[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
श्री शुकदेव सांगतात -
उदार बुद्धिमान होते नंदबाबा परिक्षिता ! ।
अपार हर्ष त्यां झाला ऐकोनी पुत्र जन्म तो ।
केले स्नान तयांनी नी ल्याले ते वस्त्र भूषणे ॥ १ ॥
वेदज्ञ द्विज आणोनी स्वस्तिवाचन जाहले ।
विधीने देवता पित्रे पूजिले जातकर्म ही ॥ २ ॥
सोनेरी वस्त्र झाकोनी तिळाचे सात पर्वते ।
वस्त्र आभूषणे सज्ज द्वी लक्ष गायि दानिल्या ॥ ३ ॥
समयो स्नान शौचो नी संस्कारे नि तपे यजे ।
दाने संतोष द्वव्याने सुद्धी होते तशीच ती ।
आत्म्याची शुद्धी तै होते आत्मज्ञान करोनिया ॥ ४ ॥
द्विजे पौराणिके भाटे ठाकरे स्तुति गायिली ।
गायके गायिली गाणी भेरी दुंदुभि वाजल्या ॥ ५ ॥
गोकुळी सर्व ती दारे अंगणे चौक सर्व ते ।
झाडिले शिंपिली गंधे पताका शोभल्या पहा ।
गुढ्या उभारिल्या आणि तोरणे लाविली किती ॥ ६ ॥
धेनु वत्स तसे बैल हल्दी तैलेहि लेपिले ।
गेरू मोरपिसे घंटा पुष्पे नी वस्त्र साजिरे ।
सोनेरी म्होरक्या यांनी सर्व ते सजवीयले ॥ ७ ॥
परीक्षित् ! सर्व गोपाळ किमती वस्त्र दागिने ।
अंगर्खे पगड्या ल्याले भेटी घेवोनि पातले ॥ ८ ॥
गोपी आनंदल्या सार्या ऐकता पुत्रजन्म तो ।
केला शृंगार त्यांनी तै वस्त्र भूषण काजळे ॥ ९ ॥
मुखीं आनंद ओसंडे कुंकू जै पद्मकेशर ।
मोठाल्या कमरा त्यांच्या भेटवस्तूसि घेउनी ।
यशोदागेहि धावोनी येताना स्तन हालती ॥ १० ॥
( वसंततिलका )
कानात कुंडल तसे मणिहार कंठी
रंगीत वस्त्र, चलता फुल वेणिची ती ।
मार्गी गळोनि पडती हलती पयोद
त्या नंदजी सदनिची अशि दिव्य शोभा ॥ ११ ॥
( अनुष्टुप् )
नंदबाबा घरी जाता बाळा पाहोनि बोलले ।
भगवान् रक्षि तू बाळा ! बाळा तू चिरजीवि हो ।
हळदी तेल नी पाणी सिंचिता गान जाहले ॥ १२ ॥
स्वामी कृष्ण जगाचा या ऐश्वर्य वत्सलो मधू ।
अनंत सर्व ते त्याचे नंदाच्या घरि जन्मला ।
उत्सवो जाहला मोठा मांगल्य वाद्य वाजले ॥ १३ ॥
आनंदे धुंद होवोनी गोरसा फेकु लागले ।
दुज्यामुखासि ते लोणी लाविती उत्सवो असा ॥ १४ ॥
उदार नंदबाबाने गाई नी वस्त्र भूषणे ।
गोपांना दिधले तैसे भाट ठाकूर आदिना ॥ १५ ॥
सत्कारिले यथोचीत उद्देश एवढाच की ।
पावावा विष्णु तो बाळ बाळाचे शुभ तेचि हो ॥ १६ ॥
अभिनंदुनि नंदासी जाता त्या गोपिका तयां ।
सत्कारी रोहिणी माता दिव्यालंकार मांडिता ॥ १७ ॥
त्या दिनी नंदबाबाच्या गोकुळी ऋद्धि सिद्धि त्या ।
विनोदे क्रीडल्या कांकी कृष्ण लक्ष्मी सवेचि त्या ॥ १८ ॥
गोकूळ रक्षिण्या अन्यां सोपवी नंद एकदा ।
वार्षीक कर देण्याला मथुरीं पातले स्वयें ॥ १९ ॥
कळले वसुदेवांना नंद हे तेथ पातले ।
इच्छिता भेट ती त्यांची श्रीनंद तेथ पातले ॥ २० ॥
पाहता नंदजी यांना उठले हर्षुनी मनीं ।
प्रेमाने धरुनी हात हृदया भिडले द्वय ॥ २१ ॥
श्रेष्ठ सत्कार केला तै नंदाने वसुदेवचा ।
निवांत बसता दोघे क्षेम ते पुसु लागले ॥ २२ ॥
वसुदेव म्हणाले -
अवस्था ढळली होती संतान नसता तुम्हा ।
आशाही नव्हती तैशी आता संतान जाहले ॥ २३ ॥
भेटीत हर्ष हा झाला स्नेह्यांची भेट दुर्लभ ।
संसार चक्र हे ऐसे पुनर्जन्मचि मानणे ॥ २४ ॥
तृण काष्ठ पुरामाजी तसेचि जगती सखे ।
सोयरे या जगा माजी प्रारब्धे दूर धावती ॥ २५ ॥
महावनी तुम्ही जेथे राहता स्वजनां सवे ।
तृण पर्ण तसे पाणी सर्वांना अनुकुल कां ? ॥ २६ ॥
गोकुळी पुत्र तो माझा रोहिणीपाशि राहतो ।
यशोदा नी तुम्ही त्याचा सांभाळ करिता अहा ।
तुम्हा माता-पित्या ऐसा मानितो तो कसा असे ? ॥ २७ ॥
धर्मार्थकाम या योगे स्वजना सुख देइजे ।
स्वजना दुःख ते देता अहीत शास्त्र मानते ॥ २८ ॥
नंदबाबा म्हणाले -
बंधो ! त्या देवकीगर्भे जन्मले पुत्र सर्व ते ।
कंसाने मारिले त्यांना पुत्रीही स्वर्गि धाडिली ॥ २९ ॥
प्रारब्धे लाभते दुःख भाग्य ते एक आश्रय ।
कारणा जाणिले ज्याने तो ना मोहीत होतसे ॥ ३० ॥
श्रीवसुदेव म्हणाले -
बंधो तू कर वर्षाचा कंसाला तो दिला असे ।
न येथे राहणे जास्त घडे उत्पात गोकुळी ॥ ३१ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
ऐकता बोल हे नंद गोपाळां सह संमती ।
घेवोनी जुंपिले बैल निघाली गाडि गोकुळा ॥ ३२ ॥