समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २१ वा

वेणुगीत -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
शोभले वन ते ऐसे जलीं पद्म सुगंधित ।
बाळगोपाळ नी कृष्ण गाई तेथ प्रवेशल्या ॥ १ ॥
( पुष्पिताग्रा )
कुसुमित वनराजि पक्षि गाती
     गिरितळि नि सरितात गुंजले हो ।
मधुपति हरिराम बाळगोपीं
     घुसुनि करी मग नाद वंशिचा तो ॥ २ ॥
( अनुष्टुप् )
वंशीचा ध्वनि कृष्णाच्या भगवत्‌प्रेम जागवी ।
वंशीची थोरवी बाला एकांती सखिला वदे ॥ ३ ॥
वंशीचे नादमाधूर्य वर्णिता कृष्ण ये मनीं ।
निसटे मनिचा ताबा आता ती वदुना शके ॥ ४ ॥
( मंदाक्रांता )
ती विचार करते
गेला कान्हा बळिसह वनीं घेउनी गायि गोपा ।
डोई खोवी मयुरपिस नी कर्णि पुष्पे सुवर्ण ॥
नेसे पीतांबर गळि असे वैजयंतिय माला ।
बासूरीला अधरि धरुनी पाजितो की सुधा ती ॥
पाठी मागे चलत हरिच्या गोप ते कीर्ती गाती ।
वैकुंठीच्याहुनिहि व्रजि ही वाढली दिव्य शोभा ॥ ५ ॥
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! जड जीवांचे चित्त तो नाद वंशिचा ।
चोरितो ऐकती गोपी कृष्णा आलिंगिती मनीं ॥ ६ ॥
( वसंततिलका )
गोपि परस्परात बोलतात -
ओ हो सखे नयनि मी हरि पालवीला
     सांगू कशी तुजसि ती मनि मौज आली ।
हा कोण लाभ मजला वनि कृष्ण जाता
     येताचि मी बघतसे मुखपान घेते ॥ ७ ॥
धारी शिरी नवति आम्र कुमूदमाला
     कृष्णास पीतवसने बळिला निळे ते ।
गोठ्यात वंशिरव तो करितो मधेच
     वाटे नटो हरि तसा वदु मी कसा तो ॥ ८ ॥
वेणू पुरूष असुनी रसपीयि सारा
     ठेवील का मजसि अमृत थोडके ते ।
वेणू रसास पसरी फुलतीहि पद्‍मे
     आनंद अश्रु पडती तरुच्याहि नेत्री ॥ ९ ॥
हा कीर्ति ती पसरवी भुवनात सार्‍या
     याच्या पदात असती कमळीय चिन्हे ।
हा वाजवी मुरलि तै भुलती तपी ही
     नाचोनि मोर उठती खग शांत होती ॥ १० ॥
हा धारितो रमणि गे बहु वेष तैसा
     नी वंशीनाद करिता मृगी धाव घेती ।
नी पाहती हरिपदा मग धन्य होती
     नाही पहात कधि तो मज दृष्टि ऐसे ॥ ११ ॥
सौंदर्यखान हरिला बघताच देवी
     मूच्छित त्या पडति गे रव ऐकुनीया ।
पाहा फुलेहि गळती मग देवियांचे
     साड्या गळोनि पडती धरणीस त्यांच्या ॥ १२ ॥
गाई पहा सख‍इ त्या टवकारुनीया
     त्या प्राशिती रस पहा हरिवेणुनाद ।
त्या पाहती नि धरिती हृदयी हरीसी
     ती वासुरे दुध पिता गळते मुखीचे ॥ १३ ॥
पाही खगास नच ते खग ते ऋषी हो
     झाकोनि नेत्र बसती मग वृक्षि शांत ।
मोहीत गान हरिची बहु वंशि गाते
     प्रीये सखे खराच की बघ जीव धन्य ॥ १४ ॥
हे जीव सोड सगळे जड ती सरीता
     नाही तिच्यात भवरा बघ शांत कैशी ।
थांबोन राहि जळ ते बघण्यास कृष्णा
     हाती कुमूद धरुनी हरि पूजिते ती ॥ १५ ॥
प्रीये पहा नभि कसे स्थिरतात मेघ
     कृष्णो नि बाळ वनि चारिति धेनु तेंव्हा ।
छाया धरीति वरूनी अन सिंचितीही
     ओवाळिती जिव तसे ढग त्या हरीला ॥ १६ ॥
वृंदावनात भिलिनी मनि धन्य होती
     त्यांना तयात कसले मनि प्रेम दाटे ।
त्या पाहती जधि तया मनि होय इच्छा
     तो प्रेमरोग जडला जणु त्यांजला की ।
वक्षा करीति उटि गोपिहि केशराची
     ती लाविती हरिपदा मग ती तृणाला ।
ती लागता भिलिणि त्या मुख नी स्तनाला
     लावोनि शांत करिती अपुल्या मनाला ॥ १७ ॥
प्रीये पहा गिरिवरा बहु धन्य कैसा
     गोवर्धनोहि हरिचा बहु भक्त श्रेष्ठ ।
तो हर्षतो नित पदे पडताच तेथे
     स्नानास देइ अपुले जल श्रीहरीस ।
हर्षीत हो‍उनि पहा तृण दे चराया
     विश्राम कंद मुळ अर्पुनि धन्य होतो ॥ १८ ॥
हा सावळा हरि तसा बळि गौर‍अंग
     यांची गतीच सगळी अति वेगळी की ।
दावे धरोनि करि श्रीहरि हाकरीता
     गातात बाळ तदि वंशिहि वाजवीता ।
ती माणसे स्थिरति ती पशुपक्षि सारे
     रोमांचितेचि तनुशी अशि वंशि त्याची ।
वृक्षींहि रोम उठती बघ की सखे गे
     जादूच ती ममचि गे गमते मनासी ॥ १९ ॥
( अनुष्टुप् )
खेळ वृंदावनी ऐसे कृष्णाच्या कैक त्या लिला ।
वर्णिता तन्मयी होता गोपिका आपसी अशा ।
वर्णिता भगवत्‌कीर्ती हृदया स्फूर्ति ये तयां ॥ २० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकविसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP