समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३२ वा

भगवान प्रगट होवून गोपिंचे सांत्वन करतात -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् ! भगवत्‌प्रेमी विरहीगीत बोलता ।
प्रियाच्या त्या वियोगाने मधूर रडू लागल्या ॥ १ ॥
त्याच वेळी मधे कृष्ण प्रगटे हासरा तसा ।
पीतांबर कटी शोभे कामदेवास चाळि जो ॥ २ ॥
कोटि कामाहुनी दिव्य श्यामसुंदर पाहता ।
उठल्या सर्व त्या गोपी नव चैतन्य पातले ॥ ३ ॥
एक प्रेमे धरी हात सौख्याने बोलु लागली ।
दुसरी चंदनी दंड खांद्याशी ठेविते तदा ॥ ४ ॥
तांबूल मुखिचा कोणी हातात घेतला तसा ।
तिसरी बसुनी कोणी स्तनाशी पाय आवळी ॥ ५ ॥
पाचवी प्रणये कोपी विव्हला ताणि भूवया ।
दातांनी ओठ चावोनी कटाक्षें विंधिते पहा ॥ ६ ॥
कुणी ती टक लावोनी मुखा नेत्रेचि प्राशिते ।
संतां तृप्ती नसे जैशी हिलाही नच तृप्ति तैं ॥ ७ ॥
एक तो हृदयी कोंडी घेई नेत्र मिटोनिया ।
मनीं आलिंगिता त्याला उठले रोम अंगिचे ॥ ८ ॥
संत मुक्त जसे होती तशा गोपी प्रमोदल्या ।
विरहो संपला सारा शांतिडोहात डुंबल्या ॥ ९ ॥
एकरस असा कृष्ण सौंदर्य श्रेष्ठ ते असे ।
राहिला गोपिच्या मध्ये तपाने पावतो तसा ॥ १० ॥
गोपिंच्या सहही कृष्ण वाळूत पातला पुन्हा ।
वाहे गंधीत वायू तै भुंगेही मत्त जाहले ॥ ११ ॥
त्या वेळी पूर्ण तो चंद्र चांदणे वर्षला बहू ।
न वाटे रात्रिची वेळ रंगमंच तटी जसा ॥ १२ ॥
( इंद्रवज्रा )
उल्हास आला बहु गोपिकांना
     गेल्या मिटोनी मग व्याधि सर्व ।
श्रुती जशा त्या कृतकृत्य होती
     नी ओढणीशी लपवी कुणी त्या ॥ १३ ॥
योगेश्वराला हृदयी धराया
     त्या इच्छिताही नच थांबतो की ।
तो शोभला गोपिंका माजि ऐसा
     त्रैलोक्य शोभा जणु तैं जहाली ॥ १४ ॥
गोपिंसि आले बहु प्रेम कृष्णा
     केले असे स्वागत हासुनीया ।
पोटास कोणीी धरि पाय त्याचे
     रुसोनि कोणी वदती हरीला ॥ १५ ॥
( अनुष्टुप् )
गोपिका म्हणाली -
प्रेमीसी प्रेम ते कोणी अप्रेमा प्रेम दे कुणी ।
नेच्छिती कोणि ते दोन्ही तिन्हीत काय ते रुचे ॥ १६ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
प्रेमीला प्रेम जे देती स्वार्थ उद्योग तो तसा ।
न स्नेह धर्मही त्यात हेतू स्वार्थचि एक तै ॥ १७ ॥
अप्रेमा प्रेम जे देती हितैषी माय-बाप जै ।
सत्य स्वच्छ असा धर्म व्यव्हारी तोच एकला ॥ १८ ॥
न प्रेम लाविती कोठे तयांचा प्रश्न ना उरे ।
अद्वैती स्वरुपी धन्य किंवा तो गुरुद्रोहिची ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा )
न वागतो मी प्रिय इच्छि तैसे
     या कारणे की पदि ध्यान लागो ।
लोभी जसा ध्यायि धनास तैसे
     तसाचि जातो हृदयात त्याच्या ॥ २० ॥
मदर्थ लज्जा अन वेदमार्ग
     त्यजोनि येता स्थिर बुद्धि होवो ।
परोक्ष प्रेमार्थ लपोनि गेलो
     न प्रेमि माझ्या मुळि दोष लावा ।
प्रीया तुम्ही तो मज सर्व आहा
     नी प्रीय सर्वांसहि मीच आहे ॥ २१ ॥
योग्या न शक्यो त्यजिणे घराला
     ते सर्व तुम्ही त्यजिलेच आहे ।
निर्दोष संयोग असाचि झाला
     न होय त्यागा उतराय शक्य ।
जन्मांतरीही तुमचा ऋणी मी
     प्रेमे ऋणाचा तुम्हि भार केला ॥ २२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बत्तिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP