समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २७ वा

श्रीकृष्णाचा अभिषेक -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
गिरि तो धारिता कृष्णे रक्षिले जीव सर्व ते ।
गोलोककामधेनू नी स्वर्गीचा इंद्र पातला ॥ १ ॥
लज्जीत जाहला इंद्र कृष्णाला द्वेषिल्या मुळे ।
एकांती गाठिला कृष्ण चरणी शीर टेकिले ॥ २ ॥
कृष्णप्रभाव पाहोनी इंद्राचा गर्व नष्टला ।
न गर्व तिन्हि लोकांचा हात जोडोनि बोलला ॥ ३ ॥
( इंद्रवज्रा )
इंद्र म्हणाला -
तुझे असे रूप विशुद्ध सत्व
     नी शांत ज्ञानोमय मुक्त ऐसे ।
माया तुझी ही दिसते जगी की
     अजाण त्यांना गमते खरीच ॥ ४ ॥
देहादिकाचा नच स्पर्श तूंते
     तुला न क्रोधो अन दोष तैसे । अज्ञानसृष्टी नच स्पर्शि तूते      रक्षावया धर्मचि तू जहाला ॥ ५ ॥
जगत्‌पिता नी गुरु स्वामि तूची
     तू कालरूपी जगिचा नियंता ।
त्या भक्तकार्यार्थ तुझाऽवतार
     दंडोनि गर्व्या करिशी लिला या ॥ ६ ॥
ईशत्व गर्वो ममची परी ज्या
     त्यजोनि त्याला तुज जे पहाती ।
नी भक्तिमार्गे भजती तुला ते
     दुष्टार्थ तू दंडहि घेसि हाती ॥ ७ ॥
ऐश्वर्य धुंदे अवमानिले मी
     शक्ती तुझी ही नव्हती कळाली ।
क्षमा करावी अपराधियासी
     अज्ञानि दुष्टो न शिकार व्हावा ॥ ८ ॥
असूरसेनापति माजले ते
     त्यांच्याचि दंडा तव कृष्णरूप ।
वधोनि त्यांना मग मोक्ष देसी
     जे भक्त त्यांना हरि रक्षिसी तूं ॥ ९ ॥
( अनुष्टुप् )
नमी मी भगवंताला सर्वात्मा वासुदेवला ।
यदुंचा स्वामि तू एक नमो रे भक्त वत्सला ॥ १० ॥
स्वतंत्र असशी तू तो स्वेच्छेने देह धारिशी ।
विशुद्ध ज्ञानरूपी तू आत्माराम नमो नमः ॥ ११ ॥
गर्व क्रोध मला भारी माझ्या यज्ञास त्यागिता ।
व्रज ते मारण्या इच्छे वृष्टी मी बहु वर्षिली ॥ १२ ॥
परी अनुग्रहो पूर्ण केला तू मजला असा ।
स्वामी तू गुरुनी आत्मा नमितो तुज मी पुन्हा ॥ १३ ॥
श्रीशुकदेव शांगतात -
कृष्णाची स्तुति ही ऐशी देवेंद्रे गायिली तदा ।
हासुनी मेघनादाने इंद्रासी कृष्ण बोलला ॥ १४ ॥
श्री भगवान् म्हणाले -
इंद्रा तू माजता तैसा यज्ञ मी मोडिला असे ।
आता तू नित्य ते ध्यान लावोनी मजला स्मरी ॥ १५ ॥
ऐश्वर्ये माजतो त्याला न कळे काळ रूप मी ।
शिरी मी असतो नित्य तैं कृपे धन नाशितो ॥ १६ ॥
इंद्रा कल्याण हो सारे जा आता पाळि बोध हा ।
गर्व ना करि तू तेंव्हा न ओलांडी सिमा कधी ॥ १७ ॥
आज्ञापिता असे कृष्णे सवत्स कामधेनु ती ।
पातली वंदिता कृष्णा वदली बोल हे असे ॥ १८ ॥
कामधेनु म्हणाली -
कृष्ण कृष्ण महायोगी विश्वात्मा विश्वसंभवा ।
विश्वाचा रक्षिता तूची सनाथ अजि मी असे ॥ १९ ॥
पूज्यदेवा जगन्नाथा आमुचा इंद्र तूचि रे ।
द्विज गो देवता साधू यांचा तू इंद्र हो अता ॥ २० ॥
ब्रह्माजीप्रेरणे आम्ही गाई इंद्राचि मानुनी ।
तुजला अभिषेकीतो हरिशी पृथ्वीभार तो ॥ २१ ॥
श्रीशुकदेव म्हणतात -
श्रीकृष्णां बोलता ऐसे सुरभी आपुल्या दुधे ।
आणि ऐरावते शुंडे खगंगाजल आणुनी ॥ २२ ॥
देवर्षीसह यांनी श्रीकृष्णाला अभिषेकिले ।
गोविंद नाम हे त्यांनी कृष्णाला ठेविले असे ॥ २३ ॥
( इंद्रवज्रा )
तैं नारदो तुंबर सिद्ध आणि
     गंधर्व विद्याधर हेहि होते ।
नी लोकपाले स्तुति गायिली तै
     नी अप्सरांनी बहु मृत्य केले ॥ २४ ॥
त्या श्रेष्ठ देव सुमवृष्टि केली
     नी कृष्णदेवा स्तुति गायिली ती ।
त्रिलोक हर्षी बुडले पहा ते
     गो स्तन्यदुग्धे भिजली धरा ही ॥ २५ ॥
( अनुष्टुप् )
नद्यांना रस ते आले मधुधारा तरूतुनी ।
औषधी अन्न पृथ्वीशी पर्वतीं रत्‍न पातले ॥२६ ॥
परीक्षिता ! अभिषेक कृष्णाला जाहला तदा ।
क्रूरही प्राणि ते वैर सांडोनी राहु लागले ॥ २७ ॥
इंद्र नी धेनुने ऐसे गोविंदा अभिषेकिले ।
संमती घेउनी गेला गंधर्वा सह इंद्र तो ॥ २८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सत्ताविसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP