[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
राजा परीक्षित म्हणाला -
प्रभो रम्य अशा लीला हरीच्या छान वाटती ।
अवतारलिला सर्व हृदया प्रीय वाटती ॥ १ ॥
( इंद्रवज्रा )
तहान भागे अरुची हटे ती
नी शीघ्र होते हृदयो पवित्र ।
भक्तीत लाभे हरिप्रेम नित्य
त्या सांगणे सर्व लिला हरीच्या ॥ २ ॥
( अनुष्टुप् )
भगवान जरि तो कृष्ण जन्मला पृथिवी वरी ।
मानवी करितो लीला आणखी अन्य सांगणे ॥ ३ ॥
श्री शुकदेव सांगतात -
( इंद्रवज्रा )
तो बाळकृष्णो कुसपालटी तै
त्या गोकुळी उत्सव जाहला तो ।
वाद्यी यशोदे अभिषेक केला
त्या जन्मनक्षत्रिहि गोपि आल्या ।
मंत्रेचि विप्रे बहु पाठ केले
बाळास आशिर्वच बोलते तै ॥ ४ ॥
विप्रासि पूजी यशोदा तदा नी
गो वस्त्र माला दिधल्या भिकूला ।
त्या लाडक्याला निज आलि तेंव्हा
हळूच शय्ये वरि ठेविले तो ।
शय्या तयाची शकटा तळासी
त्या पाळण्याच्या मधि होति तेंव्हा ॥ ५ ॥
थोड्याचि वेळे हरि पान इच्छी
रडे तशा उत्सवि कोण पाही ?
न लक्ष्यि माता बहुदंग झाली
रडोनि कृष्णो कर पाय झाडी ॥ ६ ॥
होता शिशू तै शकटातळासी
ते कोवळे पायहि लागल्याने ।
ठिक्र्याचि झाला शकटो नि त्यात
दह्या दुधाचे फुटलेचि माठ ॥ ७ ॥
ते पाहुनी गोप नि गोपि सार्या
माता पिताही बहु दुःखि झाले ।
ते आपसा माजिचि बोलले की
आपैस कैसे घडले असे हे ॥ ८ ॥
( अनुष्टुप् )
तिथे जे बाळ गोपाळ खेळले वदले तदा ।
बाळाने रडता पाये शकटा ठोकरीयले ॥ ९ ॥
परी त्या ज्येष्ठ गोपांनी मुलांचे ऐकिले नसे ।
अनंताच्या अशा लीला बिचारे नच जाणती ॥ १० ॥
ग्रहांचा कोप जाणोनी ब्राह्मणे मंत्र गायिले ।
पुन्हा माता करी बाळा आपुले स्तनपान ते ॥ ११ ॥
गोपांनी जोडिला गाडा ठेविली सर्व भांडि ती ।
हवने भगवत्द्वारा पूजिला शकटो पुन्हा ॥ १२ ॥
त्यागिती द्वेष नी खोटे ईर्षा हिंसा नि दंभ तो ।
सत्यशील द्विजांची ती खोटी ना वचने कधी ॥ १३ ॥
नंदाने घेतले बाळा चतुर्वेदोक्त मंत्र नी ।
पवित्र औषधीयुक्त जळाने बाळ न्हाविले ॥ १४ ॥
स्वस्त्यन असा पाठ एकाग्रे होम जाहला ।
श्रेष्ठ अन्नचि वाढोनी द्विजा भोजन ते दिले ॥ १५ ॥
व्हावया भद्र बाळाने ब्राह्मणा वस्त्र गायि त्या ।
सोन्याचे घालुनी हार दिधल्या तृप्तिले तयां ॥ १६ ॥
वेदवेत्ते सदाचारी असती विप्र त्यांचिये ।
निष्फळ नच ती वाणी होते हो कधिही पहा ॥ १७ ॥
एकदा खेळवी बाळा यशोदा पोटि घेउनी ।
जाहला जड हा कृष्ण शिळेच्या परि ना सहे ॥ १८ ॥
भाराने त्रासिली माता ठेविले पृथिवीवरी ।
आश्चर्य वाटले चित्ती घर कामास लागली ॥ १९ ॥
दैत्य नामे तृणवर्त कंसाचा निजसेवक ।
वादळी रूप घेवोनी कृष्णा आकाशि फेकले ॥ २० ॥
गोकुळी दाटली धूळ कोणा कांही न ते दिसे ।
भयान वादळी शब्दे दिशाही थर्र्र कापल्या ॥ २१ ॥
दो घडी चालले ऐसे माता ते संपल्यावरी ।
शोधी कृष्णास त्या जागी न दिसे तेथ तो तिला ॥ २२ ॥
वार्याने उडली वाळू कोणी बेशुद्ध जाहले ।
कळेना कांहि कोणासी आपुले पर काय ते ॥ २३ ॥
( पुष्पिताग्रा )
न दिसत जधि कृष्ण येश्वदेला
स्मरुनि मनी अति दुःखिताचि झाली ।
अति करुणामयि दिनोचि संपे
पडलि धरेसि मरे जणू वत्स गो ॥ २४ ॥
जधि मरुत सरे तदा ध्वनी तो
श्रवण करित गोपी तेथ पळाल्या ।
न बघत हरि तेथ दुःखिता त्या
रुदन करितहि अश्रु ढाळियेला ॥ २५ ॥
( अनुष्टुप् )
वारारूपी तृणावर्त न सहे जड कृष्ण तो ।
न चले बळ ते त्याचे वेग तो शांत जाहला ॥ २६ ॥
पहाडा परि हा बाळ तृणावर्त वदे मनीं ।
गळा पकडिला बाळे न होय दूर तो पुन्हा ॥ २७ ॥
निचेष्टित असा दैत्य बुबुळे पडले पहा ।
वाचाही बंद ती झाली सकृष्ण व्रजिं तो पडे ॥ २८ ॥
( इंद्रवज्रा )
आकाशि स्त्रीया बघती रडोनी
प्रचंड दैत्यो पडला शिळेशी ।
जै शंकरे त्या त्रिपुरासुराचा
ठेचूनि केला वध पूर्वकाळी ॥ २९ ॥
वक्षावरी तो लटकेहि कृष्ण
विस्मीत झाल्या बघताचि गोपी ।
मातेस तो बाळ दिधला तयांनी
खुशाल होता तरि बाळ तेंव्हा ।
नंदादि गोपे बघता तयाला
आनंद झाला मनि खूप त्यांच्या ॥ ३० ॥
मोठेचि आश्चर्य घडे पहा की
मृत्युमुखी बाळक दैत्य नेता ।
आला तिथोनी सुखरूप ऐसा
त्या हिंसकाते तर पाप भक्षी ।
बोलोनि गेले मग गोप ऐसे
संता न बाधा कुठल्याच काळी ॥ ३१ ॥
तपो बगीचे अन दान यज्ञ
ते काय झाले आमुच्या कराने ?
मरोनि जाता परतेहि बाळ
सौभाग्य मोठे अमुचे म्हणावे ॥ ३२ ॥
( अनुष्टुप् )
अद्भुत घटना ऐशा घडता गोकुळी मनीं ।
नंद श्रीवसुदेवाला वारंवार स्मरे पहा ॥ ३३ ॥
एकदा पाजिता माता बाळाला स्तनपान ते ।
वात्सल्ये झरले दूध आपोआप तदा पहा ॥ ३४ ॥
बाळाचे भरता पोट प्रेमाने माय चुंबिता ।
जांभई दिधली बाळें मुखात माय पाहि तै ॥ ३५ ॥
( इंद्रवज्रा )
ते अंतरीक्षो अन ज्योति सर्व
दिशा शशी सूर्य नि अग्नि वायू ।
समुद्र द्वीपो अन पर्वतो ते
नद्या वनो नी जिव सृष्टि सारी ॥ ३६ ॥
( अनुष्टुप् )
बाळाच्या मुखि हे पाही मृगशावकलोचना ।
काटा अंगास तो आला आश्चर्ये मिटि लोचने ॥ ३७ ॥