[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
इंद्राला कळता कोपे नंदबाबा नि गोप यां ।
क्रोधे त्या नच हो कांही गोपा रक्षक कृष्ण तो ॥ १ ॥
पदाचा गर्वि तो इंद्र क्रोधाने लाल जाहला ।
सांवर्तक अशा मेघा वदला व्रजि वर्षण्या ॥ २ ॥
वदला जंगली लोका धनाचा गर्व जाहला ।
मनुष्य कृष्ण तो साधा बळे त्याच्या न मानिती ॥ ३ ॥
त्यजिता ब्रह्मविद्येला मूर्ख ते भवसागरी ।
सुकाणू तुटल्या नावीं तरेल कोण सागरी ॥ ४ ॥
नादान मूर्ख हा कृष्ण विद्वान मानितो स्वयें ।
स्वताच घास मृत्यूचा त्यावरी हे विसंबती ॥ ५ ॥
धनाचा गर्व तो त्यांना कृष्ण तो त्याच चेतवी ।
धुळीत मेळवा गर्व पशूसंहार तो करा ॥ ६ ॥
तुमच्या पाठिशी येतो ऐरावतहि घेउनी ।
मरुद्गणासवे घेतो नंदाचे व्रज नष्टितो ॥ ७ ॥
इंद्रे आज्ञापिले मेघ सोडोनी बंधने तसे ।
व्रजी ते पातले सर्व मुसळधार वर्षले ॥ ८ ॥
चौदिशां चमके वीज टकरीं मेघ गर्जती ।
प्रचंड वादळा योगे गाराही पडु लागला ॥ ९ ॥
वरचेवर ती येती ढगांची दळ ती बहू ।
खांबाच्या परि त्या धारा भूमी ना कळते कशी ॥ १० ॥
मुसळधार वर्षा नी वार्याने पशु कंपले ।
त्रासले गोप गोपीही कृष्णाच्या पायि लागले ॥ ११ ॥
मुसळधार वृष्टीने थंडीने त्रासता असे ।
डोके नी पुत्र झाकोनी कृष्णपायास लागले ॥ १२ ॥
कृष्ण कृष्ण महाभागा तू नाथ गोकुलप्रभू ।
रक्षी तू इंद्रकोपात तुझ्या भाग्यी अम्ही सुखी ॥ १३ ॥
गारा पाऊस मार्याने लोक मूच्छित होत हे ।
कृष्णाने पाहता सारे इंद्राचा कोप जाणिला ॥ १४ ॥
मनात वदला कृष्ण इंद्राचा यज्ञ मोडिता ।
क्रोधला वर्षता ऐसा गारांचा मारही तसा ॥ १५ ॥
तयाचे योगमायेने ऐश्वर्यगर्व नष्टितो ।
मूर्खत्वे मानितो श्रेष्ठ देतो उत्तर त्या असे ॥ १६ ॥
सत्वप्रधान ते देव गर्व हा त्यांजला नको ।
सत्व जे त्यजिती त्यांच्या हितार्थ गर्व नष्टि मी ॥ १७ ॥
व्रजी आश्रित ते माझे रक्षिता मीच त्यांजला ।
संतांची करणे रक्षा माझे कार्य असे सदा ॥ १८ ॥
या परी वदुनी कृष्णे खेळणी परी तो गिरी ।
उचलोनी करीअं घेतो भूछत्र घेइ मूल जैं ॥ १९ ॥
पुन्हा तो वदला बाबा ! माता जी ! व्रजवासिनो !
तुम्ही गोवर्धना खाली गो वत्सासह जा बसा ॥ २० ॥
न शंका मुळे ती माना न पडे गिरि हातिचा ।
वारा नी पावसा मध्ये रक्षार्थ योजि मी असे ॥ २१ ॥
कृष्णे आश्वासिता ऐसे धाडसें गोप सर्व ते ।
गाड्या आश्रित नी भृत्य गोधना घेउनी सवे ।
पुरोहितां सवे आले खाली गोवर्धना तदा ॥ २२ ॥
कृष्णाने भूक तृष्णा नी विश्रांती त्यजुनी स्वयें ।
गिरी तो धरिला सात दिनी थोडा न हालता ॥ २३ ॥
कृष्णाच्या योगमायेने चकीत इंद्र जाहला ।
तर्कटी संपली सारी वर्षा थांबविली तये ॥ २४ ॥
स्वच्छ आकाश ते झाले वारा ही थांबला तदा ।
दिसता सूर्य श्रीकृष्ण गोपांना वदला असे ॥ २५ ॥
गोपांनो निर्भये आता स्त्रिया गोधन बालके ।
सर्वांना घेउनी जावे ओसरे जल सर्व ते ॥ २६ ॥
कृष्णाची ऐकुनी आज्ञा धेनू वत्स स्त्रिया मुले ।
वृद्धांना सह घेवोनी गाड्यांत सर्व वस्तुही ।
घेवोनी निघले सारे निवांत व्रजि पातले ॥ २७ ॥
शतिमान् भगवान् कृष्णे पाहता पाहता गिरी ।
पूर्ववत् ठेविला सर्वां समक्ष स्थानि लीलया ॥ २८ ॥
( इंद्रवज्रा )
ते गोप प्रेमें हृदयीं भरोनी
धावोनी आले हरिच्या पदासी ।
धरी उराशी कुणि चुंबि कृष्णा
आक्षौन केले मग गोपिकांनी ॥ २९ ॥
( अनुष्टुप् )
यशोदा रोहिणी नंद बळाच्या बळिरामने ।
कृष्णाला हृदयी घेता आशिर्वाद दिले बहू ॥ ३० ॥
आकाशी स्थित ते देव गंधर्व सिद्ध चारण ।
कृष्णाची कीर्ति गावोनी फुलेही वर्षिले तदा ॥ ३१ ॥
स्वर्गात देवतांनी त्या वाद्य ते वाजवीयले ।
गंधर्व तुंबरे गोड हरिच्या गायिल्या लिला ॥ ३२ ॥
( इंद्रवज्रा )
व्रजी निघाले मग कृष्णदेव
बाजूस होते बलराम गोप ।
त्या प्रेमिकांनी हरिगीत केले
व्रजात आले बहु मोदि सारे ॥ ३३ ॥