समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ९ वा

श्रीकृष्णाला उखळाला बांधले जाते -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्री शुकदेव सांगतात -
एकदा नंदराणी ती दासींना काम देउनी ।
स्वये ती लागली कामा मंथाया ताक नी दही ॥ १ ॥
तुम्हा मी कृष्णलीला ज्या बोललो सर्व त्या मनीं ।
माता ती आठवोनीया मंथिता गातही असे ॥ २ ॥
( मंदाक्रांता )
बांधोनीया स्थुलकटितटा वस्त्र ते रेशमाचे ।
पुत्रस्नेहे कुचहि भरले कंपती मंथिता तै ॥
मंथोनीया करहि थकले हालती कुंडले नी ।
वेणीचीही पडति कुसुमे भूवया चांग तैशा ॥ ३ ॥
( अनुष्टुप् )
तेंव्हा तिथे आला इच्छोनी स्तनपान ते ।
रवीच धरिली तेणे माता प्रेमात डुंबली ॥ ४ ॥
( इंद्रवज्रा )
कडेवरी कृष्ण बसोनि ऐसा
     मातृस्तनी दूधनि प्रेम दाटे ।
तृप्तोनि माता मुख पाहि त्याचे
     आडीवरी दूध उतोनि गेले ।
ठेवोनि कृष्णा मग माय जायी
     धावोनि दूध स्थिरावयाला ॥ ५ ॥
क्रोधोनि कृष्णो मग लाल झाला
     फोडोनि टाकी दहिमाठ तेंव्हा ।
घरात गेला रुसुनी तसाची
     शिळेचि लोणी रडताहि भक्षी ॥ ६ ॥
माता दुधाते उतरोनि आली
     पाही दह्याचे फुटलेचि माठ ।
मनात जाणी करणी हरीची
     नी हासली ती बहु तै यशोदा ॥ ७ ॥
धुंडोनि माता हरीसी बघे तो
     शिंक्यासि झोंबे उखळावरी तो ।
नी माकडाच्या परि खाय लोणी
     भिऊनि चित्ती न बघोत कोणी ॥ ८ ॥
येताचि माता छडि घेउनिया
     पळोनि गेला बघताचि कृष्ण ।
योगी जया मेळिण्या नित्य ध्याती
     त्यासी यशोदा धरण्यास धावे ॥ ९ ॥
धावोनि जाता हलले नितंब
     ते थोर त्याने थकलीच माता ।
सुटोनि वेणी गळलीही पुष्पे
     तरीहि मातें धरिलाच कृष्ण ॥ १० ॥
धरोनि हाता मग रागवे ती
     मुद्रा तयाची गमली विचित्र ।
भीती तशी नी अपराधियाची
     रडे न थांबे त‍इ हुंदके दे ।
ते काजळी नेत्रहि चोळल्याने
     मुखासि काळे दिसले विचित्र ।
चंबूच झाले जणु ओठ त्याचे
     व्याकूळला हा दिसतो असा की ॥ ११ ॥
भिलेला दिसता लल्ला वात्सल्य मनि दाटले ।
फेकोनी छडि ती माता बांधाया चिंतिते मनीं ।
बाळ‍ऐश्वर्य ते थोर यशोदा नच जाणि की ॥ १२ ॥
ज्याच्या बाहेर ना काही ज्याच्या आतहि ना दिसे ।
आदी ना अंतही ज्याला जगाचा रूप तो स्वयम् ॥ १३ ॥
परा अव्यक्त हा ऐसा मनुष्यकार ही असा ।
पुत्र हा मानिता बांधी दोराने उखळास मा ॥ १४ ॥
दोराने बांधिता याला अपुरा दोन बोट तो ।
दुसरा आणुनी दोर दोराला जोडिला असे ॥ १५ ॥
दुजाही अपुरा होता तिसरा जोडिला तिने ।
कित्येक जोडिले दोर दो बोट अपुरेच की ॥ १६ ॥
यशोदा बांधिते सर्व घरचे दोर धुंडुनी ।
तरीही भगवान् कृष्णा बांधण्या अपुरेच की ॥ १७ ॥
मातेची पाहिली कृष्णे त्रेधा ही जाहली अशी ।
पाही तो सुटली वेणी स्वयें बंधनि गुंतला ॥ १८ ॥
स्वतंत्र भगवान् कृष्ण ब्रह्मा इंद्रादि वश्य त्यां ।
तरीही बांधला गेला दाविण्या भक्तिबंधन ॥ १९ ॥
मुक्तिदाता मुकुंदाचे गोपींनी प्रेम मेळिले ।
ब्रह्मा शिव तशी लक्ष्मी यांना जे नच लाभले ॥ २० ॥
अनन्य भक्तिने लाभे गोपिकानंदनो हरी ।
कर्मकांडी तपस्व्यांना ज्ञान्यांना जे न लाभले ॥ २१ ॥
बांधोनि घरकामाला माता जाताचि कृष्णने ।
यमलार्जुन वृक्षांना मुक्त्यर्थ मनि चिंतिले ॥ २२ ॥
कुबेराचे मणिग्रीव नलकूबर पुत्र हे ।
रूपवान् गर्वि ही तैसे उद्‍धटा परि वागले ।
नारदे शापिता वृक्ष यमलार्जुन जाहले ॥ २३ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP