ते कोवळे पद बहू स्तन हे कठीण
टेकी हळूच कुठे क्षति पोचिवीता ।
नी त्या पदे भटकसी वनि आनवाणी
होतो अचेत जिव हा तुजसाठि वाचे ॥ १९ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ एकतिसावा अध्याय हा ॥ १० ॥ ३१ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥