समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २४ वा

इंद्रयज्ञनिवारण -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
क्रीडती भगवान् कृष्ण बलरामा सवे व्रजीं ।
तयांनी पाहिले गोप इंद्रयज्ञासि लागले ॥ १ ॥
सर्वज्ञ हरि श्रीकृष्ण न लपे कांहि त्या कडे ।
तरीही नम्र होवोनी पुसतो नंदजीस की ॥ २ ॥
पिताजी कोणता मोठा पातला उत्सवो असा ।
उद्देश फळ ते काय साधने सांगणे मला ॥ ३ ॥
ऐकण्या इच्छितो मी ते संतांना भेद तो नसे ।
न मित्र शत्रु तो त्यांना न ते कांहीच झाकिती ॥ ४ ॥
नसता स्थिति ती ऐशी रहस्य नच सांगणे ।
मित्र ते आपणा ऐसे वदावे सर्व ते तयां ॥ ५ ॥
लोक ते अंधश्रद्धेने करिती कैक कर्म ते ।
श्रद्धेने फळ ते लाभे आंधश्रद्धेत ना तसे ॥ ६ ॥
तुम्ही जे योजिले कार्य शास्त्रसंमत वा रूढी ।
जाणणे इच्छितो मी ते कृपया सांगणे मला ॥ ७ ॥
नंदबाबा म्हणाले -
मेघांचा स्वामि तो इंद्र समस्त प्राणियास तो ।
पाऊस पाडुनी जीवदान तो देइ तृप्तिही ॥ ८ ॥
प्रीयपुत्रा अम्ही सारे यज्ञाने इंद्र पूजितो ।
अर्पितो आम्हि ज्या वस्तू जले उत्पन्न होत त्या ॥ ९ ॥
यज्ञाच्या शेष ज्या वस्तू निर्वाहा आम्हि सेवितो ।
शेतीत पिकते जेजे ते ते इंद्रकृपेचि हो ॥ १० ॥
कुलाचार असा आला जो कामी लोभि वा भयी ।
द्वेषाने सोडिती धर्म त्यांचे मंगल ना कधी ॥ ११ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
ब्रह्मा शंकर आदींचा शास्ता केशव बोलला ।
इंद्राला क्रोध आणाया नंदबाबास तो असे ॥ १२ ॥
श्रीभगवान् म्हणाले -
पिताजी आपुल्या कर्मे जीव जन्मे नि तो मरे ।
कर्मानुसार त्यां लाभे सुख दुःख भयो तसे ॥ १३ ॥
फळ ते लाभते कर्मी जरी सर्वस्व ना तसे ।
न कर्म करिता त्याचे अकर्त्याला न त्रासिते ॥ १४ ॥
कर्मानुसार ते भोग तेंव्हा इंद्र कशास तो ।
कर्म ते पूर्व संस्कारी कर्म ना आपुल्या करीं ॥ १५ ॥
स्वभावाधीन तो जीव ब्वागतो त्याच आधिने ।
देवता नर नी दैत्य स्वभावाधीन जीव ते ॥ १६ ॥
कर्माने लाभतो देह कर्मानुसार त्यागिणे ।
कर्मानुसार् असे मित्र शत्रू नी ते त्रयस्थ ही ।
मानवा गुरु ते कर्म मानवा ईश कर्म ते ॥ १७ ॥
म्हणॊनि आश्रमाचे ते करावे इष्ट पालन ।
सुगम जीविका ज्याने इष्टदेव तयास तो ॥ १८ ॥
पती जी त्यागिते ऐसी न शांत व्यभिचारिणी ।
त्यागिता इष्ट देवाला न सौख्य अन्य पूजिता ॥ १९ ॥
द्विजाने वेद पाळावा क्षत्रिये पृथ्वि रक्षिणे ।
वार्तावृत्तीत गोरक्षा वैश्याने सेवेने शूद्रजीविका ॥ २० ॥
वार्तावृत्तीत गोरक्षा कृषी वाणिज्य व्याजि हे ।
गोरक्षा एकची आम्ही धारिली वृत्ति ती पहा ॥ २१ ॥
स्थिती उत्पत्ति अंताचे सत्त्वादी गुण कारणी ।
रजात जन्मती जीव संयोगे नर नारिच्या ॥ २२ ॥
रजाने वर्षती मेघ त्या अन्ने जगती जिव ।
देणे घेणे न इंद्राचे करेल काय ते बघू ॥ २३ ॥
न राज्य आपणा मोठे स्वामित्व नगरीं नसे ।
न गाव घर ही तैसे पहाड घर आपुले ॥ २४ ॥
म्हणॊनि द्विज गाई नी गिरिराजास पूजिणे ।
सामग्री इंद्र यज्ञाची या यज्ञी खर्चु या पहा ॥ २५ ॥
पुर्‍या खीर शिरा मूगडाळ ती शिजवोनिया ।
पक्वान्न करणे ऐसे व्रजीचे सर्व दूध ते ॥ २६ ॥
वेदवादी द्विजांहस्ते करूया हवनो असे ।
तयांना अन्न नी गाई दक्षिणा बहु अर्पिणे ॥ २७ ॥
चांडाळ पतितो आणि गाई कुत्र्यास अन्न ते ।
देवोनी गिरिराजाला भोग ते चढवू पहा ॥ २८ ॥
प्रसाद का‍उया खूप सजू लेवोनि वस्त्र नी ।
अलंकार, गिरी अग्नी गाई विप्रा परिक्रमू ॥ २९ ॥
पिताजी संमती माझी तुचले तर हे करा ।
यज्ञ हा गायि विप्रांना मला नी गिरिला प्रिय ॥ ३० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
कालात्मा भगवान् इच्छी इंद्राचा गर्व छेदण्या ।
नंदबाबादि गोपांनी आनंदे मानिले तसे ॥ ३१ ॥
कृष्णाने कथिले तैसा जाहला यज्ञ तो सुरू ।
स्वस्तिवाचन ही झाले ब्राह्मणा दक्षिणा दिल्या ॥ ३२ ॥
पर्वता अर्पिल्या वस्तू गाईंना हरळी तशी ।
पुढे गाई करोनीया झाली गिरिपरिक्रमा ॥ ३३ ॥
आशिर्वाद द्विजांचा तो घेता शृगारल्या स्त्रिया ।
बैलगाडीत बैसोनी कृष्णलीलाच गान ते ।
करीत निघले सारे करण्याती प्रदक्षिणा ॥ ३४ ॥
द्यावया धीर गोपांना कृष्णाने दुसर्‍या रुपे ।
प्रचंड देह धारोनी बैसला गिरिच्या वरी ।
गिरिराज असे मी हो वदता अन्न भक्षिले ॥ ३५ ॥
त्या रूपा स्वयही कृष्णे नमिले व्रजियां सवे ।
वदला गिरिराजा हा कृपें प्रगट जाहला ॥ ३६ ॥
धारितो रूप हा तैसे द्वेषिता मारितो जिवां ।
या या कल्याण साधाया गिरिराजा नमा पहा ॥ ३७ ॥
कृष्णाच्या प्रेरणें ऐसे वृद्ध नंदादि गोपने ।
पूजिले गिरिराजाला गाई विप्रां विधी जसा ।
व्रजात पातले सर्व कृष्णाच्यासह गोप ते ॥ ३८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चोविसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP