समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २८ वा

वरुणलोकातून नंदाबाबाची सुटका -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
एकादशी निराहारे नंदांनीपूजिला हरी ।
द्वादशीच्या निशीला ते स्नाना कालिंदि पातले ॥ १ ॥
वरूणभृत्यू ती वेळ असुरी निशिची पहा ।
भृत्ये नंदा धरोनीया वरुणापाशि आणिले ॥ २ ॥
गोप ते वदले सारे कृष्णा रे बलरामजी ।
तुम्हीच वाचवू शक्य नंदाला, रडले तसे ।
कृष्णाने जाणिले नंदा भृत्याने धरिले असे ॥ ३ ॥
गेला तो वरुणा पासी वरुण हर्षला तदा ।
पूजिले हरिला त्याने पुन्हा तो बोलला असा ॥ ४ ॥
वरुण म्हणाला -
सार्थकी देह हा माझा झालासे पाद्य पूजनी ।
जयांना लाभते संधी न ते येती भवीं पुन्हा ॥ ५ ॥
परमात्मा ब्रह्म देवा न माया शिवते तुला ।
वदते श्रुति ती ऐसे तुजला मी प्रणामितो ॥ ६ ॥
अज्ञानी मूर्ख हा भृत्य कर्तव्याते न जाणितो ।
नंदांना आणिले येथे क्षमावे कृपया मला ॥ ७ ॥
गोविंदा जाणितो मी की तुमचे प्रेम त्यां बहु ।
न्यावे यांना परी देवा कृपावे दास मी असे ॥ ८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् ! भगवान् कृष्ण देवांचा देव तो असे ।
व्रजात आणिले नंदा सर्वां आनंद जाहला ॥ ९ ॥
इंद्रियातीत वरुणी नंदे संपत्ति पाहिली ।
वरुणे नमिला कृष्ण पाहोनी हर्ष पावले ॥ १० ॥
नंदांनी कथिता लोका वदले लोक कृष्ण हा ।
स्वयंचि भगवान् सत्य स्वलोका नेइ आपणा ॥ ११ ॥
सर्वदेशी असा कृष्ण लपेल रूप ते कसे ।
गोपांची जाणितो इच्छा संकल्प करितो तसा ॥ १२ ॥
संसारी अज्ञ ते जीव विवीध कामना मनीं ।
धरोनी करिती कर्म तेणे तो भटके तसा ॥ १३ ॥
दयाळू हरिने ऐसे मनात चिंतिले असे ।
तमहीन स्वलोको तो सर्वांना दाविला पहा ॥ १४ ॥
सत्य ज्ञान अनंतो नी ब्रह्म ज्योती सनातन ।
गुणातीत असे रूप तयांना आधि दाविले ॥ १५ ॥
अक्रूरा जे तळ्या मध्ये दाविले तेच या जनां ।
डुलकी लागली सर्वां दिसले धाम तेधवा ॥ १६ ॥
पाहोनी भगवद्‌रूपा नंदादी मग्न जाहले ।
कृष्णाला वेद ते गाती बघोनी हर्ष पावले ॥ १७ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठ्ठाविसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP