समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३० वा

श्रीकृष्णाच्या विरहात गोपींची अवस्था -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
अचानक हरु गुप्त होता तै व्रजयूवती ।
हत्तिणी गजराजाच्या विना जै दुःखि जाहल्या ॥ २ ॥
( इंद्रवज्रा )
हत्तीपरी कृष्णहि चालतो नी
     नेत्रेनि हास्ये मन चोरितो की ।
शृंगारभावे हरि चोरि चित्त
     त्या मत्त गोपी हरिरूप झाल्या ॥ ३ ॥
कृष्णापरी बोलल्या चालल्या त्या
     गती मतीने हरिरूप आले
देहाभिमाना विसरूनि सार्‍या
     मी कृष्ण शब्दे वदती पहा की ॥ ३ ॥
गावोनी लीला हरिच्याच त्यांनी
     वना वना माजिहि धुंडिला तो ।
तो सर्वव्यापी नच दूर जायी
     तरीहि वृक्षां पुसतात गोपी ॥ ४ ॥
( अनुष्टुप् )
पिंपळा पांगर्‍या गेला नंदाचा नंदनू पहा ।
चोरोनी आमुचे चित्त तुम्ही तो पाहिलात का ? ॥ ५ ॥
चाफ्या पुन्नाग वृक्ष्यांनो बंधू जो बलरामचा ।
हासता अप्सरा मोही आला का तो इथे वदा ॥ ५ ॥
बहिणी तुळशी सांग तू तो कोमल सांग की ।
तुझे तो हरिशी प्रेम श्याम तो पाहिलास कां ॥ ७ ॥
मालती मल्लिके जाई माधवा पाहिलेत का ।
कोवळा स्पर्श देवोनी गेला का इकडे कुठे ॥ ८ ॥
( वसंततिलका )
जांभूळ बेल कचनार नि आम्रवृक्षा
     नी लिंब नी तरुवरो यमुना तटीचे ।
तुम्ही परार्थ जगता हरिवीण आम्ही
     बेशुद्ध हो‍उ बघतो हरिमार्ग सांगा ॥ ९ ॥
हे प्रेयसी पृथिविगे तप काय केले
     रोमांच तूज उठती हरिपाद स्पर्शे ।
तो वामनोचि तुज व्यापितसे पदाने
     कां त्या वराह हरिने तुज धन्य केले ॥ १० ॥
गे मैत्रिणी हरिणिनो हरि श्यामरूपी
     गेला इथूनि नजरा चुकवीत कान्हा ?
तो गंध येइ इकडे हरि कुंदमालीं
     जो कुंकुमे नि हरिसंगि असाचि भासे ॥ ११ ॥
एका करात कमळो दुसरा प्रियेसी
     माळा गळ्यात तुळशी नित भृंगनाद ।
ऐशा हरीस नमिण्या तुम्हि वाकला का
     प्रेमे तुम्हा बघितले नच काय थोडे ॥ १२ ॥
( अनुष्टुप् )
वेलिंना पुसुया बाई वृक्षां आलिंगिती पहा ।
रोमांच अंगि यांच्या तो भाग्यची हरि स्पर्शियां ॥ १३ ॥
कंपल्या मत्त गोपी त्या कृष्णाला शोधिता तदा ।
आवेशे भगवत्‌लीला आचरूं लागल्या पहा ॥ १४ ॥
एक ती पूतना झाली दूजी कृष्ण पियी तिला ।
कुणी गाडा तशी झाली ठोकरी कृष्णरूपिणी ॥ १५ ॥
बाळकृष्ण कुणी झाली तृणवर्त तशी कुणी ।
चालती रखडोनिया पैंजणे वाजती पदीं ॥ १६ ॥
एक कृष्ण कुणी राम अन्य त्या गोप जाहल्या ।
वत्सासुर बकासूर वधाच्या करिती लिला ॥ १७ ॥
वनात बासुरीनादे पशुंना बोलवी कुणी ।
वाहवा वाहवा कोणे गोपरूपात बोलल्या ॥ १८ ॥
कृष्ण ती जाहली कोणी सखीच्या गळि हात तो ।
टाकुनी वदते कैशी कृष्ण मी बघ चाल गे ॥ १९ ॥
गोपी - कृष्ण कुणी होता वदती वज्रवासिनो ।
न भ्यावे पावसा वार्‍या पहा गोवर्धनो असा ।
धरिला करि मी यावे ओढणी धरुनी तशी ॥ २० ॥
एक ती कालिया झाली कृष्णेली शिरि पाय तो ।
ठेउनी वदते जा तू मी तो दुष्टासि मारितो ॥ २१ ॥
एवढ्यात कुणी बाला वदते वन पेटले ।
नेत्रबंद करा तुम्ही तुम्हा मी वाचवीतसे ॥ २२ ॥
यशोदा एक झाली नी दुसरी कृष्ण जाहली ।
यशोदा पुष्पमाळेने बांधिते उखळास की ॥ २३ ॥
परीक्षित् ! करुनी लीला वृक्षांना पुसती पुन्हा ।
कृष्णाचे एक जागेशी दिसले पदचिन्ह ते ॥ २४ ॥
पाहता वदली कोणी ध्वज पद्मांकुशो असे ।
दिसती या ठशां माजी कृष्णाचे पदचिन्ह हे ॥ २५ ॥
व्रजवल्लभ कृष्णाला धुंडीत चालता पुढे ।
गोपीची पदचिन्हेहि दिसली त्याच जोडिला ॥ २६ ॥
दुःखाने वदल्या हत्ती सोबती जाय हत्तिण ।
तशी कृष्णासवे कोणी गेली भाग्यवती पहा ॥ २७ ॥
अवश्य‌ऽऽराधिका त्याची तिला तो हरि पावला ।
श्यामाने त्यजिले आम्हा दोघे एकांति पातले ॥ २८ ॥
प्रिये कृष्णपदरजा स्पर्शिता भाग्य केवढे ।
ब्रह्मादी सर्व ते घेती कल्याणा शिरि त्या रजा ॥ २९ ॥
सखे कांहिहि हो तैसे कृष्णाला सखि ती कुणी ।
एकटी नेउनी घेऊ अधरामृतपान ते ॥ ३० ॥
इथे कोठे सखीचे तो पदचिन्ह न भूमिसी ।
कृष्णे कां घेतले स्कंधी पायांना तृण टोचता ॥ ३१ ॥
सखे पाही इथे चिन्ह वाळूत रुतले पहा ।
कळते घेइ तो ओझे प्रियेचे स्कंधि आपुल्या ॥ ३२ ॥
पहा ! पहा ! इथे फूल तोडण्या सखि टेकिली ।
प्रियेसाठी फुले तोडी पंजाच खोल हा रुते ॥ ३३ ॥
कृष्णाने प्रेमिका ऐशी प्रियेला विंचरोनिया ।
वेणीशी माळिली पुष्पे बसले असतील ते ॥ ३४ ॥
परीक्षिता ! असा कृष्ण संतुष्ट पूर्णकामि तो ।
न कोणी दुसरा तैसा क्रीडेची रचि ही लिला ॥ ३५ ॥
मत्त होवोनि त्या गोपी दाविती पदचिन्ह ते ।
तिकडे सोबती जी ती तिलाही गर्व जाहला ॥ ३६ ॥
इतरां सोडिता कृष्ण मलाचि वश जाहला ।
जगात श्रेष्ठ मी धन्य माझा हा मान केवढा ॥ ३७ ॥
देवाधिदेव कृष्णाला वदते थकले पद ।
इच्छिसी जेथ जाणे तू तेथ ने उचलोनिया ॥ ३८ ॥
वदला ठीक तो कृष्ण खांद्याशी बैसण्या प्रिया ।
प्रयत्‍न करिता तैसा हरि तो गुप्त जाहला ।
पुन्हा ती रडली आणि पश्चात्ताप हि पावली ॥ ३९ ॥
नाथा सख्या कुठे रे तू दासी मी दीन हो बहू ।
त्वरीत जवळी यावे मला दर्शन दे हरि ॥ ४० ॥
शोधीत पदचिन्हाते अन्य गोपीहि पातल्या ।
तयांनी पाहिली प्रीया वियोगे जी अचेत ती ॥ ४१ ॥
तिजला उठवीती नी सर्व सन्मान बोलली ।
कुटील बोलता मीच कृष्ण तो गुप्त जाहला ।
ऐकता बोल ते ऐसे आश्चर्य सर्व पावल्या ॥ ४२ ॥
शोधिले चांदणे सर्व पुढे अंधार दाट तो ।
जाता कृष्ण पुढे जाई म्हणोनी लोटल्या पहा ॥ ४३ ॥
गोपिंचे मन नी वाणी कृष्णरूपचि जाहली ।
कृष्णाचे गीत त्या गाती घराची शुद्धही नसे ॥ ४४ ॥
गोपिंचा रोम नी रोम हरिची वाटपाहतो ।
पातल्या वाळवंटात लीलाही गाउ लागल्या ॥ ४५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP