समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २३ वा

यज्ञपत्‍न्यांवर कृपा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
बालगोपाल म्हणाले -
कृष्णा रे बलरामा रे नित्य दुष्टांसि मारिता ।
भूक दुष्ट सतावे ही शमवा ती तुम्ही द्वय ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
प्रार्थना ऐकता कृष्ण मथुरावासि भक्त ज्या ।
द्विजपत्‍न्यास तो बोध करण्या वदला असे ॥ २ ॥
मित्रांनो ब्रह्मवादी ते स्वर्गाचा हेतु घेउनी ।
येथुनी जवळी यज्ञ अंगिरस् करिती पहा ।
जावे त्या यज्ञशाळेत तुम्ही सर्वचि येथुनी ॥ ३ ॥
माझे नी बलरामाचे सांगोनी नाम त्या स्थळी ।
भोजना कांहिसा भात आणावा मागुनी इथे ॥ ४ ॥
हरी आज्ञापिता गोप यज्ञशाळेत पोचले ।
दंडवत् नमुनी विप्रां तयां अन्नहि याचिले ॥ ५ ॥
भूदेवा भद्र हो सारे व्रजीचे गोप हो अम्ही ।
कृष्ण नी बलरामाच्या आज्ञेने पातलो इथे ॥ ६ ॥
( इंद्रवज्रा )
कृष्णो नि रामो चरवीत गाई
     समीप तेथे बसले पहा की ।
क्षुधा तयांना गमली कदाची
     द्या अन्न श्रद्धा असल्यास आम्हा ॥ ७ ॥
( अनुष्टुप् )
दीक्षीत पशुमांसाते सौत्रामणि न भक्षिती ।
दीक्षीत अन्य यज्ञीचे अन्न ते भक्षिती पहा ॥ ८ ॥
न विप्र लक्षिले यांना तुच्छ स्वर्गास इच्छिती ।
ज्ञानाने द्विज ते सान मानिती परि वृद्ध ते ॥ ९ ॥
देह कालीय सामग्री तप नी यज्ञ साधनी ।
ऋत्वीत अग्नीरूपात एकची भगवान् असे ॥ १० ॥
बाळगोपाळद्वारे तो खावया भात मागता ।
मूर्खांनी पाहता देह तयां सन्मानिले नसे ॥ ११ ॥
हो ना कांही नसे शब्द रुष्टले सर्व बाळ ते ।
पातले परतोनीया कृष्णासी बोलले तसे ॥ १२ ॥
ऐकता हासला कृष्ण वदला जगदीश्वर ।
प्रयत्‍ने फळ ते लाभे निराश नच व्हा कधी ॥ १३ ॥
या वेळी द्विजपत्‍न्यांना जावोनी बोलणे तसे ।
पातले राम नी कृष्ण ऐकता खूप अन्न त्या ।
देतील करिती प्रीती द्विजपत्‍न्या अम्हावरी ॥ १४ ॥
पत्‍निशाळेत गेले ते सजोनी बसल्या द्विजा ।
प्रणामोनी तयां नम्र वदले गोपबाळ हे ॥ १५ ॥
विप्रपत्‍न्यां ! नमस्कार कृपया बोल ऐकणे ।
भगवान् कृष्ण ते आले तयांनी धाडिले अम्हा ॥ १६ ॥
बालगोपाळ रामोनी कृष्णही गायि चारिता ।
पातले दूर ते येथे भुकेले, अन्न द्या तयां ॥ १७ ॥
कृष्णाची मुरली त्यांनी पूर्वी ऐकोनि तृप्तल्या ।
उतावीळ अशा झाल्या कृष्णाच्या दर्शने तदा ॥ १८ ॥
भक्ष्य भोज्य तसे लेह्य चोष्य स्वादिष्ट अन्न ते ।
घेतले पात्रि नी सार्‍या निघाल्या पति रोधिता ॥ १९ ॥
नद्या त्या सागरी लागी मिळण्या धावती तशा ।
हरिचा ऐकुनी वेणू हृदयो दान त्या दिले ॥ २० ॥
जाताचि पाहती विप्रा कृष्ण तो गोप नी बळी ।
ययात मिसळोनीया अशोकवनि हिंडता ॥ २१ ॥
( वसंततिलका )
त्या सावळ्या तनुशि पीत सुशोभि वस्त्र
     डोईस मोर पिस नी वनमाळ कंठी ।
रंगेत चित्र तनुशी शिरिं पत्र गुच्छ
     वाटे नटोचि सजला हरि तै दिसे हा ।
स्कंधी सख्याशी कर एकचि टेकिला नी ।
     दूज्या करासि कमळा फिरवीत होता ।
कानास कुंडलहि ते कमळा परी जे
     हास्ये मुखास करितो कमळापरी तो ॥ २२ ॥
त्या ऐकुनी गुण हरीप्रिय उत्तमाचे
     होत्या नि आज बघता रमल्याच रंगी ।
आलिंगिती मनिच नी बहु शांत होती
     झोपेत दुःख विसरे अभिमानि जैसा ॥ २३ ॥
( अनुष्टुप् )
हरिने जाणले चित्ती आप्त सर्व त्यजोनिया ।
दर्शना पातल्या विप्रा मुखी आनंद सांडतो ॥ २४ ॥
सुस्वागतम् असो देवी बसा सेवा कशी करू ।
दर्शना इच्छिता तुम्ही योग्य ते हृदयप्रियां ॥ २५ ॥
न संदेह जगी संत प्रियाते प्रेम अर्पिती ।
न लाज द्वैत नी हेतू तयात नसतो मुळी ॥ २६ ॥
प्राण देह मनो बुद्धी स्त्री पुत्र स्वजनो धन ।
न लागती तयां प्रीय मी आत्मा प्रीय श्रेष्ठची ॥ २७ ॥
योग्य ते तुमचे येणे प्रेमाला अभिनंदितो ।
दर्शना जाहले जावे करावा यज्ञ पूर्ण तो ॥ २८ ॥
( वसंततिलका )
द्विजपत्‍न्या म्हणाल्या -
कृष्णा अतीव निष्टुर बोल सारे
     जो पावतो हरिसि तो भवि ना पुन्हा ये ।
ती वेदवाणि तुझिची करि सत्य आज
     केसासही तुलसि माळ तुझीच ल्यालो ॥ २९ ॥
स्वीकार नाच करिती पति पुत्र आता
     तो अन्य काय म्हणती अपुल्या अम्हाला ।
आम्हा न आज उरला मुळि आश्रयो तो
     तेंव्हा दुज्या शरणि ना हरि धाडणे रे ॥ ३० ॥
( अनुष्टुप् )
श्रीभगवान् म्हणाले -
देविंनो पति नी पुत्र पिता माता कुणीहि ते ।
न त्याग करिती तुम्हा जगी सन्मान होय तो ।
केले मुक्त तुम्हा मी तो आकाशी देव डौलती ॥ ३१ ॥
अंग संग तसा माझा न ती प्रीती जगी मला ।
मला ते अर्पिणे चित्त तेणे मी पावतो तुम्हा ॥ ३२ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
ऐकता द्विजपत्‍न्या त्या यज्ञशाळेसि पातल्या ।
द्विजांनी द्वेषिले नाही मिळोनी यज्ञ साधिला ॥ ३३ ॥
जयांनी रोधिले विप्रे हरीशी चित्त लाविता ।
कर्माचा त्यागिला देह मिळाल्या शुद्ध सत्वि त्या ॥ ३४ ॥
इकडे हरिने अन्न स्वादिष्ट सेविले असे ।
चतुर्विध असे सारे स्त्रियांनी आणिले तसे ॥ ३५ ॥
या परी भगवान् कृष्ण कर्मे रूपे नि वाणिने ।
गाई गोपाळ गोपिंना मोदिता मोदला स्वयें ॥ ३६ ॥
अनुताप द्विजां झाला कळता कृष्ण हा हरी ।
राम कृष्ण मनुष्याच्या रूपाने करिती लिला ॥ ३७ ॥
पत्‍न्यांच्या हृदयी कृष्ण स्वतास रिक्त पाहता ।
स्वताला निंदिती तेंव्हा पश्चातापेचि ते द्विज ॥ ३८ ॥
वदले हाय हो आम्ही कृष्णा विन्मूख राहिलो ।
कुल मंत्र तशी विद्या तप नी व्रत सर्व धिक् ।
धिक्कार बहु ज्ञानाचा गेले व्यर्थचि कर्म ते ॥ ३९ ॥
मायेत योगिही गुंते ब्राह्मणो गुरु माणसा ।
तरी तो परमार्थाला स्वार्थालाही मुके पहा ॥ ४० ॥
आश्चर्य केवढे आहे स्त्रिया या असुनी पहा ।
कृष्णाचे साधिले प्रेम भवाचे फास तोडिल्या ॥ ४१ ॥
व्रतबंध नसे त्यांचा राहिल्या ना गुरूकुली ।
न तपो ज्ञान आत्म्याचे कुकर्म न पवित्रता ॥ ४२ ॥
तरी योगेश्वरा पायी पयांचे दृढ प्रेम ते ।
करोनी सर्व संस्कार पदाचा लाभ ना अम्हा ॥ ४३ ॥
माजलो काम-धंद्याने हिताला मुकलो अम्ही ।
हरिने बाळगोपाळांद्वारे स्मरण ते दिले ॥ ४४ ॥
पूर्णकाम असा कृष्ण मोक्षही देउ तो शके ।
अन्याचे न्यून त्या काय कृपाकाजार्थ मागतो ॥ ४५ ॥
चांचल्य त्यजिता लक्ष्मी पदी सेवेत नित्य ज्या ।
मागतो खावया अन्न त्या विना हे घडे कसे ॥ ४६ ॥
देशकाल नि सामग्री कर्म तंत्र नि ते तप ।
ऋत्वीज देवता यज्ञ सर्व ती भगवान् रुपे ॥ ४७ ॥
योगेश्वर स्वयं विष्णु यदुवंशात जन्मला ।
आम्ही ते ऐकुनी होतो आम्ही मूढे न जाणिले ॥ ४८ ॥
तरी धन्य असू आम्ही पत्‍न्या आमुचिया अशा ।
कृष्णाशी आमुची बुद्धी त्यांच्या प्रेमेचि लागली ॥ ४९ ॥
अनंतैश्वर्य स्वामी तू तुझ्या मायेत मोहिलो ।
गुंतलो कर्म गुंत्यात तुजला प्रणिपात हा ॥ ५० ॥
पुरुषोत्तम तो कृष्णो क्षमा तोचि अम्हा करो ।
मायेने मोहिता बुद्धी प्रभाव नच जाणिला ॥ ५१ ॥
ब्राह्मणे द्वेषिला कृष्ण पश्चाताप तयां अता ।
इच्छिती दर्शना त्याच्या न गेले कंसभीतिने ॥ ५२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेविसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP