[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
एकदा खेळता बाळे गाई दूर तदा पहा ।
तृणाच्या बहु लोभाने घन आरण्यि पातल्या ॥ १ ॥
गाई शेळ्या तशा दूर अन्यची वनि पातता ।
उन्हीं व्याकुळल्या तृष्णे तागाच्या वनि पातल्या ॥ २ ॥
कृष्णाने बलरामाने पाहता पशु ना तिथे ।
शोधिता नच त्या त्यांना मुळीही दिसल्या कुठे ॥ ३ ॥
सर्वस्व गाइ त्या त्यांच्या खिन्न सर्वचि जाहले ।
गोक्षूरचिन्ह पाहोनी गेले शोधीत ते पुढे ॥ ४ ॥
शेवटी पाहिल्या गाई तागाच्या चुकल्या वनीं ।
तृष्णेने थकल्या सर्व व्याकूळ जाहल्या तशा ॥ ५ ॥
कृष्णे गंभीर शब्दाने तयांना हाक मारिता ।
ऐकता हर्षल्या गाई हुंकार दिधला तया ॥ ६ ॥
( इंद्रवज्रा )
श्रीकृष्ण ऐसा रव देइ तेंव्हा
पेटोनि दावानलकाळ आला ।
सवेचि वारे सुटले असे की
चराचराला तै अग्नि जाळी ॥ ७ ॥
गोपाळ गाई बघता मनात
अत्यंत झाले भयभीत सारे ।
मृत्यूभयाने डरकाळल्या त्या
श्रीकृष्ण रामासहि आर्त शब्दे ॥ ८ ॥
( अनुष्टुप् )
प्रीय कृष्णा महावीरा बलरामा पराक्रमा ।
शरणी पातलो आम्ही वाचवा आग जाळि ही ॥ ९ ॥
जयांचा सर्व तू कृष्णा तयांना नच कष्टवी ।
श्यामसुंदर धर्मज्ञ रक्षिसी तूचि केवळ ॥ १० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
आपुल्या मित्र गोपांचे ऐकता दीन शब्द हे ।
भगवान् वदला कृष्ण नेत्र झाका न भ्या कुणी ॥ ११ ॥
ऐकता वदले ठीक सर्वांनी नेत्र झाकिले ।
अग्नि सर्व पिला कृष्ण संकटा टाळिले असे ॥ १२ ॥
उघडिताचि ते नेत्र बाळगोपाळ सर्व ते ।
गाईंच्या सहची होते भांडीर वनि त्या पुन्हा ।
विस्मयो जाहला सर्वा संकटो टळले असे ॥ १३ ॥
योगमाया अशी कृष्णे दाविता बाळगोप ते ।
चुकले समजोनीया कृष्ण हा देवता असे ॥ १४ ॥
सायंकाळी बलो कृष्ण वंशिनादात त्या व्रजीं ।
पातता बाळगोपाळे दोघांची स्तुति गायिली ॥ १५ ॥
गोपिकांना विना कृष्ण क्षण तो युग ते शत ।
वाटतो, पातता कृष्ण दर्शनी मग्न जाहल्या ॥ १६ ॥