समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४ था

कंसाच्या हातून सुटून योगमाया आकाशातून भविष्यवाणी करते -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्री शुकदेव सांगतात -
आपोआपची ती द्वारे जाहली बंद तेधवा ।
शिशूचे रडणे येता उठले द्वारपाल ते ॥ १ ॥
त्वरीत भोजराजाच्या पासी जावोनी बोलले ।
प्रसूती देवकी झाली कंस तो चर्कला मनी ॥ २ ॥
दूतांचे बोल ऐकोनी सूतिकारागृहि चालला ।
जन्मला काळ माझा हा स्मरता पडता उठे ॥ ३ ॥
तेथे जाताच करुणा दुःखाने देवकी वदे ।
हितैषी बंधु तू माझा स्त्रीहत्त्या नच हो करू ।
सुनेच्या परि ती आहे कंसा भाची तुझी पहा ॥ ४ ॥
बंधो ! प्रारब्ध माझे तू तेजस्वी पुत्र मारिले ।
राहिली मुलगी ही तो द्यावी तू मजला पहा ॥ ५ ॥
बहीण मी तव सान दीन मी पुत्रमृत्युने ।
प्रियबंधो समर्थो तू कन्या अंतिम दे मला ॥ ६ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
लपवी पोटि कन्येला देवकी रडता वदे ।
परी त्या दुष्ट कंसाने बळेचि पुत्रि ओढिली ॥ ७ ॥
बाळ भाच्ची तदा कंसे पायाला धरुनी पहा ।
गर्गरा फिरवोनीया आपटाया बघे तदा ॥ ८ ॥
कृष्णाची भगिनी साधी-सुधी ना देवता तशी ।
हातची सुटली गेली नभी अष्टभुजा पहा ॥ ९ ॥
दिव्यमालांबरोधारी अलंकार नि शस्त्र ते ।
चक्र शूळ त्रिशू खड्ग शंख ढाल गदा धनू ॥ १० ॥
सिद्ध चारण गंधर्व अप्सरा नाग किन्नर ।
स्तविती वस्तु अर्पोनी देवी कंसास बोलली ॥ ११ ॥
मूर्खा रे ! मज मारोनी मिळेल काय ते तुला ।
अन्यत्र वाढतो शत्रू न मारी बाळ अन्य ते ॥ १२ ॥
कंसाला वदुनी ऐसे माया अदृश्य जाहली ।
पृथ्वीशी अन्य नावाने प्रसिद्ध पावली पहा ॥ १३ ॥
देवीचे बोल ऐकोनी कंसा आश्चर्य वाटले ।
देवकी वसुदेवाला वदे मुक्त करोनिया ॥ १४ ॥
भगिनी ! प्रिय भावोजी पापी मी राक्षसा परी ।
मारिले तुमचे पुत्र खेद हा वाटतो मला ॥ १५ ॥
प्रेमाचा लेशही नाही एवढा दुष्ट मी पहा ।
हितैषी तोडिले सर्व नरको भोगणे मला ॥ १६ ॥
माणसे बोलती खोटे तसे देवहि बोलती ।
विश्वासुनि तयां शब्दी हाय ! मी पुत्र मारिले ॥ १७ ॥
तुम्ही दोघे महात्मेची पुत्रांचा शोक ना करा ।
तयांचे कर्म ते होते न टळे दैव ते कुणा ॥ १८ ॥
मातीची बनती भांडी फुटता मातिची पुन्हा ।
तसे हे शरिराचे की आत्म्यासी सुखदुःख ना ॥ १९ ॥
शरीरा मानिती आत्मा ती बुद्धी उलटी पहा ।
सरेना भव त्या भेदे अज्ञाने सुख ना मिळे ॥ २० ॥
तुझे मी मारिले पुत्र तरी तू शोक ना करी ।
कर्माला भोगणे होते सर्व प्राण्यासि ते तसे ॥ २१ ॥
आपुले रूप नेणोनी वदती मारितो मरो ।
अज्ञाने भाव हा होतो दुःख देतो नि भोगितो ॥ २२ ॥
दुष्टतेला क्षमा व्हावी संत दीनांसि रक्षिती ।
वदता पडला पाया कंस तो रडला असे ॥ २३ ॥
योगमायेवरी कंसे विश्वास ठेवुनी तदा ।
सोडिले पति पत्‍नीला प्रेमही दावु लागला ॥ २४ ॥
देवकी पाहुनी बंधु क्षमाचि बोलली असे ।
दुःख ते विसरोनीया बोलले वसुदेवजी ॥ २५ ॥
कंसजी ! बोलता सत्य जीव हा तनु मी म्हणे ।
म्हणोनी आपुले आणि दुजाचा भेद होतसे ॥ २६ ॥
शोक हर्ष भयो द्वेष लोभ मोह मदांध ते ।
भेद तो मानिता होती स्वामी प्रेरक ना कळे ॥ २७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
देवकी वसुदेवो ते बोलता मोकळे असे ।
संमती घेउनी कंस महाली पातला पुन्हा ॥ २८ ॥
संपली रात्र ती आणि कंसाने मंत्री सर्व ते ।
बोलावोनी तया सांगे योगमायाप्रसंग तो ॥ २९ ॥
न तज्ञ मंत्री ते कोणी देवशत्रु स्वभाव तो ।
चिडले देवतांशी ते कंसासी बोलले असे ॥ ३० ॥
भोजराजा ! अशी गोष्ट असता सर्व बालके ।
दशदिनाहुनी सान थोर ही सर्व मारु की ॥ ३१ ॥
देव ते भिरु युद्धासी करिती काय ते बघू ।
टणत्‌कार धनुष्याचा ऐकता पळतील की ॥ ३२ ॥
युद्धात घाव घावासी लागता जखमी तसे ।
पलायनपरायेण चौदिशां पळतील ते ॥ ३३ ॥
देवता शस्त्र ठेवोनी प्राणाची भीक मागती ।
काष्टे शिखाहि सोडोनी शरणी रक्ष बोलती ॥ ३४ ॥
शस्त्र अस्त्रा विणा कोणी भित्रा वा पाठ दावि त्यां ।
न मारी कोणिही दैत्य तेणे देव बळावती ॥ ३५ ॥
रणा बाहेर ते वीर विष्णु शंकर इंद्र तो ।
करील काय ते पाहू ब्रह्माही आपुल्या पुढे ॥ ३६ ॥
उपेक्षा तरि ही त्यांची न करा आमुच्या मते ।
मूळ ते उकरायाला सोपवा आमुच्या वरी ॥ ३७ ॥
( इंद्रवज्रा )
दुर्लक्ष होता चढतोचि रोग
     असाध्य होतो जरि तो हि सान ।
तसाचि शत्रू बळवे म्हणोनी
     दुर्लक्ष त्याचे नच ते करावे ॥ ३८ ॥
( अनुष्टुप् )
मूळ तो विष्णु देवांचा राही धर्मी सनातनी ।
तप वेद द्विजो गायी यज्ञाची दक्षिणा तिथे ॥ ३९ ॥
म्हणोनी भोजराजारे आम्ही ब्राह्मण नी तपी ।
याज्ञीक गायि त्या सर्व मारोनी टाकितो पहा ॥ ४० ॥
तपस्या वेद गो सत्य दमनो निग्रहो दया ।
तितिक्षा यज्ञ नी श्रद्धा विष्णूचे हे शरीर की ॥ ४१ ॥
स्वामी तो सर्व देवांचा असुरां मुख्य शत्रु तो ।
गुंफेत लपुनी राही शिव ब्रह्म्यासि तो मुळ ।
ऋषी ते मारता सर्व आपैस तोहि की मरे ॥ ४२ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
आधीच नासकी बुद्धी मंत्रीही त्यात हे असे ।
सर्वांची राय ती झाली ब्राह्मणा मारणे तसे ॥ ४३ ॥
हिंसाप्रेमी अशा दैत्या संतहिंसेसि धाडिले ।
इच्छेनुसार ती रूपे घेता कार्यास लागले ॥ ४४ ॥
रजो प्रकृति ती त्यांची तमाने मूढ जाहले ।
माथ्यासी मृत्यु तो त्यांचा संतद्वेषार्थ चालले ॥ ४५ ॥
आयू श्री यश नी धर्म भोग कल्याण सर्व ते ।
नष्टती सर्वच्या सर्व करिता संतद्वेष तो ॥ ४६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौथा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP