समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २९ वा

रासलीलेचा आरंभ -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
कृष्णसंकेत ती रात्र शरदीं फुलली फुले ।
गोपिंना हर्ष तो झाला माया ती योजुनी हरी ।
प्रेमिकांच्याच इच्छार्थ रासक्रीडेस हो म्हणे ॥ १ ॥
( इंद्रवज्रा )
हर्षे प्रिया जै पतिसी निवांत
     तै केशराने शशिप्राचि न्हाली ।
उन्हात जे जीव तपोनि गेले
     ते सर्व आता मनि शांत झाले ॥ २ ॥
संकोचला तो मनिं चंद्र थोडा
     रमे परी तो दिसु लागला की ।
नी चांदणे ते पसरे वनासी
     क्लीं शब्दी कृष्णो हळु वंशि फुंकी ॥ ३ ॥
या वंशिनादे हरि प्रेमिकांच्या
     वृत्तीस जिंकोनि कधीच ठेला ।
सख्या त्यजोनी पळल्या प्रिया त्या
     नी कुंडले ती बहु हालली की ॥ ४ ॥
( अनुष्टुप् )
काढिती धार ज्या कोणी टाकोनी पळल्या तशा ।
चुलीसी दूध स्वैपाक टाकिता कैक धावल्या ॥ ५ ॥
पाजिता स्तन बाळाला पतीला सेविता कुणी ।
जेविता त्यजिले कोणी प्रिय कृष्णास भेटण्या ॥ ६ ॥
अंजनो उटणे कोणी अंगिरा चंदना कुणी ।
लाविता सोडिले, वस्त्र लेवोनी धावल्या कुणी ॥ ७ ॥
ज्येष्ठांनी रोधिता कोणा न कोणी थांबल्या घरा ।
विश्वमोहन कृष्णाने आत्मा चोरोनि घेतला ॥ ८ ॥
घरात कोंडले ज्यांना न मार्ग लाभला जयां ।
भावनायुक्त ध्यानाने गळाले नेत्र त्यांचिये ॥ ९ ॥
अशूभ जळले ध्याने कृष्ण ध्यानात भेटला ।
कृष्णा आलिंगिती चित्ती परंशांतीच लाभली ॥ १० ॥
जारभाव तयां चित्ती कृष्णाशी असला जरी ।
आलिंगिती जयाशी त्या कृष्णरूपास पावल्या ॥ ११ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
मानिती त्या प्रियो कृष्णा नवखा ब्रह्मभाव तो ।
गुणासक्त असोनीया निवृत्त जाहल्या कशा ॥ १२ ॥
श्रीशुकदेव सांगतात ।
पूर्वीच वदलो मी तो चेदीने द्वेषिला हरी ।
यांनी तो प्रमिला कृष्ण याच्यात नवलाव ना ॥ १३ ॥
अप्रमेय असा कृष्ण कल्याण गुण आश्रय ।
कल्याण दावितो रूप लीला या करितो अशा ॥ १४ ॥
त्या मुळे हरिला ध्याता असो कोणीहि तो तसा ।
ज्या त्या भावे हरी पावे वृत्ती हो हरिरूप ती ॥ १५ ॥
तुमच्या परि जो भक्त तेणे शंका धरू नये ।
आश्चर्य हरिचे काय त्यां इच्छे विश्व भद्र हो ॥ १६ ॥
व्रजींच्या विभुती गोपी समीप हरि पाहता ।
विनोदे बोलला कृष्ण चातुर्ये मोहुनी तयां ॥ १७ ॥
श्रीभगवान् कृष्ण म्हणाले -
स्वागतं हो महाभागा काय सेवा करूं तुम्हा ।
ठीक की त्या व्रजामध्ये तुम्ही आल्या कशास हो ॥ १८ ॥
विंचू काटा इथे राही रात्रीच्या समयास या ।
व्रजी त्वरित जा तुम्ही स्त्रियांची वेळ ना अशी ॥ १९ ॥
व्रजात नसता तुम्ही धुंडितील तुम्हा पती ।
माय बाप तसे बंधू न टाका संकटी तयां ॥ २० ॥
वनीची पाहता पुष्पे चंद्र तो रंगला कसा ।
रेखिले चित्र जै कोणी यमुना जल स्पर्शुनी ।
वाहतो मंद हा वारा हालती तरु वेलि त्या ॥ २१ ॥
पाहिले तुम्हि हे सारे त्वरेने घरि जा पहा ।
कुलीन सति हो सार्‍या पती सेवेत जा अता ।
वासरे लेकरे सारी रडती दूध प्यावया ॥ २२ ॥
माझ्या प्रेमात गुंतोनी पातल्या योग्य ही असे ।
जगीचे जीव ते सारे तुष्टती मज पाहता ॥ २३ ॥
संतानपालनी धर्म पतीसेवा तशीच ती ।
गृहिणींचा असे श्रेष्ठ ऐका गोपी प्रिया तुम्ही ॥ २४ ॥
गती हवी जया चांग जर पापी पती नसे ।
न त्यजवा जरी मूर्ख दरिद्री रोगिही तरी ॥ २५ ॥
कुलीन ललना यांना जार सेवाचि निंद्य ती ।
न मिळे स्वर्ग तो त्यांना कुकर्म तुच्छनी क्षणिक् ॥ २६ ॥
श्रवणे दर्शने ध्याने कीर्तने बांधणे मला ।
सान्निध्यात न हो प्रेम तरी जा आपुल्या घरा ॥ २७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
ऐकता भगवत् वाक्य उदास गोपि जाहल्या ।
फुटल्या सर्व आकांक्षा चिंतेत बुडल्या पहा ॥ २८ ॥
( वसंततिलका )
ते लाल ओठ सुकले अन श्वास उष्ण
     पाहोनि खालि नखटोचविती भुईला ।
दुःखाश्रुने धुतलिसे उटि ती स्तनीची
     दुःखात तै बुडुनिया नच शब्द ओठीं ॥ २९ ॥
ते भोग सर्व हरिला दिधले तयांनी
     तो बोलता त्यजुनि हे बहु दुःखि झाल्या ।
झालेहि नेत्र रडुनी बहु लाल त्यांचे
     धीरेचि त्या प्रणय कोपि वदोनि गेल्या ॥ ३० ॥
गोपिका म्हणाल्या -
तू सर्वव्यापि हरि रे मन जाणितोसी
     निष्ठूर हे नच वदो तव पादप्रेमी ।
आलोत सर्व त्यजुनी तव भक्त सार्‍या
     स्वीकार तू करि, नको त्यजु दूर आता ॥ ३१ ॥
संतान नी पतिचि ती करणेच सेवा
     ते सर्व योग्य परि ही तव पादसेवा ।
आम्ही करोत तशि ही बहुसार हीच
     आत्मा जिवास असशी तुचि प्रीय कृष्णा ॥ ३२ ॥
ज्ञानी म्हणून करिती तुज प्रेम ऐसे
     तू नित्य लाभ मिळता नच इच्छु कांही ।
पावी कृपा करुनिया कमलाक्ष कृष्णा
     आशालतेसि नच तू मुळि छेदु ऐसा ॥ ३३ ॥
आम्ही घरात रमलो घरकाम धंदी
     आलोत येथ त्यजुनी तुज काय त्याचे ।
सोडोनि पाय तुझिये नच जात आम्ही
     जावोनि काय करणे व्रजि काम धंदा ॥ ३४ ॥
हे वल्लभा तवचि गीत प्रिया सख्यांच्या
     प्रेमाग्नि तो हृदयि चेतवुनीच राही ।
तूं तो मिटीव हरि रे मुखिच्या रसाने
     ना हे जळो हृदय हे पदप्राप्ति घेवू ॥ ३५ ॥
तू लाविशी बहुहि प्रेम अशा अम्हाला
     तेणेचि या चरणि आम्हि सदैव येतो ।
जे पाय श्रीसि कधि तो क्वचिदोचि लाभ
     ते ना कधीहि त्यजुकी, त्यजिले घराते ॥ ३६ ॥
लक्ष्मी कटाक्ष मिळण्या तप देव ध्याती
     वक्षस्थलासि तुलसी सवती सवे ती ।
रज्जूकणार्थ पदिच्या करितेय स्पर्धा
     भक्त समान अरि या पदि पातलो की ॥ ३७ ॥
येताचि पायि हरि रे मिटतेय चिंता
     आम्हास ही सुखवि तू तव पायि आलो ।
कृपार्थ पात्र करि नी विझवीहि आग
     दासी म्हणोनि ठिविणे तशि संधी द्यावी ॥ ३८ ॥
की कुंडले नि कुरुळे कच शोभती नी
     गालात हास्य विलसे नि सुधा मुखात ।
श्रीचिन्ह वक्षि रुळते अभयोचि हस्त
     पाहोनि सर्व भुललो पदि दासि झालो ॥ ३९ ॥
मूर्ती तुझीहि अशि की तव रूप थेंबे
     सौंदर्य सृष्टि भरते तिन्हि लोक ध्याती ।
नी गायि पुष्प हरिणी पुलकीत होती
     विश्वीं असेल कुणि का तुज त्यागु इच्छी ॥ ४० ॥
नारायणो जयि करी प्रतिपाल देवां
     तैसा व्रजास हरि तू बहु रक्षितोसी ।
आतून आम्हि जळतो तुज भेटण्याला
     ठेवी करास शिरि नी जिवदान द्यावे ॥ ४१ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
योग्यांचा योगि तो कृष्ण व्याकुळ शब्द ऐकता ।
रमे जो आत्मरूपात हांसोनी क्रीडु लागला ॥ ४२ ॥
(इंद्रवज्रा)
गोपीनुच्छे हरि क्रीडला तै
     अच्यूतहास्यी खुलल्या कळ्या त्या ।
त्या भोवताली जमल्या हरीच्या
     जै तारकांच्या शशि आत राही ॥ ४३ ॥
(अनुष्टुप)
वैजयंती गळा कृष्णी ते वृंदावन शोभले ।
गोपिंनी गायिल्या लीला सौंदर्यगीत साजिरे ॥ ४४ ॥
यमुना तटीची वाळू झळके कापुरा परी ।
आनंदी गंधवाय़् तो क्रीडले गोपि कृष्ण तै ॥ ४५ ॥
( वसंततिलका )
आलिंगने पसरि बाहु नि हात दावी ।
     मांड्या स्तनो नि निवि वेणी धरी कुणाचे ।
नी टोचवी नख कुणा अन हासु लागे ।
     चेतोनि गोपिशि हरी क्रिडला बहूही ॥ ४६ ॥
( अनुष्टुप् )
गोपिंचा हरिने ऐसा केला सन्मान तो बहू ।
जगात आम्हिची धन्य गोपी त्या मानु लागल्या ॥ ४७ ॥
सौभाग्यगर्व गोपींचा कृष्णाने जाणिला असे ।
करण्या दूर तो कृष्ण सर्वांत गुप्त जाहला ॥ ४८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणतिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP