समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २२ वा

चीरहरण -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
हेमंती प्रथमो मासी नंदव्रजकुमारिका ।
हविष्यांन्नचि खावोनी कात्यायनिस पूजिती ॥ १ ॥
यमुनीं करिती स्नान पहाटे वाळुमूर्ति त्या ।
करोनी पूजिती गंधे धूप दीपादि पल्लवे ॥ २ ॥
तांदूळ फळ पुष्पांनी हार इत्यादि वस्तुने ।
यथासांग तिची ऐसी करिती अर्चना पुजा ॥ ३ ॥
कात्यायनी महामाये महायोगिनि ईश्वरी ।
नंदगोपसुतो द्यावा पती तो देवि गे मला ।
मंत्र हा जापिता सार्‍या वंदिती देविला पहा ॥ ४ ॥
ओवाळिता जये जीव तयांनी एक हा पती ।
पूजिली देवि इच्छोनी श्यामसुंदर हा पती ॥ ५ ॥
प्रतिदिनी अशा सर्व हातात हात घालुनी ।
मोठ्याने कृष्ण गावोनी येत स्नाना यमूनिशी ॥ ६ ॥
एकदा वस्त्र सोडोनी रोजच्या परि सर्व त्या ।
कृष्णाचे गीत गावोनी यमुनीं क्रीडु लागल्या ॥ ७ ॥
सनकादिक योग्यांचा कृष्ण योगेश्वरेश्वरो ।
सगोपाळबाळ तो गेला त्या वेळी यमुना तटी ॥ ८ ॥
कृष्णाने गोपिकांचे ते वस्त्र सारेचि घेउनी ।
कदंबवृक्षि बैसोनी हासता बोलु लागला ॥ ९ ॥
वदला गे कुमारिंनो येवोनी वस्त्र घेइजे ।
खरेच वदतो मी तो चेष्टा ना व्रत कायसे ॥ १० ॥
न कदा बोलतो खोटे हे माझे मित्र जाणती ।
एकेक वा समुहाने यावे चालेल ते मला ॥ ११ ॥
हृदये चिंबली प्रेमे रेशमी हास्य पाहता ।
संकोचे हासल्या आणि पाहती एकमेकिते ॥ १२ ॥
हासुनी बोलता कृष्णे विनोदे चित्त वेधिले ।
कुमारिका जलामध्ये आकंठ थर्रर् कांपती ॥ १३ ॥
वदल्या कृष्ण कान्हा रे नंदलाला न हे करी ।
प्रिया रे सर्व ते गोप तुजलागी प्रशंसिती ।
थंडीत काकडो आम्ही आमुचे वस्त्र दे हरि ॥ १४ ॥
जे कांही वदसी तूं ते करण्या मानितो अम्ही ।
दासी आम्ही तुझ्या सार्‍या धर्मज्ञ श्यामसुंदरा ।
न त्रासी वस्त्र दे अम्हा न तो नंदास सांगु हे ॥ १५ ॥
श्रीभगवान म्हणाले -
पवित्र हास्य प्रेमाचे मुलिंनो तुमचे असे ।
दासिंनी पाळणे आज्ञा न्यावे वस्त्र इथोनिया ॥ १६ ॥
परीक्षित् मुलि त्या सार्‍या थंडीने कांपती पहा ।
दो हाते गुप्त अंगाला झाकता त्या जळातुनी ।
बाहेर पातल्या तेंव्हा थंडीने त्रासल्या वहू ॥ १७ ॥
भाव तो शुद्ध पाहोनी प्रसन्न जाहला हरि ।
गोपिंचे वस्त्र तें खांदी ठेवोनी कृष्ण बोलला ॥ १८ ॥
( इंद्रवज्रा )
विवस्त्र होता तुम्हि स्नान केले
     कालिंदि तैसे वरुणास तुम्ही ।
न मानिले हा अपराध झाला
     जोडा तयांना कर, वस्त्र देतो ॥ १९ ॥
खरेचि वाटे मनि त्या मुलिंच्या
     विवस्त्र न्हाता व्रतभंग झाला ।
कृष्णासि त्यानी नमिले करांनी
     त्रुटी व्रताच्या हरि हा निवारी ॥ २० ॥
( अनुष्टुप् )
नमिती हात जोडोनी आज्ञेनुसार सर्व त्या ।
हृदयी करुणा दाटे कृष्णे वस्त्रे दिली तयां ॥ २१ ॥
( इंद्रवज्रा )
छेडून त्यांना बहू कृष्ण बोले
     संकोच सोडोनिहि नाचविल्या ।
वस्त्रे तयांची हरिली तयाने
     तयात त्यांना बहु मोद झाला ॥ २२ ॥
( अनुष्टुप् )
सार्‍यांनी नेसली वस्त्रे परी त्या वशल्या अशा ।
लाजोनी पाहती कृष्णा सजल्या त्या समागमा ॥ २३ ॥
कळले हरिला चित्ती इच्छिती पदस्पर्श या ।
उखळा बद्ध जो होता तो हरी वदला तयां ॥ २४ ॥
प्रेयसिंनो ! पुजा झाली इच्छिता तेहि जाणि मी ।
संकल्प करितो पूर्ण पूजा ती शकता करू ॥ २५ ॥
मला जे अर्पिती चित्त तयांची वासना जळे ।
भाजिल्या त्या बिजां ना जैं अंकूर फुटती कधी ॥ २६ ॥
जावे आता घरा तुम्ही साधना पूर्ण जाहली ।
येणार्‍या शरदामध्ये रात्री माझ्या सवे पहा ।
क्रीडताल सतींनो गे व्रतसाफल्य जाहले ॥ २७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् भगवंताची आज्ञा ही मिळता सती ।
पादपद्म हरीचे ते स्मरता व्रजि पातल्या ॥ २८ ॥
एकदा भगवान् कृष्ण बळीराम नि बाळ ते ।
दूर वृंदावनी गेले चाराया गाइ आपुल्या ॥ २९ ॥
ग्रिष्माचा तापला सूर्य परी दाटचि मेघ ते ।
श्रीकृष्णावरि ते नित्य छत्र होवोनि राहती ॥ ३० ॥
श्रीदामा स्तोककृष्णो नी अंशू सुबल अर्जुन ।
विशाल वृषभो तैसे तेजस्वी देवप्रस्थ नी ।
वरुथपादि ते सर्व वृक्षाच्या तळि बाहता ।
एकत्र करुनी त्यांना श्रीकृष्ण वदला हरी ॥ ३१ ॥
मित्रांनो भाग्यवान् वृक्ष दुजांचे हित चिंतिती ।
साहिती ऊन्ह वारा नी आपणा रक्षिती पहा ॥ ३२ ॥
वाटते श्रेष्ठ हे जीणे सर्वां आश्रय लाभतो ।
सज्जनाघरुनी भिक्षू रिकामा नच जाय जैं ॥ ३३ ॥
फुले पत्र तसे छाया मूळ साल नि लाकडे ।
गंध डिंक तशी राख कोळसा सर्व देति ते ॥ ३४ ॥
कितेक जगि या प्राणि परी साफल्य जीवनी ।
आपुल्या धन वाणीने कर्माने सुखवी जना ॥ ३५ ॥
कोंब गुच्छ फुले पाने डौरुनी लवती सदा ।
बोलता कृष्ण हे आले सर्वे ते यमुना पुढे ॥ ३६ ॥
राजा ! ते यमुनापाणी मधूर शीत स्वच्छ ही ।
गाईंना पाजता सारे पिले सर्वचि ते जल ॥ ३७ ॥
यमुना तटि ते सर्व हरीत तृण गायिना ।
चारता बाळ गोपाळ वदले भूक लागली ॥ ३८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बाविसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP