समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २० वा

वर्षा आणि शरद ऋतूचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
बाळगोपाळ गेहासी जाता माता भगीनिसी ।
दावानल प्रलंबादी अद्‌भूत कर्म बोलले ॥ १ ॥
मोठ मोठेहि गोपाळ लीला या रामकृष्णच्या ।
स्तिमीत ऐकता झाले मानिता देव ते द्वय ॥ २ ॥
पुन्हा वर्षा ऋतू येता या काळी जीव वाढती ।
चंद्र सूर्या खळे लागे क्षुब्धती वायु मेघ ते ॥ ३ ॥
आकाशी दाटती मेघ चाले विद्यूत तांडवा ।
गड्गडाट सदा होतो झाकती चंद्र सूर्य ते ।
ब्रह्मस्वरूप आत्म्याला झाकी माया गुणे जशी ॥ ४ ॥
पृथिवीरूप लोकांना सूर्य राजापरी पहा ।
शोषितो आठ ते मास वाटी पाणी आता पुन्हा ॥ ५ ॥
जनांचे दुःख पाहोनी दयाळू त्रासता तयां ।
अर्पिती सर्वच्या सर्व तसे ते जल वर्षिती ॥ ६ ॥
ग्रीष्मामध्ये सुके भूमी आता ती हिरवी दिसे ।
तप ते संपता सर्व पुष्टतो देह तो जसा ॥ ७ ॥
घन नी घन‍अंधारी काजवे ते प्रकाशती ।
जसे ते माजता पाप पाखंडी मत तेज हो ॥ ८ ॥
बेडूक करिती ड्राँव घनांचा ऐकता ध्वनी ।
निवृत्तहि जसे शिष्य गुर्वाज्ञे वेद वाचिती ॥ ९ ॥
ग्रिष्मीं जे आटले नाले वाहती ते भरोनिया ।
पाप्यांचे धन ते जैसे कुमार्गी वाहते तसे ॥ १० ॥
दाटते हरळी कोठे कुत्र्यांचे छत्र ते कुठे ।
रोहिणी कीट ते लाल जशी सेनाच चालती ॥ ११ ॥
शेतात डोलते धान किसाना हर्ष जाहला ।
सावकार जसा चित्ती वेठीस धरणे स्मरे ॥ १२ ॥
नवे ते जल प्राशोनी प्राण्यां सौंदर्य वाढले ।
आत बाहेर कृष्णाचे जसे रूप प्रकाशते ॥ १३ ॥
वार्‍याने उदधी माजे नद्यांचा ओघ त्यात हा ।
विषयी याजला भोग लाभता माजतो जसा ॥ १४ ॥
पर्जन्य वर्षता भारी पर्वतां नच त्रास तो ।
जैं चित्त हरिच्या पायी लाविता दुःख ना मिळे ॥ १५ ॥
पायवाटा तृणे सार्‍या झाकती नच चालता ।
द्विजाती वेद अभ्यास विसरे वाचता न जैं ॥ १६ ॥
परोपकारि ते मेघ विजा त्या स्थीर ना तिथे ।
प्रेमिका कामिनी जैशी गुणवंती न स्थीरते ॥ १७ ॥
आकाश दाटते मेघे दिसे इंद्र धनू तयी ।
रज सत्वादी क्षोभाने निर्गूण ब्रह्म जैं खुले ॥ १८ ॥
चांदण्यात दिसे मेघ मेघ तो चंद्र झाकितो ।
अहंकार जसा झाकी पुरुषीगुण सर्व ते ॥ १९ ॥
रोम रोमी फुले मोर आकाशी ढग पाहता ।
नाचतो उत्सवी मानी नामे त्रीतापि मोदि जैं ॥ २० ॥
ग्रिष्मात सुकले वृक्ष डोलती जल पीउनी ।
तप ते सरता जैसे पुष्टतो तपि तो जसा ॥ २१ ॥
तळ्यात तट ते कांटे चिखले भरले तरी ।
न सारस त्यजी त्याला अशांत जल ते जरी ।
जसे संसारि गुंतोनी घरात राहती सदा ॥ २२ ॥
वर्षा ऋतूत तो चंद्र अफाट वर्षितो जल ।
फुटती बांध शेतीचे नद्यांचेही तसेच ते ।
पाखंडी वेदमार्गा जै कलीमध्ये उलंघिती ॥ २३ ॥
प्रेरिता वायुने मेघ जल‍अमृत वर्षिती ।
प्रेरिता ब्राह्मणे जैसे धनीक दान अर्पिती ॥ २४ ॥
खजूर जांभळे तेंव्हा त्या वृंदावनि शोभती ।
क्रीडण्या राम श्यामो तैं सगोपाल प्रवेशले ॥ २५ ॥
स्तनभारे तदा गाई मंद चालेचि चालती ।
हाकारी जधि श्रीकृष्ण धावती दूध तैं गळे ॥ २६ ॥
वनात पाहिले कृष्णे आनंदी भिल्ल भिल्लिनी ।
मध तो वृक्ष राईंचा डोंगरी जळ ते झरे ।
सुरेल ध्वनि तो येई निवारा त्यां गुहेतही ॥ २७ ॥
वर्षा ती पडता कृष्ण लपे कोपात वृक्षिच्या ।
कधी गुंफेत गोपाळांसवे कंदहि भक्षि तो ॥ २८ ॥
खडकाशी नदीकाठी सर्व गोप तसे बळी ।
दहीभात तशा शाका घरची डाळ जेवि तो ॥ २९ ॥
वर्षा ऋतूत ते बैल दुभत्या गायि वासरे ।
उशीर चरती तैसे रवंथ करिती पुन्हा ॥ ३० ॥
वर्षा ऋतू असे सर्वां तोषवी मनि तो बहू ।
हरीची असुनी लीला हरीच वाहवा करी ॥ ३१ ॥
या परी राम नी श्याम आनंदे व्रजि राहती ।
संपला ऋतु हा तेंव्हा जल वायू हि शुद्ध हो ॥ ३२ ॥
जलीं शरद्‌ऋतु मध्ये कमळे फुलली तशी ।
योगभ्रष्ट पुरूषाचे योगे चित्त स्थिरे तसे ॥ ३३ ॥
शरदे सारिले मेघ कीट ही मिटले पहा ।
अशुभा नाशि जै विष्णु आश्रमा पाळितो तया ॥ ३४ ॥
सर्वस्व दान अर्पोनी कांतिमान् मेघ जाहले ।
संन्यासी शोभती जैसे कामना त्यागिलावरी ॥ ३५ ॥
पर्वती वाहती ओढे कल्याणप्रद त्या जळें ।
पात्रता जाणता ज्ञानी जसे ते ज्ञान दाविती ॥ ३६ ॥
लहान खाच खड्ड्यांचे आटले जल ते जसे ।
कुटुंबा पोषिता मूढ न स्मरे आयुही सरे ॥ ३७ ॥
थोड्याशा जळिचे जीव उन्हाने पीडले तदा ।
त्रासतो ऐतपोसा जैं कुटुंबा पोषितो पहा ॥ ३८ ॥
ओलावा सरता वाळे तृण ते हिरवे नुरे ।
अहंता त्यजिता जैसा विवेकी साधको तसे ॥ ३९ ॥
शरदीं सागरो स्थीर जाहले जल शांत ते ।
निःसंकल्प जसा जीव मिटवी कर्मकांड तैं ॥ ४० ॥
किसान बांध टाकोनी शेतीचे जळ रक्षिती ।
जैं योगी इंद्रिया रोधी रक्षिण्या ज्ञान आपुले ॥ ४१ ॥
उन्हाने तापती जीव चंद्र तो शांत ही करी ।
जसे देहाभिमान्याचे मिटवी दुःख कृष्ण तो ॥ ४२ ॥
वेदाचा जाणता अर्थ शोभे सत्ययुगी जसा ।
तशा आकाशज्योती तै तेजस्वी स्वच्छ त्या नभीं ॥ ४३ ॥
यदुवंशी जसा कृष्ण वाढला पृथिवीवरी ।
तसा आकाशि तो चंद्र पूर्ण आकार घेतसे ॥ ४४ ॥
फळांनी भरले वृक्ष लतांचा गंध दर्वळे ।
न होय थंड नी उष्ण लोकांची आग ती मिटे ॥ ४५ ॥
गाई नी हरिणी स्त्रीया चिमण्या इच्छिती नरा ।
समर्था फळ जै लाभे क्रियेच्या अनुसारची ॥ ४६ ॥
चोरा शिवाय ते लोक राजा येताचि निर्भय ।
तसे कौमूद सोडोनी पद्म तो सूर्य पाहता ॥ ४७ ॥
नवान्न सेविण्या लोक इंद्रोत्सविहि पातले ।
शेतात पिकले धान्य कृष्ण राम सुशोभले ॥ ४८ ॥
साधना संपता सिद्ध दिव्यदेहास धारिती ।
नृपो तपी तसे छात्र कामाला लागले पुन्हा ॥ ४९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर विसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP