[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
राजा परिक्षिताने विचारले -
भगवन् ! कृपया सांगा त्या दोघा शाप का मिळे ।
घडले निंद्य ते काय देवर्षी क्रोधले असे ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
कुबेराचे असे पुत्र रुद्रानुचर जाहले ।
घमेंड जाहली त्यांना दारूने मत्त जाहले ॥ २ ॥
जाहले नेत्र ते लाल कितेक ललनांसह ।
रमले गीत गाण्यात क्रीडती वाटिकेमधे ॥ ३ ॥
गंगेच्या पात्रि ते पूर्ण कमळे खुलली तदा ।
जळात हत्तिच्या ऐसे स्त्रियांशी क्रीडले बहू ॥ ४ ॥
प्रारब्धे त्याच वाटेने देवर्षी पातले पहा ।
तयांनी यक्षपुत्रांना पाहिले माजले असे ॥ ५ ॥
देवर्षी पाहता नेत्री लाजल्या नग्न अप्सरा ।
त्वरीत कपडे केले परी दोघे न लाजले ॥ ६ ॥
देवतापुत्र हे दोघे श्रीमदे धुंद जाहले ।
माजले मदिरापाने नारदे शाप हा दिला ॥ ७ ॥
श्रीनारद म्हणाले -
भोगोनि विषयो त्यांची धनाने बुद्धि नष्टते ।
हिंसा नी कुळ गर्वो तो एवढी नच भ्रंशक ।
श्रीमदे मदिरा स्त्रीया द्यूत दुर्गूण लागती ॥ ८ ॥
श्रीमदे अंध होवोनी नाशवान् तनु सत्य ती ।
मानिती करिती हत्त्या पशू पक्ष्यांचिही तशी ॥ ९ ॥
भूदेव नर देवो नी देवही मानवी तनू ।
शेवटी नासते आणि जाळिता राख ढीगची ।
तयाचे साठि ते लोक द्रोहे नर्कात पावती ॥ १० ॥
पिता माता अजोबा कां बली व्यापरिचा तसा ।
अग्निचा प्राणि कुत्र्याचा कोण मालक या तना ? ॥ ११ ॥
साधी वस्तू तनू होय जन्मते मिटते अशी ।
मूर्खांशिवाय ते कोण सत्य मानोनि त्रासिती ॥ १२ ॥
धनांध दुष्ट जे ऐसे त्यांना दारिद्र्य अंजन ।
दरिद्र्यां कळते सर्व माझ्या ऐसा दुजा जिवो ॥ १३ ॥
जयाला टोचला काटा दुज्यां तो नच टोचवी ।
न जाणी टोचते कैसे दुसर्यां तोच टोचवी ॥ १४ ॥
गरीबा नसतो गर्व मद तो स्पर्शिना तयां ।
कष्ट जे पडती त्याला तपस्या थोर ती असे ॥ १५ ॥
रोजी रोटी जयांची ते भूक दुर्बल ते कृश ।
अधीक भोग ना घेती त्रास हिंसा असेचिना ॥ १६ ॥
समदर्शी असे संत दरिद्र्या भेट स्वल्प हो ।
संतांच्या संगतीमध्ये तृप्ती शुद्धीहि लाभते ॥ १७ ॥
समदर्शी हरीकीर्ती गाण्या उत्सुक ते सदा ।
दुर्गुणी ते तसे द्रव्य तयाला ते उपेक्षिती ॥ १८ ॥
श्रीमदांध ते दोघे दारूने माजले असे ।
विषयी लंपटो त्यांचे अज्ञान करिते चुरा ॥ १९ ॥
पहा अनर्थ हा मोठा पुत्र हे लोकपालचे ।
नागडे जाहलो याचे भानही यांजला नसे ॥ २० ॥
म्हणोनी वृक्षयोनीते यांजला जन्म योग्य तो ।
न तेणे गर्व तो राही हरीला स्मरतील हे ॥ २१ ॥
देवांच्या शतवर्षाने कृष्णसंपर्क होय तो ।
भगवत्पदप्रेमाने येतील परतोनिया ॥ २२ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
यमलार्जुन या नामे दोघे वृक्षचि जाहले ।
शापिता नारदो गेले नरनारायणाश्रमी ॥ २३ ॥
प्रीय नारद भक्ताचे बोल सत्य करावया ।
बांधिल्या उखळा ओढी कृष्ण वृक्षांसी पातला ॥ २४ ॥
कुबेर भक्तची माझा त्याचे हे पुत्रची द्वय ।
महात्मा वदले तैसे पूर्णरूप करीन मी ॥ २५ ॥
विचार करता कृष्ण दोन्ही वृक्षात त्या घुसे ।
निघाला पुढती तेंव्हा उखळी आडके तिथे ॥ २६ ॥
( वसंततिलका )
दामोदरासि कसिले कमरेस दोरे
पाठीस ते उखळ श्रीहरि ओढिताच ।
झाडे समूळ पडली उखडोनि खाली
ताऽडाऽतडाड ध्वनि ये बळ अल्प देता ॥ २७ ॥
अग्नी समान निघले पुरुषो द्वयो तै
सौंदर्य तेजिं भरल्या दशही दिशा त्या ।
ठेवोनि पायि शिर ते नमितात कृष्णा
जोडोनि हात करिती स्तुतिही तयाची ॥ २८ ॥
( अनुष्टुप् )
कृष्ण कृष्ण महायोगी तू आद्य पुरुषो परा ।
व्यक्ताव्यक्त असे विश्व रूप ते द्विज सांगती ॥ २९ ॥
तू एक सर्वभूतांच्या देहप्राणासि स्वामि तू ।
तू काल भगवान् विष्णू अव्ययो आणि ईश्वर ॥ ३० ॥
तू महान् प्रकृती सूक्ष्मो रज सत्व तमोमयी ।
कर्म धर्म तशी सत्ता जाणता साक्षि ईश तू ॥ ३१ ॥
प्रकृति गुण आदिंना कधी तू आकळेचि ना ।
अज्ञानी कोण हे जाणी तूं तो सर्व पुरातनो ॥ ३२ ॥
विश्वाचा स्वामी तू आम्ही वासुदेवा प्रणामितो ।
गुणीं गुणा मिळविसी परब्रह्मा नमो तुला ॥ ३३ ॥
तुला प्राकृत ना देह तरी शूरत्व दाविसी ।
अशक्य जन सामान्या तेंव्हा हे कळते असे ॥ ३४ ॥
समस्त लोककल्याणा तुम्ही तो अवतारला ।
समस्त शक्ति घेवोनी इच्छाया पुरवीतसा ॥ ३५ ॥
नमो परमकल्याणा नमो परम मंगला ।
वासुदेवाय शांताय यदूकृष्णा नमो नमः ॥ ३६ ॥
दासानुदास हो आम्ही अनंता हे स्विकारणे ।
कृपा नी नारदे केली म्हणोनी पावलो पदीं ॥ ३७ ॥
( वसंततिलका )
वाणी गुणास कथिण्या श्रवणो कथेत
सेवेत हात मन ते रमते रुपात ।
हे विश्व सर्व सदनो तुझिये, नि संत
प्रत्यक्ष देह असती नमितो तयांही ॥ ३८ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
सौंदर्य निधि माधुर्य भगवान् गोकुळेश्वर ।
उखळा बद्ध तो तैसा हांसोनी वदला असे ॥ ३९ ॥
श्रीभगवान् म्हणाले -
श्रीमदे अंध हे दोघे जाणी मी पूर्वि पासुनी ।
नारदे प्रेमळे शापे कृपा केली पहा अशी ॥ ४० ॥
जयांनी समबुद्धीने मला हृदय अर्पिले ।
तयांचे दर्शने बंध तुटती रवि जैं तमा ॥ ४१ ॥
म्हणोनी तू मणिग्रीव आणि तू नलकूबरा ।
तुम्हाशी लाभली भक्ती आता जावे घरास की ॥ ४२ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
वदता भगवान् ऐसे केली त्यांनी परिक्रमा ।
पुनः पुन्हा प्रणामोनी निघाले उत्तरेकडे ॥ ४३ ॥