समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८ वा

कृष्ण-बलरामाचे नामकरण व बाललीला -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्री शुकदेव सांगतात -
गर्ग पुरोहित होते यदुवंशास श्रेष्ठ ते ।
प्रेरिता वसुदेवाने पातले गोकुळी पहा ॥ १ ॥
तयांना पाहता झाले प्रसन्न नंदतात ते ।
भगवान् मानिले विप्रा जोडोनी कर पूजिले ॥ २ ॥
आतिथ्य सर्व ते केले गर्गांचे विधिपूर्वक ।
वदले तृप्त हो तुम्ही सेवा काय करू तुम्हा ? ॥ ३ ॥
गृहस्थांच्या घरी संत येता कल्याण होतसे ।
प्रपंची गुंतलो आम्ही आश्रमी नच पातलो ।
कल्याणार्थ तुम्ही येता सदैव आमुच्या घरी ॥ ४ ॥
भविष्य भूतकाळाचे जाणिता सर्व ते प्रभू ! ।
भविष्यशास्त्र ते तुम्ही प्रत्यक्ष रचिले असे ॥ ५ ॥
ब्रह्मवेत्ते तुम्ही थोर दोन या बाळकांचिये ।
करावे नामसंस्कार द्विज ते गुरु अर्भका ॥ ६ ॥
गर्गाचार्य म्हणाले -
नंदजी यदुवंशाचा विख्यातगुरु मी असे ।
संस्कार करिता पुत्रां तरी सर्वांस ते कळे ।
पुत्र हा देवकीचा नी ते आज योग्यही नसे ॥ ७ ॥
वसुदेव तुम्हा मित्र कंसाची बुद्धि पापि ती ।
कंसाने देवकीकन्ये कडोनी ऐकिले असे ।
वाढतो शत्रु तो बाळ अन्यत्र, कंस जाणितो ॥ ८ ॥
संस्कार करिता याचे कळता बाळ तो वधी ।
अन्याय पाप हे तैसे घडेल मजला पहा ॥ ९ ॥
नंदबाबा म्हणाले -
गुरो ! एकांति गोशाली स्वस्तिवाचन ते करा ।
बाळाचे नाव ते ठेवा सोयरेहि न जाणती ॥ १० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
इच्छा होतीच गर्गाची नंदेही प्रार्थिले तसे ।
एकांती गुप्तरूपात नामसंस्कार जाहले ॥ ११ ॥
रोहिणीचा रोहिणेय राम हा रमवी मना ।
बलाधिक्ये बली नाम संकर्षण् भेद हा मिटी ॥ १२ ॥
दुसरा सावळा वर्णी म्हणोनि कृष्ण बोलणे ।
श्वेत पीत तसा रक्त युगात रंग पालटी ॥ १३ ॥
पुत्र हा वसुदेवाचा रहस्य जाणिती असे ।
वासुदेव अशा नामे म्हणतील कुणी कुणी ॥ १४ ॥
जेवढे गुण ते याचे तेवढे नाम याजला ।
जाणतो सर्व ते मीच सर्वांना नच ते कळे ॥ १५ ॥
करील तुमचे भद्र मोदील गोप गायिसी ।
संकटी सहजी मात याच्या साह्येचि होतसे ॥ १६ ॥
पूर्वयुगी व्रजराजा ! राजा न राहिला कुणी ।
माजले चोर नी डाकू धुमाकूळहि मांडिला ।
सज्जना रक्षिले याने दुष्टांना मारिले यये ॥ १७ ॥
सावळ्या सुंदरो पुत्रा प्रेमिती भाग्यवंत ते ।
विष्णुशी निर्भयो देव तसे ते निर्भयो पहा ॥ १८ ॥
वैभवे गुण सौंदर्ये साक्षात् नारायणो जसा ।
राहोनी सावधानीने रक्षावे याजला तुम्ही ॥ १९ ॥
गर्ग ते नंदबाबांना बोधिता पातले घरी ।
आनंद जाहला नंदा धन्य ते मानिती स्वये ॥ २० ॥
गुडघ्या वरती दोघे रांगती अंगणी तसे ।
राम-श्याम असे दोघे गोकुळी रांगु लागले ॥ २१ ॥
( वसंततिलका )
हे सान बंधु पद ठेवुनि चालताना
     दोघेहि हर्षति जधी ध्वनि सांखळ्यां हो ।
अज्ञात व्यक्ति धरुनी तयि पाठी जाती
     नी जाणता भिउनी ते पदरात येती ॥ २२ ॥
ते खेळती चिखलि नी भरवीत अंग
     तेणे अधीक दिसती मग बाळ छान ।
येताचि खेळुनि तदा स्तन देत माता
     पाहिनि दात इवले मनि हर्ष होई ॥ २३ ॥
गोपि न ज्या बघितल्या असल्याहि लीला
     ते वत्सपुच्छ धरुनी रखडोनि जाती ।
सोडोनि काम बघती मग गोपि सार्‍या
     हांसोनि पोट धरिती मनि हर्ष होय ॥ २४ ॥
दोघेहि चंचळ बहू अन खेळ खेळो
     बांधोनि नेत्र करि घेउनि शस्त्र ऐसे ।
कुत्रे नि मोर बघण्या पळतात मागे
     खड्ड्यात जै उतरती तयि माय त्रस्त ॥ २४ ॥
( अनुष्टुप् )
राम-कृष्ण असे दोघे सोडोनी रांगणे पुन्हा ।
चालले गोकुळी सार्‍या घरा दारात सर्वही ॥ २६ ॥
असे श्री भगवान् कृष्ण बाळ-गोपाळ घेउनी ।
बळीच्या सह ते जाती व्रजी खेळ करावया ।
खेळता करिती तृप्त गोपिंना मनि बाळ हे ॥ २७ ॥
अतीव चंचलो बाळ गोपिंना आवडे बहू ।
जमल्या एकदा सार्‍या मातेला सांगु लागल्या ॥ २८ ॥
( मंदाक्रांता )
वत्से सोडी नटखट हरी क्रोधता हासतो हा ।
चोरीमध्ये अतीव चतुरो गोरसा भक्षितो नी ॥
माठां फोडी अन नवनितो वाटितो माकडांना ।
बाळांना हा रडवि पळतो ना मिळे जेथ कांही ॥ २९ ॥
शिंक्यासाठी रचिहि उतरंडी नि हि योजी उपाय ।
कधी ठेवी उखळ वरती स्कंधि मित्राहि तैसा ॥
कोण्या भांडी कळत सगळे फोडितो रिक्त ऐसे ।
गळा रत्‍ने बघत सगळे त्याच तेजात रात्री ॥
अंधारीही लपुनी ऐशा ठेविले फोडी माठ ।
अंगी त्याच्या अतिव असल तेज नी चातुरीही ॥
कोणी कोठे वसत घरि ते शोधितो काम घेता ।
नी त्या वेळी हरि करितसे चोरि त्या गोरसाची ॥ ३० ॥
धारिष्ट्याने वदत मग तो चोर आम्हीच जैसे ।
संमार्जीले जरि घर तसे मूततो हा तिथे की ॥
चोरीच्या तो कितिक करि हा युक्ति राही निवांत ।
पाषाणाचा जणुचि पुतळा साधुबोवा असा हा ॥
ऐशा गोपी वदत असता भीतिने कृष्ण पाही ।
बघे माता कवतुक करी क्रोधणे दूर राही ॥ ३१ ॥
( अनुष्टुप् )
एकदा क्रीडला कृष्ण राम गोपादिकां सवे ।
वदता पातली बाळे कृष्णाने माति भक्षिली ॥ ३२ ॥
हितैषी यशोदा हात कृष्णाचे ते धरी तदा ।
मारल्या परि हा भीयी माता दाटोनि बोलली ॥ ३३ ॥
खट्याळ धीट तू झाला माती चोरोनि खासि का ?
खेळिये बोलती सर्व बळीही साक्ष देतसे ॥ ३४ ॥
भगवान् कृष्ण म्हणाले -
बोलती सर्व हे खोटे माती मी नच भक्षिली ।
तयांचे वाटते सत्य तरी हे मुख पाहणे ॥ ३५ ॥
ठीक रे ! वदली माता उघडी मुख हे तुझे ।
अनंतैश्वर्य श्रीकृष्ण लीलार्थ बाळ जाहला ॥ ३६ ॥
तोंडात पाहता माता दिशा द्वीप गिरी धरा ।
वायू विद्यूत अग्नी नी चंद्रमा तारकां सह ॥ ३७ ॥
आकाश मंडलो ज्योती जल तेज नि देवता ।
गुण नी पंच तन्मात्र दिसले मुखि तेधवा ॥ ३८ ॥
( इंद्रवज्रा )
तसे विचित्रे सह जीव काल
     स्वभाव कर्मो मन लिंग भेद ।
ही सृष्टी नी ते व्रज ही तयात
     व्रजात माता अन कृष्ण पाही ॥ ३९ ॥
हे स्वप्न का त्या हरिचीच माया
     कां बुद्धिसी तो भ्रम होय माझ्या ।
कां जन्मता बाळचि योगि आहे
     मनीं यशोदा त‌इ चिंति ऐसे ॥ ४० ॥
मना नि चित्ता अन वाणि कर्मा
     अंदाज ना ये विषयास ज्याचा ।
हे विश्व ज्याच्या वरि आश्रयो नी
     अचिंत्यरूपी प्रभुला नमी मी ॥ ४१ ॥
ही मी पती हा अन पुत्र हा नी
     मी स्वामिनी या व्रजराजयाची ।
हे गोप गोपी अन गाइ माझ्या
     मायापसारे मन गुंतले हे ।
तो आश्रयो श्रीहरि एकलाची
     त्याच्या पदा मी शरणार्थ आले ॥ ४२ ॥
( अनुष्टुप् )
कृष्णाचे तत्व हे ऐसे यशोदा चित्ति जाणिता ।
आपुली वैष्णवी माया स्वतात मिटवी हरि ॥ ४३ ॥
यशोदा विसरे सर्व पोटी कृष्णास घेतले ।
पहिल्या परि तो आला प्रेमधी उसळोनिया ॥ ४४ ॥
वेदोपनिषदे सांख्ये योगाने कीर्तने जया ।
न तृप्ति होतसे भक्ता यशोदा पुत्र मानि त्या ॥ ४५ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
भगवन् ! नंदबाबाने कोणते तप साधिले ।
यशोदे साधिले काय ज्या पुण्ये स्तनिला हरी ॥ ४६ ॥
कृष्णलीला अती श्रेष्ठ श्रेष्ठत्व लपवोनिया ।
खेळता बाळ गोपाळीं ऐकता ताप शांत हो ॥
त्रिकालज्ञहि गाती ज्या न भाग्य पाहणे सुखा ।
देवकी वसुदेवो ते माय-बाप असोनिया ।
लुटिती यशदा नंद याचे कारण काय ते ॥ ४७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
वसु श्रेष्ठ असे होते नंद हे पूर्व जन्मिचे ।
नाम द्रोण असे त्यांचे पत्‍नीचे नाव ते धरा ।
ब्रह्म्याची मानुनी आज्ञा वदले त्यास हे असे ॥ ४८ ॥
धरेसी जन्मता आम्ही अनन्य कृष्णभक्ति ती ।
लाभो नित्य अम्हा तैशी तेणे तो भव स्वल्प हो ॥ ४९ ॥
तथास्तु ! वदले ब्रह्मा व्रजीं नंदचि द्रोण ते ।
यशोदा ती धरा पूर्वी तयांची हीच पत्‍नी की ॥ ५० ॥
भवचक्रा मधोनीया या जन्मी सोडवावयां ।
कृष्णपुत्र तयां झाला यशोदा नंदजीस की ।
गोपी गोपादि सर्वांचे जडले प्रेम त्यास तै ॥ ५१ ॥
ब्रह्म्याचे बोल ते सत्य कराया कृष्ण नी बल ।
करिती गोकुळी लीला सर्वांना मोद जाहला ॥ ५२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP