समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २६ वा

नंदबाबास कृष्णाच्या प्रभावाविषयी गोप बोलतात -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
पाहोनी कृष्णकार्याते गोप आश्चर्य पावले ।
तयांना थांग ना लागे एकमेकास बोलती ॥ १ ॥
अद्‌भुत कर्म कृष्णाचे खेडुतीं जन्मला असा ।
निंदीत ते तया साठी खरे हे जाहले कसे ? ॥ २ ॥
गजाने सहजी पद्म ध्यावे तैं धारि हा गिरी ।
वय तो सात वर्षाचे खेळणी परि हा धरी ॥ ३ ॥
माणसा हे कसे शक्य कृष्ण हा शिशु आसता ।
पिला तो पुतना प्राण जसा काळचि हा तिचा ॥ ४ ॥
असता तीन मासाचा रडता पाय झाडिता ।
गाडा मोठाहि त्याने तो फेकिला उलटोनिया ॥ ५ ॥
असता एक वर्षाचा वार्‍याने उडला तदा ।
तृण‍आवर्त दैत्याच्या नर्डीचा घोट घेतला ॥ ६ ॥
त्या दिनीं पाहिले सर्वे लोण्याची चोरि हा करी ।
उखळा बांधिता माता ओढोनी वृक्ष तोडि हा ॥ ७ ॥
सवे गोपाळ रामाच्या जाता हा गायि चारण्या ।
बगळारूप दैत्याने गिळिता चिरि हा तया ॥ ८ ॥
वासरू हो‍उनी दैत्य घुसता कळपात तो ।
कृष्णाने मारिला त्याला खर वृक्षासि फेकिला ॥ ९ ॥
बळीच्या सह राहोनी धेनुकासुर मारिला ।
गाढवारूपिचे सारे मारिले दैत्य नी तिथे ।
ताडाचे वन ते सर्वां फळास मुख जाहले ॥ १० ॥
बलरामा करें याने प्रलंबासुर मारिला ।
पेटता वनिचा अग्नी गाई गोपाळ रक्षि हा ॥ ११ ॥
केवढा कालिया सर्प याने तो काढिला वरी ।
विषारीजल कालिंदी केले अमृत गोड जै ॥ १२ ॥
नंदजी ! सावळ्या कृष्णी स्वभावे प्रेम ते असे ।
आहे हे मानितो आम्ही याचे कारण काय ते ॥ १३ ॥
बरे हा सात वर्षाचा उचली थोर तो गिरी ।
तेही त्या सातरात्रीसी शंका मोठीच वाटते ॥ १४ ॥
नंदबाबा म्हणाले -
गोपांनो ! ऐकणे सारे तेंव्हा शंका न ती उरे ।
महर्षि गर्ग ते याला पाहता बोलले असे ॥ १५ ॥
प्रत्येक युगि हा बाळ वेगळ्या रंगि जन्मतो ।
श्वेत पीत नि तै रक्त या गेळी कृष्ण वर्ण तो ॥ १६ ॥
नंदजी ! तुमचा पुत्र पहा त्या वसुदेवच्या ।
घरी हा जन्मला तेणे वासुदेवहि नाम त्यां ॥ १७ ॥
कर्मानुसार ते याचे कितेक नाम रूप ते ।
जाणतो सगळे मी ते न साधा जाणितो कुणी ॥ १८ ॥
कल्याण करि हा सर्वां गो गोपा मोदवील हा ।
याच्याच सहवासाने विपत्ती पार होत त्या ॥ १९ ॥
व्रजराज गतकाळी पृथ्वीशी नृपना उरे ।
चोरांनी लुटिता सारे येणे संतांसि रक्षिले ॥ २० ॥
तुमच्या सावळ्या पुत्रा प्रेमी ते भाग्यवंतची ।
देव ते विष्णु छायेत तसे रक्षील प्रेमिका ॥ २१ ॥
गुणैश्वर्य स्वरूपाने नारायण असाचि हा ।
अलौकिक अशी कीर्ती न करा नवलाव तो ॥ २२ ॥
आदेश देउनी ऐसा गेले गर्ग पुन्हा घरां ।
त्या वेळा पासुनी मी हा भगवत् अंश मानितो ॥ २३ ॥
नंदमुखातुनी ऐशा गर्गवाणीस ऐकता ।
हर्षले सर्व ते गोप कृष्णाचे कार्य जाणिले ।
नंदबाबास हर्षोनी कृष्णासी ते प्रशंसिती ॥ २४ ॥
( शार्दूल विक्रीडित )
यज्ञो भंगचि इंद्र तो बघुनिया क्रोधोनि वृष्टी करी ।
तेणे गोकुळिचे अतीव पिडले वत्से नि धेनू जिवो ।
पाहोनी हरि तो हसोनि गिरि घे रक्षीतसे सर्वची ।
इंद्राचा मद कृष्ण हा हरितसे तो विष्णु पावो अम्हा ॥ २५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सव्विसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP