कृष्णाचे गोकुळाहून वृंदावनात जाणे, वत्सासूर व बकासुराचा उद्धार -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव म्हणतात -
पडले वृक्ष मोडोनी नंद गोपादि ऐकती ।
वीजची पडली वाटे भितीने पातले तिथे ॥ १ ॥
पाहिले वृक्ष ते ऐसे मोडोनी पडले तदा ।
बांधिता उखळा ओढी कृष्ण बालक हा तरी ॥ २ ॥
कृष्णाचे काम हे ऐसे तयांनी नच जाणले ।
विचार करुनी त्यांच्या बुद्धीला नच ते कळे ॥ ३ ॥
वदले अन्य ते बाळ कृष्णाचे काम हे असे ।
ओढिता उखळा येणे पडले वृक्ष हे पहा ।
आम्ही तो पाहिले दोन निघाले पुरुषो इथे ॥ ४ ॥
खरे न वाटे कोणा बाळाला काय शक्य हे ।
पूर्वलीला स्मरोनीया कोणी जाणिति सत्य हे ॥ ५ ॥
नंदाने पाहिला लल्ला बद्ध हा ओढितो असा ।
हासले पातले तेथे तयांनी दोर सोडिले ॥ ६ ॥
गोपींनी फुगविता तो नाचे बाळ कधी तसा ।
भोळ्यापरी कधी गायी हरि हा बाहुली जसा ॥ ७ ॥
सांगता कधि तो आणी तराजू पाट चप्पला ।
भक्तांना मोद तो देण्या ठोकी हाबूक तो कधी ॥ ८ ॥
भगवान् करी ह्या लीला जगास दाखवावया ।
करिती भक्ति हे नित्य तयांना वश मी असा ॥ ९ ॥
फळे घ्या ! वदला कोणी विक्रेता द्वारि येऊनी ।
सानुल्या करी हा कृष्ण धान्य घेवोनि पातला ॥ १० ॥
सांडले धान्य ते खाली विक्रेता फळ दे बहू ।
निघता पाहतो पाटीं फळांचे रत्न जाहले ॥ ११ ॥
एकदा यमुना काठी बलजी कृष्णजी सवे ।
वाळवंटात खेळाया गेले नी रमले तिथे ॥ १२ ॥
रोहिणी हाक मारी तो न येता बाळ हे द्वय ।
यशोदा वत्सला हीस रोहिणी पाठवीतसे ॥ १३ ॥
खूप वेळ तसा झाला यशोदा हाक मारिते ।
वात्सल्ये स्तनिचे दूध दाटोनी पातले पहा ॥ १४ ॥
मोठ्याने हाक मारी की कन्हैयाऽऽ श्यामसुंदरा ।
येरेऽऽ ये लाडक्या कृष्णा थकला असशील तू ।
थांबवी होसि तू रोड भुकेने, पाजिते तुला ॥ १५ ॥
प्रीयपुत्रा बळीरामा कुळा आनंद देसि तू ।
आण तू धाकट्या भावा न्याहारी जिरली पहा ॥ १६ ॥
भोजना बैसले राजे वाट पाहात थांबले ।
यावे घरास दोघांनी मुलांनो घरी या तुम्ही ॥ १७ ॥
धुळीने माखले अंग त्वरीत न्हावु घालिते ।
जन्मनक्षत्र ते आज ब्राह्मणा गाई दान द्या ॥ १८ ॥
पहा त्या तुमच्या मित्रां मातांनी न्हाविले असे ।
घासून पुसुनी अंग दागिने घातले पहा ।
आता न्हावे तुम्ही आणि लेणे खाणे नि खेळणे ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा )
माता मने प्राण प्रेमेचि बद्ध
धरोनि दोघा द्वय त्या करास ।
घरास आली मग मांगलीक
केले तिने ते करणे जसे जे ॥ २० ॥
( अनुष्टुप् )
नंदबाबा तसे वृद्ध एकत्र येउनी तदा ।
उपाय शोधिती तैसा उत्पात गोकुळी घडे ॥ २१ ॥
उपनंद असा एक वृद्ध नी ज्ञानि गोप जो ।
प्रसंगा जाणी तो नित्य पुत्ररक्षार्थ बोलला ॥ २२ ॥
उत्पात घडती मोठे मुलांना ते अनिष्ठची ।
सिद्ध होवोनि सर्वांनी उपाय योजिणे असे ॥ २३ ॥
पहा हा नंदराजाचा लाडला वाचला असे ।
पूतनाकरणीतून टांग्याच्या खालती तसा ॥ २४ ॥
वादळी रूप दैत्याने आकाशी नेउनी पुन्हा ।
आप्टिले तरि ही याला कुळाला देव रक्षितो ॥ २५ ॥
यमलार्जुन ते वृक्ष पडता वाचला असे ।
भगवान् रक्षितो आम्हा कृपा त्याचीच मानणे ॥ २६ ॥
येतील संकटे थोर नष्टितीलचि गोकुळा ।
मुलांना घेउनी सारे जावे दूर कुठे तरी ॥ २७ ॥
वृंदावन असे थोर हिरवे नित्य जे नवे ।
पवित्र तृण नी वृक्ष गाईंना चांगले तिथे ।
गोप गोपी नि गाईंना रहाया चांगले पहा ॥ २८ ॥
जर हे रुचते सर्वां जाऊया आजची तिथे ।
विलंब नच हो याते गाई गाड्या धरा चला ॥ २९ ॥
ठीक ! ठीक ! असे सारे वदले ऐकता तसे ।
सामुग्री रचुनी टांगे निघाले तिकडे वनां ॥ ३० ॥
स्त्रिया बाळां नि वृद्धांना टांग्यात बैसवोनिया ।
चालले पाठिशी गोप जोडोनी धनु-बाण ते ॥ ३१ ॥
सर्वात पुढती गाई वासरे चालवीयले ।
तुतार्या शिंग वाद्यांच्या सवे विप्रहि चालले ॥ ३२ ॥
वक्षासी केशरी लेप वस्त्र हार तसे नवे ।
लेवोनी रथि त्या गोपी कृष्णलीलाचि गायिल्या ॥ ३३ ॥
यशोदा रोहिणी याही सजोनी रथि बैसल्या ।
कृष्ण नी बळीरामचे तोतरे बोल ऐकती ॥ ३४ ॥
वृंदावन असे छान सदैव सुखची सुख ।
अर्धचंद्राकृती टांगे लावोनी गाई रक्षिल्या ॥ ३५ ॥
गोवर्धन गिरी तेथे यमुना वाळवंटही ।
पाहता हर्षला कृष्ण बळीही मोदला तसा ॥ ३६ ॥
वृंदावनात गोकूळापरी हे करिती लिला ।
बोबडे बोलती बोल वासरे चारु लागले ॥ ३७ ॥
अन बाळांसवे दोघे सामग्री खूप घेउनी ।
निघती ते घरातून गोठ्याशी वत्स चारिती ॥ ३८ ॥
कधी वाजविती वेणू कधी ढेकळ फोडिती ।
पैंजणा ताल ते घेती घेती सोंगहि गाइचे ॥ ३९ ॥
कधी वळू बनोनीया टकरा करिती द्वय ।
माकडे सारिका मोरा परी शब्द कधी कधी ॥ ४० ॥
एकदा यमुना काठी चारिती वासरे तदा ।
त्यावेळी मारणे हेतू ठेवोनी दैत्य पातला ॥ ४१ ॥
वासरू होउनी आला कृष्णाने जाणिले असे ।
बलरामा खुणावोनी वत्सात पातले द्वय ।
सुरेख वासरां मध्ये रमले दाविती तसे ॥ ४२ ॥
पाठीचे धरुनी पाय तो वत्सासुर कृष्णने ।
मारिला फिरवोनिया खैरवृक्षांसि फेकला ॥ ४३ ॥
पाहता बाळ गोपांच्या आश्चर्या पार ना उरे ।
आनंदे वदले वाऽरे ! देवता पुष्प वर्षिती ॥ ४४ ॥
लोकरक्षक ते दोघे वत्सरक्षक जाहले ।
त्वरेचि उठती नित्य वासरां वनि पाळिती ॥ ४५ ॥
एकदा सर्व गोपाळ तळी वत्सास नेत तैं ।
वासरा पाजिले पाणी पिले सर्वची ते जल ॥ ४६ ॥
मुलांनी पाहिला तेथे प्रचंड बसला कुणी ।
इंद्र वज्रे जणू थोर गिरी कापोनि ठेविला ॥ ४७ ॥
बकासूर बकाचे ते रूप घेवोनि बैसला ।
लांब चोंच बळो थोर कृष्णाला गिळले यये ॥ ४८ ॥
बळी नी बाळ गोपाळे गिळिता कृष्ण पाहिला ।
जाता प्राण जसा देह तसे सर्वास जाहले ॥ ४८ ॥
( इंद्रवज्रा )
ब्रह्मापिता या करितो लिला की
टाळूत जाता जळु लागली ती ।
गिळू पहाता तरि हा गिळेना ।
चोंचीत तोडी तरी हा तुटेना ॥ ५० ॥
का कंसदूतो झपटे परी या
कृष्णे तयाचे जबडे धरोनी ।
कापी जसे डांगर कापणे ते
बाळां नि देवां बहुमोद झाला ॥ ५१ ॥
जाई चमेली करी घेउनीया
कृष्णावरी अर्पियले तयांनी ।
नी शंख ढोला ध्वनी जाहला की
हे पाहता बालक हर्षले ते ॥ ५२ ॥
सर्वांत येता हरि तेधवा तो
आनंदले जै तनि प्राण आला ।
एकेक येता गळि लागले नी
घरासि येता वदले हि सारे ॥ ५३ ॥
( अनुष्टुप् )
ऐकता विस्मयो झाला गोपी गोपादिकांसिही ।
मृत्यूला लढुनी कृष्ण आला तो नित्य पाहती ॥ ५४ ॥
वदती हाय हायो ते लोटे हा मृत्यु पासुनी ।
अनिष्ठ करण्या येता दुष्टां दुःखचि लाभले ॥ ५५ ॥
एवढे जाहले तोही असूरभय यास ना ।
पतंग विझवी ज्योत न विझे जळती स्वयें ॥ ५६ ॥
ब्रह्मवेत्ता महात्म्यांचे असत्य नचहो कधी ।
भविष्य गर्ग विप्रांचे तंतोतंतचि होतसे ॥ ५७ ॥
आनंदे नंदबाबा नी गोपी गोपादि हर्षुनी ।
बोलती बल कृष्णाचे जणू कांहीच ना घडे ॥ ५८ ॥
आंधळी खेळ नी सेतू कधी ते माकडा परी ।
विचित्र खेळती लीला बालोचित व्रजीं द्वय ॥ ५९ ॥